‘‘तर विद्यार्थ्यांनो मी आता तुम्हाला ‘कांदा आणि समाज’ हा भाग शिकवणार आहे. नागरिकशास्त्राच्या अभ्यासक्रमात याचा समावेश नाही, पण कांद्याचा बहुविध उपयोग व समाजावर होणारे त्याचे परिणाम व दुष्परिणाम वाढत चालल्याचे बघून या विषयाचा समावेश लवकरच या शास्त्रात करावा लागणार आहे. सध्या कांद्याचे भाव पडल्याने तो पुन्हा चर्चेत आला. वर्षांतून तीनचारदा तरी चर्चेच्या केंद्रस्थानी तो असतोच. तुम्हाला ‘ओ’ रक्तगटाविषयी ठाऊक असेलच तसेच या कांद्याचे आहे. तो जसा सर्वाना चालतो तसा कांदाही. जिभेचे चोचले पुरवणे हे याचे मुख्य काम. सोबतच बरीच आनुषंगिक कामेही तो पार पाडत असतो. जसे की राजकारण्यांना रडवणे, सरकार पाडणे.. रडवणे हा त्याचा गुणधर्मच. त्याचे भाव पडले की शेतकरी रडतो, भाव वाढले की मध्यमवर्गीयांच्या डोळ्यांत पाणी येते आणि जेव्हा भाव व उत्पादनाचा समतोल साधला जातो तेव्हा गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणण्याचे नियतकर्तव्य तो बजावत असतो. एकूणच स्वयंपाकघर ते संसद असा त्याच्या उपद्रवमूल्याचा आवाका. म्हणूनच प्रत्येकाने कांद्याविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. आता श्रावण असल्याने व करोनामुळे हॉटेले बंद असल्याने त्याची विक्री मंदावली असली तरी प्रत्येक भाजी तसेच पदार्थात त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तांबडा असो वा पांढरा अथवा लाल, प्रत्येक रश्शाला चवदार करण्याची मोठी कामगिरी तो नित्यनेमाने बजावत असतो. त्यामुळे खवय्यांच्या गळ्यातील ताईत असेही विशेषण त्याला लावले जाते. आपल्या देशात निवडणुका जिंकण्यासाठी जाती, धर्मातील भांडणांचा आधार कसा घेतला जातो हे तुम्ही राज्यशास्त्रात शिकलेच असाल, पण अनेकदा कांदासुद्धा निवडणुकीत उपयुक्त ठरत आला आहे. आतापर्यंत दोन ते तीन सरकारे पाडण्याची नोंद त्याच्या नावावर आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकसुद्धा कांद्यावर बारीक लक्ष ठेवून असतात. त्याचा पुरवठा व मागणीचे प्रमाण बिघडू नये याकडे प्रत्येक सरकारचे लक्ष्य असते. तशी काही गडबड झाली की लगेच आयात-निर्यातीचे निर्णय होतात. अनेकदा हे निर्णय अमलात येण्याआधीच बाजारातील स्थिती बदललेली असते. तशी ताकद या कांद्यात आहे. कांद्याचे अर्थशास्त्र हा अलीकडेच उदयाला आलेला विषय. सध्या अनेक जण यावर अभ्यास करून मते मांडत असले तरी प्रत्येक वेळी कांदा नव्याने हुलकावणी देतो व माध्यमांचा केंद्रबिंदू ठरतो. तसा हा अल्पायुषी जीव. तरीही प्रत्येकाला तो घरात साठवलेला असावा असे वाटत असते. करोनाकाळात त्याची प्रचंड साठवणूक झाली तरीही आता पुनश्च हरि ॐच्या काळात तो चर्चेला आलाच. मात्र औषधी म्हणूनही त्याचा वापर तुम्ही लहाणपणापासून बघत आला असाल. मिरगी किंवा घेरी आली की कांदा हुंगवणे, ऊन लागू नये म्हणून कांदा खिशात ठेवणे तुम्हाला ज्ञात असेलच’’-  शिक्षक तल्लीन होऊन सांगत असतानाच मागच्या बाकावर चुळबुळ सुरू झाली. समोरच्या बाकावरून हातोहात मागेपर्यंत पोहोचलेली एक चिठ्ठी त्याला कारण ठरली होती. त्यात लिहिले होते. ‘एखाद्याचा तास उधळवून लावायचा असेल तर सडका कांदा उपयोगी ठरतो’. गलबला खूपच वाढल्यावर एका आज्ञाधारकाने ती चिठ्ठी थेट शिक्षकांपर्यंत पोहोचवली. तेवढय़ात तास संपल्याची घंटा झाली. ‘कांद्याबद्दल यांना सांगण्यात काही अर्थ नाही.. सगळेच तज्ज्ञ झालेत,’ असे संतापाने बडबडत शिक्षक निघाले!