खर्चात यंदा विक्रमी बचत झाली, म्हणून कलाशाळेचे अधिष्ठाता मनोमन आनंदले होते. नाही तर दर वर्षी जीव मेटाकुटीला यायचा, खर्चाच्या तरतुदीसाठी सरकारकडे हात पसरताना. बरे या मोठ्या कलाशाळेचे विद्यार्थी एका प्रकारचे थोडेच?  ते विविध विभागांमधले. मग मातीकामाच्या विद्यार्थ्यांना सिरॅमिकची माती हवी, मुद्राचित्रण विभागाला जस्ताच्या जाडसर पत्र्यांच्या ‘एचिंग प्लेट’ , लिथोच्या चौकोनी शिळा आणि शाईचे डबे हवे, शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांना धातूची पूड आणि फायबरचा लगदा हवा… या साऱ्याच रोजखर्चाला करोना-वर्षात कात्री लागली. तरतुदीसाठी तगादे लावण्याचे काम वाचले, म्हणून अधिष्ठाताच नव्हे तर कार्यालयीन कर्मचारीवर्गही यंदा खूश दिसतो! पण मग याच कलाशाळेचे कला-अध्यापक त्रासलेले का?

‘ऑनलाइन शिकवण्याचा किती प्रयत्न करणार? काही गोष्टी विद्यार्थ्यांकडून करूनच घ्याव्या लागतात. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला उपकरणे वापरण्याचा- हाताळण्याचा- अनुभव हवा,  म्हणून विद्यार्थीदशेत प्रेते फाडावी लागतातच ना? मग चित्रकारांना कॅनव्हासवर रंग लावण्याचा अनुभव नको? आमचे एक कदमसर होते… ‘लोण्यासारखा’ रंग कसा लावायचा हे त्यांच्याकडून शिकलो आम्ही! पुढे आमची चित्रे विकली जाईनात तेव्हा लोण्याचा तो थर पातळ होऊ लागला खरा, पण आमची गोष्ट सोडा… पलीकडला तो शिल्पकला विभाग पाहा… विद्यार्थी वर्षभर इथे फिरकलेच नाहीत, तर काय मिळणार अनुभव? तडा जाऊ न देता ओतकाम करता येईल का या मुलांना? ‘घरी करा’ म्हणून किती सांगायचे? साधने नकोत? बरे, हल्लीची पोरे अशी की शिल्पकलेच्या फाउंड्रीत जाऊन पाहा म्हणून सांगितले तर नुसती सहलीला गेल्यासारखी जातात, अंग मोडून काम करायला नको यांना…’ असे या कलाशाळेतल्या अध्यापकांचे म्हणणे.

पण आजच्या ‘ऑनलाइन’ कलाविद्यार्थ्यांनाही स्वत:ची काही बाजू असेलच ना? अखेर त्यांना शिकायचे आहे म्हणूनच तर प्रात्यक्षिके आणि त्यासाठी खर्चाची तरतूद! मग त्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे, हे कळत नाही त्यांना? पेटून का नाही उठत हे विद्यार्थी? इतके मजेत कसे ते?

या विद्यार्थ्यांना आता प्रात्यक्षिके नसल्यामुळे भरपूर मोकळा वेळ मिळतो आहे. ‘जहांगीर आर्ट गॅलरी’सारखी गॅलरी बंद असली, तरी छोट्यामोठ्या खासगी आर्ट गॅलऱ्यांमध्ये प्रदर्शने पाहायला जाता येते… आणि वेळेच्या अशा या सदुपयोगातून या विद्यार्थ्यांना एक नवीच गोष्ट नेमकी लक्षात येते आहे…

… ती म्हणजे, रंगाला हात न लावताही हल्ली चित्रकार होता येते, प्रत्यक्ष मातीत हात न घालताही मातीकाम करता येते किंवा शिल्पकलेसाठी वजनी उस्तवारी न करताही शिल्पकार म्हणून मिरवता येते… ते कसे?

याचा एक साधासोपा मार्ग म्हणजे ‘असिस्टंट’ ठेवायचे. ते काम करतात, आपण केवळ त्यांना सांगायचे… ऑनलाइन कलाशाळेत मास्तर लोक सांगतात, तसे!  हल्ली बऱ्याच जणी, बरेच जण असे मदतनिसांच्या जिवावरच मोठे कलावंत होतात म्हणे… हो, पण बोलणे मात्र फड्र्या इंग्रजीत हवे, त्यासाठी आहेतच ऑनलाइन वर्ग!!

थोडक्यात, प्रश्न फक्त बोलण्याचा आहे. ते नाही जमले तर मात्र या मुलांना चित्रकारच काय, मदतनीसही होता येणार नाही, इतकेच!