हा संसर्गच आहे हो… करोनाचा नाही; तर वाटप संस्कृतीचा ! थोडीथोडकी नाही तर चांगलीच सत्तर वर्षे झालीत त्या संस्कृतीला. हे वाटप जनमानसात रुजवण्यात सर्वच पक्षाच्या नेत्यांचा वाटा आहे बरे का! त्यामुळे या नेत्यांना कमी लेखण्याचे काही कारण नाही. संकटे आली की अडचणीत सापडलेल्या सामान्यांना रांगेत उभे करून वाटपाद्वारे दिलासा देण्याची सवयच जडलीय या साऱ्यांना. मग ते अन्न असो वा वह्यापुस्तके किंवा साड्या, नाहीतर, हल्ली रेमडेसिविर असो… वाटपाशिवाय समाधानच मिळत नाही नेत्यांना, गरजू व गोरगरिबांची सेवा केल्याचे.  त्यामुळे ते तरी काय करणार? बिचारे लक्ष ठेवून असतात, वाटपाची स्पर्धा कधी सुरू होते यावर. तिकडे गुजरातमध्ये तिथला सत्ताधारी पक्षच या स्पर्धेत उतरल्यावर त्या पक्षाचे महाराष्टीय नेते कसे शांत बसणार? मग उतरले ते हिरिरीने स्पर्धेत. कुणालाही थांगपत्ता लागू न देता. पण विषम सत्तेने साऱ्यांच्याच प्रयत्नांचे बिंग फुटले. मग वाटप राहिले बाजूला व एकमेकांचे कपडे फाडण्याचा उद्योग सुरू झाला. आठवा ती उत्तररात्री पोलीस ठाण्यात झालेली धावाधाव. साधे सरळ असलेले नागपूरचे भाऊ; रात्र जागावी लागली हो त्यांना. करणार काय? शेवटी प्रश्न स्पर्धेला सुरुवात कोण करतो याचा आहे ना! दहा कोटींच्या पक्षाने मागे राहून कसे चालेल. आता तुम्ही म्हणाल ही सारी लढाई श्रेयवादाची. नाही हो, तसे नाही. गरजूंना मदत करणे हाच एकमात्र उद्देश हो त्यांचा. पक्षाकडून वितरित झालेले इंजेक्शन घेतले की करोना लवकर बरा होतो अशी श्रद्धा ठेवणारे हे लोक. उगीच सरकारने त्यांच्या पायात पाय अडकवला. आणि स्वत: काय केले तर महाराष्ट्रातही सत्तेतल्या नेत्यांना वाटपाची सवलत दिली. तीही गुपचूप. मग काय बारामती व नंदूरबारचे लोक सुटले सुसाट! आता या कहाण्या बाहेर आल्यावर जगातल्या सर्वांत मोठ्या पक्षाचा तिळपापड नाही तर काय होणार? सत्तेचा असा गैरफायदा घेण्यात काय हशील? त्यापेक्षा सोडा ना साऱ्यांना मोकाट. होऊन जाऊ द्या वाटपाची स्पर्धा. गरजूंना काय रेमडेसिविर मिळण्याशी मतलब… आणि वाटपकत्र्यांना ते पक्षाकडून वाटल्याचे समाधान. शेवटी फायदा लोकांचाच ना! असे घडले तर कचाट्यात अडकलेल्या उत्पादकांचा जीव तरी भांड्यात पडेल. भविष्यात पुन्हा या औषधाची गरज पडलीच तर कमळ, घड्याळ, धनुष्यबाण, पंजा अशी चित्रे छापलेल्या कुप्या त्याला आधीच तयार करून विकता येतील. संकटात मदत मिळालेले लोक सुद्धा अमूक चिन्हाच्या मात्रेमुळे जीव वाचला असे उघडपणे सांगू शकतील. आमच्या वाटपामुळे इतक्या लोकांचे प्राण वाचले असे फलक नेत्यांना लावता येतील. प्राण वाचलेले लोक या फलकांची पूजा करतील. मूठभरांच्या हाती संपत्ती एकवटल्यावर हजारो दु:खितांना मदत करण्याचा ‘वाटप’ हाच एक राजमार्ग हे लक्षात घ्या. हे तर काळाबाजाराला उत्तेजन असा विचारही मनात नका आणू…  संसर्ग दूर करण्यासाठीची सेवा आहे हो ही. त्याकडे पवित्र नजरेने बघायला शिका.

मग व्यवस्थेचे काय, जे रांगेत लागू शकत नाहीत त्यांचे काय, असले प्रश्न विचारूच नका. अहो, नेते आहेत म्हणून व्यवस्था आहे हे गुपित तुम्हाला अजून कळले नाही का? उगीच भ्रमात राहू नका. सध्याचा जमाना ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’चा. तेव्हा धावू द्या सर्वांना. करू द्या स्पर्धा वाटपाची. शेवटी काहीही करून करोना संपवण्याशी आपल्याला मतलब…

त्या व्यवस्थेचे काय करायचे ते पुढचे पुढे बघू!