कसले बावळट माध्यमवीर आहात हो तुम्ही. एका तरुणाने थोडासा नियम वाकवून लस काय घेतली तर तुमचा ओरडा सुरू. म्हणे पुतण्याने लस घेतली, नियमभंग केला. अहो, तो भाऊंचा ‘दूरचा’ नातेवाईक आहे. कसा ते समजावून सांगतोच आता तुम्हाला. तो जो तरुण आहे ना, तो भाऊंच्या आजोबांच्या मोठ्या मुलाच्या मोठ्या मुलाचा मुलगा आहे. बघा, किती दूरचे नाते निघते ते. काय, नाही समजले? थांबा, आता समजेल अशा भाषेत सांगतो. तो भाऊंच्या वडिलांचे मोठे बंधू, जे विदर्भात तिकडे दूर एका खेड्यात राहात होते त्यांच्या मुलाचा सर्वात मोठा मुलगा आहे, जो भाऊंपासून खूप दूर राहतो. आता तुम्ही म्हणाल ही काय पद्धत झाली नाते सांगण्याची. तर तिकडे विदर्भात अशाच पद्धतीने नाती सांगितली जात असतील. आणि भाऊंचे म्हणाल तर कधीमधी ते त्या दूरच्या खेड्यावर भेटीसाठी जात असतात पण त्यांचा त्या तरुणाशी फारसा संबंध कधी आलेला नाही. तरीही तुम्ही गवगवा सुरू केल्याबरोबर भाऊंनी त्या तरुणासोबतची ‘दुरी’ स्पष्ट करतानाच नियम सर्वांसाठी सारखे असतात व ‘या ठिकाणी’ प्रत्येकाने त्याचे पालन करायलाच हवे असे सांगितलेच ना! तरीही तुमचे आपले सुरूच ‘सख्खा चुलतपुतण्या, काका अडचणीत, काकूंचा नातू, सख्ख्या चुलत भावाचा मुलगा’ वगैरे वगैरे. अरे, सख्खा व चुलत नातेसंबंध कुठे वापरतात हे तरी कळते काय तुम्हाला?

जिथे कुठे काका-पुतण्या दिसले तिथे धाव घेण्याची सवयच लागून गेलीय तुम्हाला या राज्यात! अरे, संपली ती पेशवाई कधीचीच. आतातरी बाहेर या त्यातून. हे मान्य की पुतण्या हा महत्त्वाचा ‘फॅक्टर’ राहिलाय राज्याच्या राजकारणात. म्हणून काय भाऊंच्या चुलत चुलत नात्यातील पुतण्याशीही संबंध जोडायचा. हो, असेल त्यांचे गोत्र, कूळ, मूळ, गाव एक. शेतीही एकत्रच असेल. पक्ष, विचार, परंपराही एकच असेल. म्हणून काय एका तरुणाने केलेल्या चुकीचे खापर भाऊंवर फोडायचे?  सुयोग्य स्पष्टीकरणानंतर त्यांनी या विषयावर मौन धारण केले असताना ‘काकू मला वाचवा’ अशी आरोळी ठोकल्याचा आभास निर्माण करायचा?

आता वतनदारीतले खेडे म्हटले की त्यात राहणाऱ्यांचा गोतावळा मोठाच असतो. कुणी ना कुणी नात्यात निघतच असतात. ते जवळचे की लांबचे हे ओळखण्याची क्षमता असायला हवी ना तुमच्यात. अशा गोतावळ्यातील तरुणांना नेतृत्व सिद्ध करण्याची घाई झाली असते. ते नियम मोडल्याशिवाय सिद्ध होत नाही, असली तर्कटे तर अजिबात काढू नका. तो दूरचा असला तरी विशाल परिवाराचा भाग असल्याने त्याला असले काहीही करता येणार नाही. आणि ते भाऊंवर टपून बसलेले राज्यातले सत्ताधारी, त्यांच्या नादाला तर अजिबात लागू नका. सत्ता आली की सख्खे, चुलतच काय पण आतले व बाहेरच्यांना गोळा करत लाभ पदरात पाडून घेणारे हे लोक भाऊंना शहाणपणा शिकवणार काय? दिल्लीतल्या घराण्यावर भिस्त असलेला त्यातला एक पक्ष तर रोज यावरून प्रश्न विचारतोय. अरे, त्या घराण्याने सुद्धा सख्ख्या चुलत भावाला व काकूला पार हद्दपार केले हे ठाऊक नाही का तुम्हाला? इकडच्या नात्यांकडे बोट दाखवण्याआधी जरा तिकडे बघा ना! भले ती गोष्ट जुनी झाली असेल पण इतिहास पुसला जात नाही ना!

तेव्हा माध्यमवीरांनो, कार्यक्षेत्रात काम करण्याआधी सख्खा कोण, चुलत कोण, नात्यातला व गोत्यातला कोण, दूरचा व जवळचा कोण, आपला व परका कोण हे आधी समजून घ्या…यावर ‘अभ्यास’ करायची तयारी असेल तर भोपाळच्या जनसंवाद विद्यापीठात तुम्हाला पाठवण्याची तयारी आहे भाऊंची!