श्री कोविडायनम: । करोनायनम:।

प्रिय सुहृद, सप्रेम नमस्कार विनंती विशेष.

प्रत्येकाला वाटते आपले लग्न व्हावे. त्यातील काहींना वाटते लग्न वेगळ्या पद्धतीने व्हावे. त्यामुळे काही जण समुद्राच्या खोल तळाशी जाऊन लग्न करतात. काही विमानात विवाहबंधनात अडकतात. पॅराशूटच्या मदतीने हवेत हेलकावे घेत वैवाहिक जीवनाची गाठ बांधणारेसुद्धा आपण बघितले आहेत. एका जपानी माणसाने तर बाहुलीशीच लग्न केले. आमचा तसा कोणताही हेतू नव्हता. म्हणजे असे वेगळ्या पद्धतीने बंधनात अडकण्याचा. मात्र सव्वा वर्षापूर्वी करोना विषाणूचे भारतात आगमन झाले. त्याने अनेकांच्या काळजाला नव्हे तर फुप्फुसालाच हात घातला. आम्ही उभयता काही वेगळे नसल्याने त्याने सध्या आमच्याही फुप्फुसात घर केले आहे. लग्न हे शुभकार्य म्हणजे पॉझिटिव्हिटी. आपल्याला सांगायला आम्हाला काहीही कमीपणा वाटत नाही की आम्ही दोघेही सध्या पॉझिटिव्ह आलो आहोत. या संसर्गावर सकारात्मकतेनेच मात करता येणे शक्य असल्याने आम्ही या स्थितीत लग्न करण्याचे योजले आहे. त्यामुळेच आम्ही या लग्नाला वºहाडी म्हणून सर्व पॉझिटिव्हांनाच बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. करोना म्हटले की नियम आलेच. ते आम्हालाही लागू असल्याने पीपीई किट घालून हा मुहूर्त साधला जाणार आहे. येणाऱ्या सर्वांनी येतानाच पीपीई पोषाख परिधान करावेत व सरकारी नियमाचे पालन करावे. लग्नाला येणाऱ्या निमंत्रितांनी त्यांचा ‘स्कॅनस्कोअर’ लक्षात घेऊन गरजेप्रमाणे प्राणवायूचे सिलेंडर व रेमडेसिविरचा डोस सोबत ठेवावा. ऐन मुहूर्ताच्या वेळी धावपळ नको यासाठी ही सूचनावजा विनंती आम्ही करत आहोत. अहेर शक्यतो आणू नये पण आणलाच तर तो व्यवस्थित सॅनिटाइज केलेला असावा. मंडपात उपस्थित असलेल्या सर्वांनी सामाजिक अंतराचे पालन करावे. सध्याच्या निर्बंधाचा काळ लक्षात घेता मंगलाष्टकानंतर वाजंत्री वाजणार नाहीत. केवळ सनईची मंगलमय धून वाजेल. त्यामुळे आनंद व उत्साहात येऊन कुणी नाचण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे पीपीई पोशाख फाटल्यास ती आमची जबाबदारी नसेल. अक्षतासुद्धा हाताला हिसका देत- जोरात- फेकू नये. त्यामुळेही किट टरकू शकते. किट घातल्याने प्रचंड घाम येतो याची आम्हाला कल्पना असल्याने संपूर्ण सोहळा दोन तासाच्या आधीच उरकला जाईल. या पेहरावात जेवणे शक्य नसल्याने प्रत्येकाला ‘लंच बॉक्स’ दिला जाईल व त्याचा दर्जा विलगीकरण केंद्रात मिळणाऱ्या जेवणाशी समकक्ष असेल. जेवणाचा मेन्यूसुद्धा सारेच आजारी असल्याचे लक्षात घेऊन ठरवण्यात आला असला तरी ते रुचकर असेल. प्रत्येकाने घरी अथवा केंद्रात जाऊन त्याचा आस्वाद घ्यावा व तेथूनच आम्हाला भरल्या पोटाने आशीर्वाद द्यावेत.

मध्य प्रदेशातील रतलाम व राजस्थानमधील केलवारा येथे झालेल्या लग्नाप्रमाणेच आम्हीसुद्धा या सोहळ्यासाठी प्रशासनाची मान्यता मिळावी असा अर्ज केलेला आहे. त्यामुळे कुणीही आपण बेकायदेशीर कृत्यात सहभागी तर होत नाही ना अशी शंका मनी बाळगू नये. लग्नात कुणाची तब्येत अचानक बिघडलीच तर रुग्णवाहिकेची व्यवस्था व डॉक्टरची सोय केलेली आहे. अन्य तजवीज मात्र स्वत:च करायची आहे.

तरी सर्वांनी या मंगलसमयी हजेरी लावून आम्हाला उपकृत करावे ही आग्रहाची विनंती.

आपले कृपाभिलाषी,

– वर व वधू