हे बघा, मी माझ्या कुटुंबाची कशी जबाबदारी घेतली हे आधी समजून घ्या. सर्वात आधी राज्यशकटाची सूत्रे स्वीकारली. मोठय़ाला लाल दिवा मिळवून दिला. पत्नीला सल्लागाराच्या भूमिकेत सामावून घेतले. लहान्याच्या संशोधनाला राजाश्रय मिळवून दिला. किंबहुना कुटुंबाचे राजकीय आरोग्य सांभाळण्यासाठी मी जे केले तेच आता तुम्हाला तुमच्या कुटुंबात करोनासाठी करायचे आहे. कसे ते सविस्तर समजून घ्या. तुमच्या घरात कुणी आजारी पडलेच तर लगेच आरोग्य पथकाला फोन करून तशी नोंद करून घ्या. नंतर कुटुंबातील आजारी सदस्याला घेऊन डॉक्टर शोधायला निघा. तो मिळाला नाही तर नियंत्रण कक्षाला कळवा. तिथून प्रतिसाद मिळाला नाही तर वाट बघू नका. पुन्हा डॉक्टर शोध मोहीम सुरू करा. नशिबाने तो मिळाला व उपचार सुरू झाले की लगेच पथकाला कळवा. मग उपचारासाठी लागणाऱ्या पैशाची जमवाजमव करायला लागा. घरात नसतील तर काहीही विकावीक करा; पण पैसे गोळा करून ते डॉक्टर किंवा रुग्णालयात जमा करा. उपचार सुरू असताना दर तीन दिवसांनी सरकारी यंत्रणेला कळवत राहा. ती यंत्रणा नोंद ठेवेल व तुमच्यावर बारीक लक्ष ठेवेल. डॉक्टरकडून आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी करणे जबाबदारी ढकलण्यासारखे होईल. शासनाने सध्या रुग्णांच्या नोंदी ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे, मदत करण्याचे नाही. त्यामुळे फाजील अपेक्षा न बाळगता कुटुंबप्रमुख म्हणून पडेल तो त्रास सहन करण्याची तयारी ठेवा. बरेचदा सरकारी रुग्णालयाची मदत तुम्हाला मिळणार नाही. अशा वेळी खासगी रुग्णालयाची पायरी चढा. एकदा जबाबदारी स्वीकारल्यावर कितीही अडचणी आल्या तरी त्याला तोंड देण्याची तयारी ठेवली पाहिजे. या आम्ही आत्मसात केलेल्या गुणाकडे बघा. घरातील एक रुग्ण बरा झाल्यावर इतरांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. साथीचा आजार असल्याने वेळ न दवडता त्यांच्याही चाचण्या करून घ्या. त्यापैकी कुणी बाधित निघालाच तर पुन्हा सर्वात आधी शासनाला कळवून धावपळ सुरू करा. याच काळात आरोग्य खात्याचे लोक मध्ये मध्ये तुमच्या घरी येत राहतील व दारावर स्टीकर चिकटवून जातील. शेवटी तीही एक जबाबदारीच आहे, जबाबदारी झटकण्याचा प्रकार नाही हे लक्षात घ्या. रुग्णाची शुश्रूषा, धावपळ यातून जरा वेळ मिळालाच तर करोनाच्या जनजागृतीसाठी एखादा निबंध, नाटक, लेख यापैकी काहीही लिहिण्याचा प्रयत्न करा. यात जे उत्कृष्ट ठरेल त्यासाठी बक्षीस देण्याची योजना आम्ही आणणारच. या आजारात पाण्यासारखा पैसा गेला, आता बक्षीस काय देता असा अल्पसंतुष्टी विचार अजिबात मनात आणू नका. सकारात्मक विचार हाच या आजारावर मात करण्याचा उपाय आहे हे सूत्र लक्षात ठेवा. घरातील आजारी लोकांची जबाबदारी घेताना कधी तुम्हाला रुग्णवाहिका मिळणार नाही. ऑक्सिजनचा तुटवडा भासेल. कधी औषधांची चणचण जाणवेल.  मी तर म्हणेन, अशा वेळी  कुटुंबाची इभ्रत राखणे हीच आपली जबाबदारी आहे. या काळात मग सरकारची जबाबदारी काय, असा प्रश्न तुम्हाला पडेल तर राज्यातील प्रत्येक कुटुंब करोनाशी लढताना स्वयंपूर्ण कसे होईल हेच सरकारचे उद्दिष्ट असणार आहे. आमचे कुटुंब ब्रॅण्ड म्हणून ओळखले जाते. किंबहुना राज्यातील प्रत्येक कुटुंबाला अशी ओळख मिळावी हाच आमचा प्रयत्न असणार आहे. तेव्हा या संकटाची जबाबदारी स्वत: उचला. आम्ही मागून लक्ष ठेवून आहोतच!