सूत्रसंचालक – राहुल जिम अँड फिटनेस सेंटरच्या उद्घाटनासाठी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून स्वागत करतो.  ‘मंचका’वर बसलेले या जिमचे संचालक तथा या भागाचे जनप्रिय नेते गणपतराव दशमुखे, खास या कार्यक्रमासाठी आलेले पक्षाचे जिल्हा प्रभारी प्रभाकर दंडबैठककर व उपस्थित बंधू भगिनींनो. आता आपल्यासमोर दशमुखे उर्फ दाजीसाहेब या नव्या उपक्रमाविषयीची माहिती देतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो(टाळ्या).

दाजीसाहेब – व्यासपीठावरील प्रभारीसाहेब व शेकडोंच्या संख्येत जमलेल्या माझ्या मतदारांनो, पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून गेली पाच दशके मी आपल्या सेवेत आहे. आमच्या घराण्याकडून वंशपरंपरागत पद्धतीने सेवेचे हे व्रत अखंडपणे सुरू आहे. परिवार म्हणजे आमचा पक्ष व पक्ष म्हणजे देश या तत्त्वावर श्रद्धा ठेवत मी कायम दीनदुबळ्यांच्या सेवेला प्राधान्य दिले. अनेक चढउतार आले, पण पक्षाशी कधी बेइमानी केली नाही. आता राहुलजींच्या नेतृत्त्वात पक्ष पुन्हा सशक्त होतो आहे. अलीकडेच त्यांनी व्यायाम, कसरती, दंडबैठका, सूर्यनमस्कार या गोष्टींना प्राधान्य दिल्याचे आमच्या लक्षात आले. बदलाचे वारे म्हणतात ते हेच, असे आमच्या तातडीने लक्षात आल्याने आम्ही या उपक्रमाला आज प्रारंभ करीत आहोत. अनुकरणप्रियता हा आमच्या पक्षातील नेत्यांचा खास गुण. राहुलजींचा जन्म झाला तेव्हा आमच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या मुलांचे नाव राहुल ठेवले. आधी प्रियंकाच्यावेळी सुद्धा तेच घडले. घराण्यावरची निष्ठा सिद्ध करण्याची एकही संधी आम्ही सोडत नाही म्हणूनच या वादळात सुद्धा पक्ष टिकला (टाळ्या). गेल्या सात वर्षांपासून देशात ५६ इंचाच्या छातीने जोर धरलाय. शरीरसौष्ठवाचे, योगाचे महत्त्व सांगितले जात आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठीच आमच्या नेत्याने वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. या प्रयोगाला देशपातळीवर नेत नेत्याचे हात बळकट करणे हाच आमचा यामागील उद्देश आहे. नेता बळकट झाला तर पक्ष होईल व तो झाला तर आपसूकच सत्ता पदरात पडेल असा आजवरचा आमचा अनुभव आहे. स्वातंत्र्यचळवळीच्या काळात आमच्या पक्षात व्यायामाला आधीपासूनच महत्त्व होते. त्यामुळे आमचे नेते इंग्रजांच्या लाठय़ाकाठय़ा खाऊ शकले. तेव्हा पळ काढणारे आजचे सत्ताधारी याच व्यायामाची जाहिरात करू लागले आहेत. रोज दंडबैठका मारणारे शेकडो कार्यकर्ते गावागावातून तयार झाले तर या सत्ताधाऱ्यांना पिटाळून लावण्यास वेळ लागणार नाही.(प्रचंड टाळ्या). व्यायामाने मेंदू तल्लख होतो. विरोध करण्याची क्षमता वाढते.  शारीरिक तंदुरुस्तीसोबतच पक्षवाढीला चालना देणारा हा कार्यक्रम म्हणूनच महत्त्वाचा आहे. आमच्या नेत्याच्या दूरदष्टीची साक्ष पटवणारा आहे. सत्तेच्या सिंहासनाचा मार्ग ‘पुशअप’ मधून जातो याची खात्री आम्हाला आता पटली आहे. यामुळे सगळ्या थांबलेल्या प्रश्नांना गती मिळेल. तेव्हा सर्वाना विनंती आहे की त्यांनी या राहुल‘जी’मचा लाभ मोफत घ्यावा व त्यासाठी एक फार्म भरुन द्यावा. यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना आमच्याकडून मोफत ‘स्कूबा डायव्हिंग’चे प्रशिक्षण दिले जाईल. ते पूर्ण करणाऱ्यांना केरळच्या  किनाऱ्यावर राहुलजींची भेट घालून देण्यात येईल. एवढे बोलून मी माझे विचार संपवतो.

दाजींचे भाषण संपताच जमलेले कार्यकर्ते जिमचा फॉर्म घेण्यासाठी झुंबड करतात. ‘अरे प्रभारींचे भाषण राहिले’ असे सूत्रसंचालक ओरडतो, पण कुणीही त्याकडे लक्ष देत नाही. गोंधळातच कार्यक्रम संपल्याची घोषणा होते. तिकडे दाजी व प्रभारी  जिमच्या फलकासमोर फोटोसेशन करण्यात व्यग्र होऊन जातात.