मुंबईतला पूर म्हणजे पावसाने तुंबलेले रेल्वे मार्ग, उपनगरांतील रस्ते, दादर-हिंदमाताचा पाण्याखाली गेलेला भाग हे म्हणजे नेमिची येतो मग पावसाळाच्या चालीवर वर्षांनुवर्षे सुरू होते. गेल्या १२ वर्षांत मराठी वृत्तवाहिन्यांवरून नेहमीची ती यशस्वी दृश्ये दिसायची. मग कसे मुंबईकरांना पावसाळा आल्यासारखे वाटायचे. मग मुंबईत ठिकठिकाणी पाणी साठले तरी दक्षिण मुंबईत कसे पाणी साठत नाही याची चर्चा रंगायची. पण निम्मा पावसाळा सरल्यावरही यंदा तसे काही न झाल्याने मुंबईकरांना चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते. उन्हाळ्याच्या सुटीतील मौजमजा हिरावणारा करोना पावसाळ्यातील दरवर्षीचे हे हवेहवेसे दुखणे हिरावून घेणार की काय अशी शंका येत होती.

मात्र करोनाचा जोर माणसावर चालतो- निसर्गावर नव्हे – याची चुणूक बुधवारच्या पावसाने दाखवली. कधी नव्हे ते चर्चगेट, उच्च न्यायालय परिसर, गिरगावात दक्षिण मुंबईत पाणी तुंबले असे चित्र दाखवणारी छायाचित्रे, चित्रफिती वृत्तवाहिन्यांवर-समाजमाध्यमांवर दिसू लागल्या. मग काय ‘‘पैजेवर सांगतो हे सर्व त्या भुयारी मेट्रोमुळे. आता एवढे पाणी साठले ते पुढे त्या भुयारात साठेल. बोगस प्रकल्प आहे.’’ असे सूर व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठात-खासगी गप्पांत उमटू लागले. तिकडे मंत्रालयाच्या-हायकोर्टाच्या आसपास पाणी साठलेले बघून आणि मंत्रालयावरून मलबार हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर समुद्राचे पाणी आलेले पाहून, बरे झाले घरातूनच कारभार सुरू आहे, असा विचार कारभाऱ्यांच्या मनात हळूच येऊन गेला.

असे म्हणतात की, मंत्रालयातील अधिकारीही चिंतेत पडले. मुंबई बुडली तरी आपण सुरक्षित राहू अशा ठिकाणी सोसायटय़ा उभ्या केल्या; पण आता आधी करोना व मग पाण्याचे लोंढेही दक्षिण मुंबईत शिरू लागले या विवंचनेत ते पडले. शिवाय आता दक्षिण मुंबईपण सुरक्षित नाही. या भागात कसे पाणी साठू लागले, असा प्रश्नांचा भडिमार माध्यमे-विरोधकांकडून सुरू होईल, मंत्री महोदय विचारतील काय उत्तर द्यायचे..

विधिमंडळ अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यात तरबेज असलेल्या एकाने डोके  चालवले- ‘साहेब उत्तर ध्रुव म्हणजे उत्तर दिशा वरच्या बाजूला आहे आणि दक्षिण दिशा खालच्या बाजूला. आणि पाण्याचा स्वभाव हा वरून खालच्या दिशेला जाण्याचा असतो. मग उत्तर मुंबईत साठणारे पाणी कधीतरी दक्षिण मुंबईत येणारच ना? असे उत्तर तयार करू का?’-  हे विचारणारा मनोमन आपल्या अक्कलहुशारीवर व पांढऱ्यावर काळे करण्याच्या कौशल्यावर खूश होता. पण आयएएस साहेबांच्या नजरेत एकाच वेळी हसू व राग हे दोन्ही असल्याचे पाहात त्याने आणखी काही सापडते का बघतो असा खुलासा करत रजा घेतली. थोडय़ाच वेळात तो पुन्हा येऊन म्हणाला : साहेब, पुलंच्या चितळे मास्तरांनी विल्सन कॉलेजचा उल्लेख करताना ‘आमच्या वेळी गिरगावचा समुद्र विल्सनच्या पायऱ्यांपर्यंत यायचा’ असे पुलंना सांगितले होते. म्हणजे पूर्वीच्या काळी समुद्र गिरगाव चौपाटी ओलांडून येतच होता! यंदा त्या गिरगावच्या समुद्राने पुन्हा विल्सनच्या पायऱ्या धुतल्या इतकेच. महामारी नाही का सव्वाशे वर्षांनी परतली? तसेच हे! किती ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहोत आपण..!