हे पार्था, भावडय़ा तू हे काय केलेस? निर्णायक क्षणी गोंधळण्याची तुला नेहमीच सवय. वेळोवेळी अशा प्रसंगात तू माझ्याशी डिस्कस करायचास. त्या सुभद्रेचे लग्न शिशुपालाशी लावण्याचा घाट बलरामांनी घातल्यावर सुभद्रेला काय खलिता पाठवायचा आणि तिचे कसे हरण करायचे याची आयडिया मीच तुला दिली. मग आता सत्तासुंदरीची माळ आपल्या गळ्यात पायजेल म्हणून डाव टाकताना एवढय़ा घाईघाईने एकटय़ानेच पत्रप्रपंच कसा काय के लास. मला एक डाव विचारयचं तरी. अरे महाभारतातही भीष्म पितामहांचा पराभव के ल्याशिवाय विजय अशक्य हे समजल्यावर तोडग्यासाठी तू माझ्याकडेच आला होतास. आणि आता थेट महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्माचार्य अशी ओळख झालेल्या तुझ्या आजोबांशी बारा हात करण्याच्यावेळी तुझ्या मतीचा भुंगा कु ठल्या कमळात अडकू न पडला म्हणायचा. बरं एक नाही दोन दोन खलिते. आघाडीतील बिघाडीची ओरड शांत होत नाही तोच त्या सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा अशी थेट मागणी केलीस. नंतर श्रीराम मंदिराच्या उभारणीवरून पत्र. त्यावरून सुरू झालेले राजकीय रामायण सुप्रियाआत्याने लोकशाहीतील मतस्वातंत्र्याचा आधार घेऊन शांत के ले. पण ते सुशांत व सीबीआय..भलताच नेम धरलास भावडय़ा. त्यावरून किती महाभारत सुरू आहे बघितले ना. पार्थाच्या बाणांनी जखमी होऊन भीष्म शरपंजरी पडले होते. तुझ्या पत्ररूपी वाग्बाणांनी आजोबांचे मन जखमी झाले. त्यांची ओळख ही संयमी राजकारणी अशी. पण त्यांचाही संयम सुटला. नातू अपरिक्व आहे, त्याला कवडीची किं मत देत नाही हे त्यांच्या तोंडून निघाले. आता त्यावरून राष्ट्रवादीत नवीन महाभारत लिहिले जाणार म्हणतात. द्रौपदीच्या अवमानावरून ते महाभारत आणि आता तुझ्या अवमानावरून राष्ट्रवादीत महाभारत होणार अशी कु जबूज समाजमाध्यमांवर जल्पकांनी सुरू के ली आहे. पण एक कळत नाही, पार्थ हा तर भीष्म पितामह यांचा खूप लाडका होता. मग तुझे व आजोबांचे कु ठे बिनसले? मावळमधून लोकसभा लढवायचा हट्ट तुझा होता की घरातल्यांचा? तेव्हापासून नेम चुकतोच आहे. पार्थाचा नेम असा हवा की के वळ पोपटाचा डोळा दिसणार आणि आज्ञा झाली की अचूक वेध. तूही भविष्यातील युद्धासाठी इतकी तयारी लहानपणापासून के ली होतीस. पण मावळमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्याच भाषणात कार्यकर्त्यांच्या मनाचा वेध घेणारे वाग्बाण सोडायचे राहिले बाजूला धड बाणसुद्धा सुटले नाहीत. खासगीत खूप व्यवस्थित बोलतोस म्हणे. पण तुझी ती पहिलीवहिली भाषणे पाहून वस्त्रहरण नाटकात धनुष्याला लावणारे पात्रच डोळ्यांसमोर येऊ लागले. पक्षात कु णीच पाठराखण करत नाही म्हणावे तर थेट नवभाजपवासी नीतेश राणे तुझी पाठराखण करत आहेत.  काय चाल्लंय काय..

कदाचित आम्हीच चुकत असू.. कभी कभी मेरे मनमें विचार आता है की समोरच्यावर नेम धरण्यासाठी बाण लावताना तो नेमका उलटा लावण्याची ही तुझी पार्थशैलीच आहे की पोपटाच्या नावाखाली फळांनी लगडलेल्या झाडावरील फळांवर नेम धरत इतरांना कात्रजचा घाट दाखवण्याची पवारशैली?  ही तुझी पवारशैली निघाली तर थोडय़ा दिवसांनी आम्हीच तुझ्याकडे गीता शिकायला येऊ भावडय़ा.