News Flash

खेला ना होबे..

शुक्ला यांनी निर्वाणीचे शब्द उच्चारताच सर्वच जण त्यांच्याकडे पाहू लागले.

टक.. टक.. टक.. गर्रगर्र फिरणाऱ्या पंख्याला चेंडू दोरीने बांधून रोहित शर्मा बंद खोलीत एकलव्याच्या निष्ठेने सराव करीत होता. त्याचे द्रोणाचार्य म्हणजे मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने समोरील लॅपटॉपवरून झूमद्वारे त्याला मार्गदर्शन करीत होते. स्टीव्ह स्मिथ हॉटेलच्या खिडकीपल्याडच्या काचेतून आकाशाकडे एकटक पाहात होता. राणीच्या बागेतील भेदरलेल्या हरणासारखाच तो भासत होता. शेजारच्याच खोलीत अजिंक्य रहाणे ‘ने मजसी ने परत मातृभूमीला..’ हे गाणे ऐकत होता. त्याच मजल्यावरच्या आणखी एका खोलीत, अनुष्का बाळाला तीट लावत असतानाच विराटही तिथे आला. दोघांनी खिन्नपणे बाहेर पाहिले. रांगडय़ा शरीरयष्टीचा ख्रिस गेल  स्वत:च्या खोलीतच व्यायाम करण्यात व्यग्र होता, तर प्रीती झिंटा संघाला मानसिक सामर्थ्यांसाठी योगासनांचे ऑनलाइन धडे देत होती. एकंदर हॉटेलमध्ये सर्वच जण नजरकैदेत अडकल्यासारखे. ‘जैव-सुरक्षा परीघ’ अर्थात ‘बायो बबल’ भेदून त्यात करोना प्रवेश झाल्यामुळे निर्बंध कडक करण्यात आले होते. त्यामुळे संघटनेचे सारेच जण धास्तावले होते. दादाने फर्मान सोडले. जैव-सुरक्षा परीघ कसा भेदला गेला, याचा शोध घेण्याचे एकच लक्ष्य स्कॉटलंड यार्ड, सीआयए, रॉ सर्वाना देण्यात आले होते. त्यानंतर उपाययोजनाही सादर करण्याचे निर्देश ऑक्सफर्ड, मेलबर्न आणि हार्वर्डच्या तज्ज्ञांना देण्यात आले होते. तरीही, बंगालमधील चिवट झुंजीच्या बातम्या आदल्याच दिवशी ऐकणारा दादा आत्मविश्वासाने म्हणत होता.. ‘खेला होबे’! ‘नंबरदोन’पुत्र जय यांचाही याला दुजोरा असणारच, याची खात्री होती दादाला.

पण काही तासांतच अहवाल मुख्यालयात दाखल झाले. त्यांची पाहणी करताना दादाच्या पायाखालची जमीनच सरकत चालली होती. खेळाडू वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात गेले आणि तिथेच नेमकी करोनाची बाधा झाली. त्यामुळे ‘आयपीएल’च्या जैव-सुरक्षा परीघात रुग्णालय, विमानतळ आणि खासगी विमान असावे तसेच सरावाप्रसंगी मुखपट्टीसोबत मुखावरण आणि पीपीई किट बंधनकारक हे सल्लागारांकडून आवर्जून नोंदवण्यात आले होते. रुग्णालयात व्हेंटिलेटर, सीटी-स्कॅन, एक्स रे ही यंत्रणा आयपीएल खेळाडूंसाठी निराळी हवी, शरीराच्या विविध अवयवांवर उपचार करणारे प्रशिक्षित वैद्यकीय पथकही आयपीएलसाठी निराळेच हवे..  शहर स्थलांतरासाठी विशेष विमाने हवीच पण आयपीएल खेळाडू उतरतील तेव्हा विमानतळावर अन्य कोणीही नको.. शक्यतो एका जैवसुरक्षा परिघातील खेळाडूंसाठी एक विशेष विमान असावे, दरवेळी त्या विमानाचा वैमानिक एकच असावा..  ही यादी संपेपर्यंत गांगुलीने समोरील ग्लासातील पाणी घटाघटा संपवले. वातानुकूलित कार्यालयातही त्याला दरदरून घाम आला. आयपीएलच्या प्रशासकीय पदाचा अनुभव घेऊन उपाध्यक्ष  झालेल्या शुक्लाजींनी त्याला धीर दिला. हे सल्ले बैठकीत चर्चेला येताच खर्चाच्या कोटी कोटी उड्डाणांचाही विषय निघणारच होता. इतका खर्च करण्यापेक्षा ‘आयपीएल’ न घेतलेलेच बरे!.. शुक्ला यांनी निर्वाणीचे शब्द उच्चारताच सर्वच जण त्यांच्याकडे पाहू लागले. जयने बापूंना फोन केला. बापूंनीही सल्ला दिला, ‘‘शुक्लाजी ठीक कह रहे है. टेन्सन बढ रहा है. स्थगित करवा दो.’’ मग दादांनी आदेश काढले : तूर्तास, खेला ना होबे..  ..जैव-सुरक्षित हॉटेलमधील सर्वच पंचतारांकित कोठडय़ांमधून तेव्हा नि:श्वास ऐकू आला!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 4:08 am

Web Title: loksatta ulta chashma ipl 2021 suspended due to covid 19
Next Stories
1 सल्ल्यांचे आगार!
2 शेतकऱ्यांशी कट्टी
3 पीपीई-विवाह
Just Now!
X