28 November 2020

News Flash

पडद्याआडचे प्रयोग..

२०१४ पूर्वीचा भारत वाटला की काय यांना? आता नियंत्रणाच्या कायद्यामुळे सारे सुतासारखे सरळ येतील.

(संग्रहित छायाचित्र)

टिंगल काय, टवाळी काय, राष्ट्रीय नेत्यांची खिल्ली उडवणारे मिम्स काय, वाटेल तशी टीका काय, संस्कृतीला छेद देणाऱ्या मालिका काय, त्यातले बोल्ड सीन्स काय.. ऑनलाइन तसेच ओटीटीवर या साऱ्यांना जणू ऊत आला होता. आपल्याला अडवणारे कुणीच नाही अशा थाटात वावरत होते सारे. आता बसेल चपराक साऱ्यांना. २०१४ पूर्वीचा भारत वाटला की काय यांना? आता नियंत्रणाच्या कायद्यामुळे सारे सुतासारखे सरळ येतील. राष्ट्रभक्तीतून आलेल्या सत्तेची शक्ती म्हणजे गंमत वाटली की काय यांना? आमच्या राष्ट्रपुरुषाच्या विरोधात प्रचार करता काय? आता भोगा आपल्या कर्माची फळे..

..विचार करता करता त्यांना नव्या कायद्यातले एकेक कलम आठवू लागले. त्यांच्यासकट पक्षाच्या ‘आयटी सेल’च्या संशोधन विभागातील अनेकांनी गेले तीन महिने डोळ्यांत तेल घालून नियंत्रण कायद्याचा मसुदा तयार केला होता. आता राज्यकर्त्यांनी तो जसाच्या तसा स्वीकारल्यानंतर या साऱ्यांना आनंद झालेला. प्रमुख या नात्याने तेही खुशीत होते. खरे तर ऑनलाइन पोर्टल्स आणि समाजमाध्यमे यांवर आपलीच मक्तेदारी होती. २०१४ साली याचा खुबीने वापर केला तो आपणच. नंतर यात सारेच शिरले. सत्ता आल्यावर हळूहळू मुद्रित माध्यमेही आपलीशी झाली. वृत्तवाहिन्यांमध्ये तर सत्तानिष्ठा दाखवण्यासाठी जणू स्पर्धाच सुरू झाली. यातल्या काही अपवादांना सरळ करायचे तंत्रसुद्धा ‘सेल’ने विकसित केले. या गडबडीत नियंत्रणाविना राहिलेला हा ऑनलाइनचा वारू सुसाट सुटला. नेत्याची, पक्षाची सतत खिल्ली उडवू लागला. सातत्याने बहुमत मिळवणारा पक्ष हे कसे सहन करणार? शेवटी वळवळणाऱ्या या शेपटीवर पाय ठेवायची वेळ आलीच. मसुदा स्वीकारला गेल्यावर ‘सेल’चे प्रमुख नियंत्रण समितीवर काम करतील का, अशी विचारणा झाली; पण साऱ्यांनीच त्यास विरोध केला. शेवटी पडद्याआडचे नियंत्रण केव्हाही चांगलेच. तशीही राज्यकर्त्यांपेक्षा आपल्या ‘सेल’कडे संपूर्ण देशभरातली माहिती अधिक जलदगतीने गोळा होते. त्यामुळे ही समिती निव्वळ मुखवटाच राहणार हे स्पष्टच आहे. आता मारा म्हणा उडय़ा विरोधकांना! नियंत्रणाचा अधिकार वापरून एकेकाला आतच टाकायचे आता. आपले धोरण अगदी स्पष्ट आहे. या व्यासपीठावर जे सत्तेच्या समर्थनार्थ बोलतील, जे संस्कृतीचे रक्षण करतील त्यांचेच वर्तन ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य’ या व्याख्येत गणले जाईल. फक्त आणि फक्त त्यांचेच अधिकार हे मूलभूत असतील, जे सत्तेत नसलेल्या विरोधकांवर तुटून पडतील. त्यांच्याच हिताचे रक्षण केले जाईल. त्यांच्यासाठी न्यायाचे सर्व दरवाजे कायम उघडे असतील. जे सत्तेला विरोध करतील, संस्कृतीच्या विरोधात वर्तन करतील, त्यांच्यावर या कायद्याद्वारे नियंत्रण आणले जाईल. आमच्या लेखी लोकशाहीची खरी व्याख्या हीच. बाकी सारे मिथ्या. ओरडा किती ओरडायचे ते. तशीही आता ओरडण्यासाठी जागाच कुठे शिल्लक आहे म्हणा!

..विचार करता करता त्यांना एक गोष्ट आठवली. एका राज्यात एक जादूगार त्याच्या प्रयोगामुळे कमालीचा लोकप्रिय होतो. हे बघून राजाचे धाबे दणाणते. तो प्रधानांना मार्ग काढण्यास सांगतो. मग प्रधान या जादूगाराला त्याचे सारे प्रयोग सरकारकडून संमत करून घ्यावे लागतील असा फतवा काढतो. बिचारा जादूगार दरबारात येतो अन् एकेक प्रयोग करून दाखवू लागतो. त्याच्या प्रत्येक प्रयोगावर हा बालकांवर विपरीत परिणाम करणारा, हा महिलेचा अपमान करणारा, हा राजाला बदनाम करणारा असा शिक्का मारला जातो. शेवटी त्याच्याकडे करण्यासाठी प्रयोगच उरत नाही. गोष्टीचा आठव संपल्यानंतर ते जोरात हसले. आता त्यांचे हात नियंत्रणाच्या अंमलबजावणीसाठी शिवशिवू लागले होते..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 12:38 am

Web Title: loksatta ulta chashma india to regulate online news and social media sites zws 70
Next Stories
1 उप(ना)राजधानी
2 नाराजीचा गुंता
3 मीठकारण..
Just Now!
X