पब्जीवर बंदी आल्यामुळे चिन्मयला जरा मोकळा वेळ मिळाला होता. सकाळीच व्हॉट्सअ‍ॅपवर त्याने मामाच्या नेहमीच्या ‘गुडमॉर्निग’ला सविस्तर उत्तर दिले : ‘‘हाय मामा, गुड मॉर्निग. लॉट्स ऑफ लव्ह’’.. आणि पुढे हसरे चेहरे, गुलाब वगैरे. मामाने न राहवून विचारलेच- ‘काय आता पब्जी बंद ना?’ त्यावर चिन्मयने  उत्तर दिले असे नाही म्हणता येणार. त्याने चर्चाच सुरू केली. त्या मूळ मिंग्लिश (मराठी अधिक इंग्लिश) चर्चेचा मराठी अनुवाद असा – ‘‘मामा, तुला असं नाही वाटत की आपण स्ट्रॅटेजी बदलायला पाहिजे?’’

‘पण म्हणजे काय करायचं चिन्स?’ मामाही चिन्मयला, त्याच्या आवडत्या आणि सर्वात नव्या टोपणनावानं मुद्दाम संबोधून चिन्मयची ‘मन की बात’ जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागला. नवी पिढी पब्जीच्या आहारी गेली आहे, बंदीमुळे ही अवघड वयातली मुलं बिथरू शकतात, असं त्यानं वाचलं होतं.

पण चिन्मयचं उत्तर त्रोटक- ‘‘बदलायचं म्हणजे बदलायचं.. चेंज’’.

‘का रे बाळा? कोणी बदलायला पाहिजे?’

‘‘आपण म्हणजे, देशानं. देशाची स्ट्रॅटेजी बदलायला पाहिजे असं नाही वाटत तुला मामा?’’

‘हो रे, वाटतं ना.. पण सुचत नाही कशी बदलायची ते. तूच सांग ना चिन्स..’

‘‘मामा, आपण हे जे लडाखबिडाखला करतोय ना ते एकदम जुनाट आहे रे..’’

मामाची पंचाईत झाली. पोरगं अमेरिकेऐवजी चीनला शिकायला पाठवा म्हणतंय की काय? तरीही भाच्यासाठी शांत राहून तो म्हणाला, ‘म्हणजे तुला नेमकं कायकाय जुनं वाटतंय?’

‘‘मामा आपण वॉर करतोय चांगलं आहे, पण अरे एवढे लोक कशाला ठेवतो आपण तिकडे?’’

‘तिकडे म्हणजे कुठे?’

‘‘बॉर्डरवर.. एलओसी म्हणतात ना, तिकडे.. तिथे  चारजण पाठवले तरी चालेल’’.

‘अरे चौघेच कसे चालतील?’

‘‘चालतील. लेव्हल मात्र वरची हवी’’

‘लेव्हल? म्हणजे मराठीत हुद्दा का?’

‘‘असेल. चौघेही लेव्हल नाइनचे हवे’’

मामा आता मानसोपचारतज्ज्ञाला शोभेल अशी सहनशक्ती एकवटून संवाद सुरू ठेवणार होता. भाचा देशाबद्दल काहीतरी बोलतोय याचा आनंद मानून मामा म्हणाला- ‘मग काय होईल?’

‘‘मग ते चौघे दुष्मनला मारतीलच ना..’’

‘अरे चिनू, पण तिकडे तळ हवा ना आपला-’

‘‘काही नको तळबीळ मामा. त्यापेक्षा एक मोकळं घर बांधायचं तिकडे बॉर्डरवर. घरात जिना बांधायचा पण कठडा नाही बांधायचा त्या जिन्याला’’- चिन्मय तपशील भरू लागला.

‘जिना? पायऱ्या? रिकामा बंगला?’

‘‘हो. आणि तिथे पायऱ्यांवर एक तवा ठेवलेला पाहिजे’’ – चिन्मयचे हे बोल मामाच्या  आकलनशक्तीच्या पलीकडे होते. पण चिन्मय तिथे कल्पनाचित्र रंगवू लागला होता. चौघे आभाळातून पडणार, घरात जाणार, तो तवा एकाकडे असणार, मग शत्रूचा खातमा ठरलेला!

‘बॉर्डर वगैरे असूदे रे, पॉलिटिक्स असतं सगळं. बाकी पब्जी बंद केला म्हणून नाराज नाही ना? ’ – हे विचारताना मामाच्या मनात, हा अंमली पदार्थाकडे नसेल ना वळला, अशीही भयशंका.

‘‘नाही रे मामा, मोबाइल अ‍ॅप बंद केलंय फक्त. विकत घेऊन आपण कन्सोलवर खेळू शकतो पब्जी!’’ – हे ऐकून मामाची अवस्था, स्वत: झाडलेली गोळी तव्यावर लागून स्वत:च्याच दिशेने परत  आल्यासारखी!