होय, आहोत आम्ही मध्यमवर्गीय. तसेही आम्हाला कुणी हिंग लावून विचारत नाही. सारा राबता श्रीमंत व गरिबांसाठीच. मग चार पैसे कुठे वाचत असतील व स्वस्तात काही लाभ मिळत असेल तर का नाही गर्दी करायची? निवडणुकीच्या मोसमात मोफत साडय़ा वाटतात. बायकांना रांगेत उभे करतात. तिथे लोकलाजेस्तव जाऊ शकत नाही आम्ही. मग सेलच्या ठिकाणी केली गर्दी, तर फोटो छापता? आमच्या सुखाच्या कल्पना तरी काय असतात हो! मुलांना चांगले शिक्षण, खाऊपिऊ घालणे, खिशात थोडे जास्तच पैसे खुळखुळले तर पत्नीला एखादा दागिना, नाहीतर सटीसामाशी एखादी साडी. आता यावरूनही तुम्ही नाक मुरडाल, करोनाचा धाक दाखवाल, गर्दी जमवली म्हणून दुकानाला सील ठोकाल तर आम्ही जायचे कुठे? काय तर म्हणे त्या चेन्नईच्या दुकानात स्त्रियांसोबत पुरुषांनीही गर्दी कशी केली? अहो, स्त्रियांनी स्वत:साठी साडी घेणे व पुरुषाने स्त्रीसाठी घेणे यातला फरक तरी कळतो का तुम्हाला? त्यासाठी एखाद्या मध्यमवर्गीय घरातच जन्म घ्यावा लागेल तुम्हाला. होय, आमचे राहणीमान बदलले. वस्त्रांचे नाना प्रकार घरात दिसू लागले, पण साडीची सर नाही हो कुणाला!  म्हणा आता आम्हाला परंपरावादी, पण आम्ही पापभीरूही आहोत. घरची लक्ष्मी खूश तर सारे घर खूश, हीच आमची समाधानाची व्याख्या. मग थोडी गर्दी केली तर इतकी आवई उठवण्याची गरज काय? त्या करोनाला घाबरून किती दिवस घरात बसायचे? आणि आम्हाला लागण झाली तरी सरकार थोडीच येणार आहे मदतीला? पाहिजे तर कर्ज काढा पण तुमचे तुम्ही बघा असाच त्यांचा दृष्टिकोन. मग अशा स्थितीत भीतीला थोडे बाजूला सारून घरातल्या आनंदासाठी गर्दीतच शिरले तर फरक काय पडतो? त्या राजकारण्यांनी तिकडे बिहारमध्ये मतांसाठी गर्दी जमवली तर चालते पण आम्ही केली तर बोंबाबोंब! वा रे वा. अहो, आमचे जगणेच साचेबद्धतेतले. महिन्यात अचानक उद्भवलेला एखादा खर्च तोंडचे पाणी पळवतो. अशा वेळी चार पैसे वाचतील म्हणून सवलतीच्या योजनांवर नजर ठेवली तर त्यात वावगे ते काय? स्वस्तात मस्त साडी मिळणे हे बायकांसाठी किती अभिमानाचे असते याची कल्पनाही तुम्हाला येणार नाही. ‘भरजरी फाडूनी शेला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या पदराला’ हे गाण्यापुरते ठीक. आजकाल तर साडीला वाढलेल्या नखाचा ओरखडा लागला तरी अख्ख्या घराचा मूड खराब होतो. सुटसुटीत म्हणून एरवी ड्रेस घालणाऱ्या पत्नीला वेगवेगळ्या प्रकारच्या साडय़ा जमवण्याचा छंद असेल व त्यासाठी थोडी जोखीम पत्करावी लागली तर त्यात वाईट काय? शेवटी यातले अर्थकारणही तुम्हाला कधी तरी लक्षात घ्यावेच लागणार. एका साडीची खरेदी कितीतरी लोकांना रोजगार मिळवून देत असते. एका अर्थाने हा देशाच्या मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचाच प्रयत्न नाही का? तरीही नियमभंग झाला म्हणून ओरडता! आमच्या सारख्यांच्या घरात सुखी व स्वस्थ जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे साडी, हे तुम्हाला कधीच कळणार नाही. त्यासाठी या वर्गात जन्मच घ्यावा लागेल. करोना काय हो, आज आहे उद्या नाही पण घराला दु:खी करणारी कोणतीही साथ नको. त्यासाठी थोडाफार धोका पत्करला तर दुर्लक्ष करायला शिका ना राव!