‘कोण रे तू? साधा एएसआय ना! म्हणजे पीआयच्या खालचा. तरीही मला भेटून तुमचे घरभाडे कसे माफ झाले असे विचारायची हिंमत करतोस’ मिशीला पिळ देत साहेब गरजल्याबरोबर त्यांच्या कक्षात अभ्यागतांसाठी ठेवलेल्या खुर्च्याच्या मागे उभा असलेल्या अधिकाऱ्याला घाम फुटला. खाली मान घातलेल्या त्याला बघून साहेबांना पुन्हा चेव चढला..

‘व्यवस्थेतल्या लहान माणसाने लहान्यासारखे वागायचे असते. नियम पाळायचे असतात. सरकारी निवासाचे भाडे थकवायचे नसते. तू माझ्यासारखा मोठा अधिकारी होऊ शकला नाहीस हा तुझा दोष- व्यवस्थेचा नाही; हे तुम्ही लोकांनी कायम लक्षात ठेवायचे. मला सांग, तू कुणाचे आदेश पाळतो. आमचे ना? मग हेही ध्यानात घे की आम्ही सरकारचे आदेश पाळतो. शेवटी अधिकारी असण्याचे काही फायदे असतात. आमचा स्तरही वेगळा असतो याची जाणीव तुम्हा ‘क्लास थ्री’वाल्यांना असायलाच हवी..’

साहेबांनी ‘पॉज’ घेताच तो हळूच म्हणाला, ‘पण सर माझी आई आजारी, मुलीचे शिक्षण..’

त्याला मध्येच थांबवत ते ओरडले ‘शटअप्, त्याच त्या गोष्टी ऐकायची सवय नाही मला. अरे आमची मुले शिक्षण घेतात, तुमची शाळेत जातात. आमच्या घरचे ‘सीक’ होतात, तुमच्या घरी आजारी पडतात. तुमची उपचार घेण्याची पद्धत वेगळी, आमची वेगळी. तुम्ही कुठेही राहून ते घेऊ शकता, आमचे तसे नाही. सेवेनुसार आमच्या उपचाराचा दर्जा ठरत असतो. आम्ही सरकारशी, ते चालवणाऱ्या पक्षांशी एकनिष्ठ असतो. तुमच्यासारख्या अन्यायाच्या तक्रारी करत नाही. जे एकनिष्ठ नसतात त्यांना अशी माफी मिळाल्याचे बघितले का कधी? पाहिले ना, त्या सत्यपालांचा माफी अर्ज कसा नामंजूर झाला ते? आमच्याकडून सरकारला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे फायदा होत असतो. त्यामुळे मिळतात आम्हाला अशा सवलती. त्याही नियमाच्या अधीन राहून. तुम्ही कितीही प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असाल तरी सरकारवरचे ओझे याच दृष्टिकोनातून तुमच्याकडे बघितले जाते. त्यामुळे फालतू अपेक्षा तुम्ही ठेवायच्याच नाहीत. समजले ना मी काय म्हणतो ते?’

‘पण सर माझे कारण वाजवी आहे. नियम सगळ्यांसाठी सारखेच असतात.’

तो हळूच म्हणाला तसे साहेब भडकले

‘वाद घालायचा आहे का रे तुला माझ्याशी. कसल्या नियमाच्या गोष्टी सांगतो तू मला. अरे अख्ख्या राज्यात अनुशासनप्रिय अधिकारी म्हणून ख्याती आहे माझी. कायदाप्रेमी म्हणून सारे ओळखतात मला. नियम आम्ही तयार करतो ते ठाऊक नाही का तुला. मग थोडय़ाफार सवलती पदरात पाडून घेतल्या तर गैर काय त्यात. चोवीस तास सरकारची सेवा करतो आम्ही. तुमच्यासारखी आठ तासाची डय़ुटी नाही करत. मग अशावेळी कुटुंबाची थोडी सोय बघितली तर त्यात वावगे काय? आणि तरीही सरकारने माफी दिली नाही तर लाखो रुपये एकरकमी भरण्याची धमक आहे आमच्यात. ‘मॅनेज’ करू शकतो आम्ही ते. तुझ्यात आहे का तेवढी ताकद? नियम हे सर्वासाठी सारखे असतात ही भाषणात सांगायची गोष्ट उरली. वास्तवात नाही. व्यवस्थेचा भाग बनून राहायचे असेल तर सवलतीची अपेक्षा न ठेवता निमूटपणे काम करणे उत्तम.  जा आता. उगीच डोके नको खाऊ.’

तो हातातली फाइल घेऊन जाण्यासाठी वळतो तेवढय़ात साहेब म्हणतात. ‘ए थांब. मी शिकत असताना वाचलेले शैल चतुर्वेदीचे एक वाक्य ऐक. बजेट बनानेवाला कभी बाजार नही जाता’ असे म्हणत ते गडगडाटी हसतात. तोवर तो खिन्न चेहऱ्याने बाहेर पडलेला असतो.