‘सावधान, सब एक लाइन मे खडे हो जाव’ दरडावणीच्या सुरातला हा आदेश ऐकून मोरू दचकलाच. आपण पर्यटनासाठी आलो की परेडसाठी असा प्रश्न त्याला पडला. त्याने मागे असलेल्या बायकोला समोर उभे केले व हसू नको अशी तंबी दिली. तेवढय़ात जेलरसारख्याच आवाजात ‘गाइड’ ऊर्फ मार्गदर्शक म्हणाले- ‘डरो मत.. हे नुसते कारागृह नाही तर समाजजीवनाचे समग्र दर्शन घडवणारे पवित्र स्थळ आहे. आपल्या सर्वाच्या लाडक्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मसुद्धा जेलमध्येच झाला होता. त्यामुळे देवस्मरण करून माझ्यासोबत चला.’ त्याबरहुकूम साऱ्यांनी आत प्रवेश केला. मग गाइड अंधूकसा प्रकाश असलेल्या वऱ्हांडय़ातून जाता जाता साऱ्यांना जेलचा इतिहास सांगू लागला. विस्तीर्ण आवारातून वेगवेगळ्या बराकी असलेल्या इमारतीजवळ येताच गाइड थांबला. ‘त्या तिकडे बाबा, बापू, महाराज यांचे वास्तव्य असलेली बराक आहे. तिथे वेगवेगळ्या राज्यांतून आलेले कैदी आहेत, श्रद्धाळू पर्यटकांसाठी तेथे आमच्याच कच्च्या कैद्यांनी लावलेले पूजेच्या सामानाचे दुकान आहे. तेथून खरेदी करून तुम्हाला कोठडीपासून काही अंतरावर उभे राहून त्या लोकांची पूजा करता येईल. तेथे गुजरात व हरियाणाचे बापू व बाबा असल्याने स्त्रियांना नेता येणार नाही.’ हे ऐकताच मोरूची बायकोच्या हातावरील पकड आणखी घट्ट झाली. तरीही काही भक्त पर्यटक मोठय़ा उत्साहाने तिकडे गेलेच. मग गाइडने दुसऱ्या एका बराकीकडे इशारा केला. ‘तिथे नटनटय़ांना ठेवले आहे. त्यांचे नैसर्गिक चेहरे व तेवढाच नैसर्गिक अभिनय बघायचा असेल तर तिकडे जाऊ शकता. त्यासाठी जादाचे शुल्क भरावे लागेल.’ हे ऐकताच मोरूचा चेहरा उजळला. एरवी गर्दीमुळे बायकोला शूटिंग दाखवायला नेण्यास नकार देणाऱ्या मोरूने तिला आनंदाने तिकडे नेले. मग गाइडने जरा दूरच्या एका बराकीकडे बोट दाखवले. ‘तिथे सारे नामचीन गुंड व गँगस्टर आहेत. त्यांच्या बराकीत हिंडताना घोळका करून जाता येणार नाही. एकापाठोपाठ एक असा प्रवेश मिळेल. इथे चिलखत व हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. न जाणो एखादी गोळी कुठून सुटलीच तर वांधा नको. तरीही काही गडबड झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी पर्यटकावर राहील.’ हे ऐकून अनेक जण तिकडे जायला तयारच झाले नाहीत. नंतर गाइडने आणखी एका बराकीकडे बोट दाखवत तिथे मादक द्रव्यवाले आरोपी आहेत. त्यामुळे तिथे जाताना नाक व तोंडावर रुमाल बांधूनच जावे लागेल असे सांगितले. एवढे सांगूनही काही पांढरपेशे तिकडे जाऊन आलेच. बायकोने डोळे वटारल्याने मोरूचा नाइलाज झाला. पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळतोय हे बघून खुशीत आलेल्या गाइडने मग खूप दूर असलेल्या एका बराकीकडे इशारा केला. ‘तिथे सारे राजकीय नेते आहेत. त्यांच्यावर असलेले गुन्हे गंभीर असले तरी ते नेते आहेत याची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे तिथे ज्यांना जायचे आहे त्यांना एक प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागेल. तिथे कोणताही नियमभंग होताना दिसून आला नाही व सारे नेते सामान्य कैद्यांचे जीवन जगत होते असा मजकूर त्यात असेल. तिथे जे बघितले त्याची बाहेर वाच्यता करता येणार नाही.’ जेलरचे सांगणे संपताच मोरूसकट साऱ्यांनी प्रतिज्ञापत्र भरून दिले. मग सारे नेत्यांचे ऐषारामी जीवन बघून आले. परतीचा प्रवास सुरू झाला. गाइड बोलत असतानाच एका बराकीतून गोंधळ ऐकू आला. आमच्याही बराकीत पर्यटकांना आणा असे ते ओरडू लागले. गाइड आणखी ओरडून म्हणाला, ‘या बराकीत सर्व चोर, खिसेकापू आहेत. त्यांची भेट घडवून आम्हाला जेलचे नाव खराब करायचे नाही.. चला सगळे मेन गेटवर..’ हे वाक्य ऐकताच मोरू व त्याच्या बायकोने ‘आ’ वासला!