उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दक्षिण भारताकडे मुंबईतून लाखो मजूर रेल्वे-एसटीने रवाना होत होते आणि त्याच वेळी हजारो मजूर ताटकळत होते. राज्य सरकार म्हणत होते आम्हाला आवश्यकतेपेक्षा निम्म्याच रेल्वेगाडय़ा उपलब्ध होत असल्याने लाखो मजूर अद्यापही आपापल्या राज्यात जाण्यासाठी अधीर आहेत. मग एकाच वेळी असंख्य गाडय़ा महाराष्ट्रात दाखल होतात व त्यावरून पुन्हा राजकीय हमरीतुमरी असा सगळा राजकीय तणाव सुरू असताना अभिनेता सोनू सूद मजुरांसाठी धावतो. एकापाठोपाठ एक बसची व्यवस्था करू लागतो. ओडिशातील मुलींना त्यांच्या राज्यापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्थाही करून टाकतो.  एक अभिनेता इतके  करतो म्हटल्यावर त्या बातम्यांनी इलेक्ट्रॉनिक व समाजमाध्यमांचे अवकाश व्यापणारच. बसमधून जाणाऱ्यांना हात हलवत निरोप देणाऱ्या सोनूची छबी वारंवार दिसणारच. राज्यात महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सत्तेवर असताना एक ‘नॉन स्टेट अ‍ॅक्टर’ हजारो मजुरांना राज्यात परत पाठवतो म्हटल्यावर आजकाल अखंड प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या त्या राजभवनला सोनूची माया वाटणे स्वाभाविकच. सोनू सूदला या समाजसेवेसाठी चहापानाचे मानाचे निमंत्रण आणि भाजप नेत्यांकडून समाजमाध्यमांवर कौतुकवर्षांव असे सारे गोडीगुलाबीत सुरू होते. कोणी म्हणू लागले, बघा महाराष्ट्र सरकारऐवजी मजुरांना सोनू सूदचा आधार वाटत आहे. काय छान व्यवस्था करत आहे तो मजुरांची. मग कोणाला तरी मिर्ची लागणारच. तशी ती लागली आणि चित्रपटातील कथेने नाटय़मय वळण घ्यावे तशी या सोनूच्या आत्मनिर्भर मदतकार्याच्या चित्रपटाची पटकथा बदलू लागली. पूर्वी वांद्रेशी नकळतही वाकडे घेतले की आपले कसे वांदे होतात हे सर्वच कलाकारांना ठाऊक होते. पण गेली काही वर्षे तसे फारसे प्रसंग न आल्याने बिचाऱ्या नव्या पिढीतील सोनूस ते काय ठाऊक असणार? ठाकरे सरकारच्या बरोबरीने किं बहुना काकणभर अधिकच आपल्या या आत्मनिर्भर मदतकार्याची दिवसरात्र चर्चा सुरू असल्याच्या आनंदात तो होता. तिकडे मातोश्रीवर वेगळ्याच सामन्याची तयारी सुरू होती. मुंबईत कोणाचे भान सुटले की पूर्वी ठोकशाहीची चर्चा असायची.. आता कालानुरूप ‘रोख-ठोक’शाहीची असते. इशाऱ्याच्या तोफा गडाडल्या आणि रविवारी सकाळी महात्मा सोनू सूद आणि त्याचे भाजपनिर्भर मदतकार्य असे लेखणीचे फटकारे यांचे वृत्तांत वाहिन्यांवर दिसू लागले.

त्यातून आपल्याला चक्क महात्मा सोनू सूद असे विशेषण लावल्याचे कळल्यावर सोनूला आतल्याआत गुदगुल्या झाल्या. मग हळूच एकाने सांगितले, यांच्याच एका नेत्याने ‘नथुरामाचे पुतळे उभारा’ असे विधान के ले होते. ते ऐकताच उपरोधाने का होईना कोणी आपल्याला महात्मा म्हटल्याचा आनंद वाटायचे बंद झाले. कितीही ताकदवान असला तरी अभिनेता कधीच आत्मनिर्भर नसतो, दिग्दर्शकाला हवा तसा अभिनय करावा लागतो. एकच दिग्दर्शक कितीही आवडला तरी वेळप्रसंगी दुसऱ्या दिग्दर्शकासह काम करावे लागते हे आत्मज्ञान सोनूला झाले आणि नव्या दिग्दर्शकाची पटकथा ऐकण्यासाठी व सोबत काम करण्याच्या आणाभाका घेण्यासाठी त्याची गाडी कलानगरकडे वळली.