प्रिय देवूभाऊ, रामराम. सध्या देशभर सुरू असलेल्या खलित्यांच्या लढाईत तुम्हीही सहभागी झाल्याचे बघून आश्चर्य वाटले. तशीही पत्र लिहिण्याची तुमची सवय जुनीच म्हणा! त्यामुळे तुम्ही विरोधक या नात्याने सत्ताधाऱ्यांना जोवर लिहित होता, त्याची बातमी गाजायचीच. पण परवा तुम्ही सोनिया गांधींना पत्र धाडले. मग राहावले नाही म्हणून हा पत्रप्रपंच! भाऊ, हे मान्य की तुमच्या त्या दिल्लीवाल्यांनी सत्ताधाऱ्यांची तारीफ के ली म्हणून तुम्ही अस्वस्थ आहात. आपल्या विदर्भाच्या भाषेत सांगायचे तर ‘आपलीच मोरी आणि चूळ भराची चोरी’ अशीच ही अवस्था. स्पष्ट बोलतो, कारण अशा अवस्थेत तुम्ही हा पत्राचा मार्ग निवडला असल्याची दाट शक्यता आहे. पण, यातून तुम्ही स्वत:चेच हसे करून घेतले ना भाऊ! अहो, त्या सोनियाजी कमालीच्या हुशार आहेत.(निदान राहुलपेक्षा तरी) त्या उत्तर देणार नाहीतच, पण द्यायचेच झाले तर मोदींनी के लेल्या कौतुकाकडे बोट दाखवतील ना! राज्य चांगले काम करत आहे हे  देशप्रमुखानेच मान्य के ल्यावर विरोधी नेत्याकडे तक्रोर करण्यात हशील काय? सत्ता त्यांची आहे. त्यामुळे ते तर चांगलेच बोलणार ना! जसे तुम्ही देशातल्या सत्तेविषयी बोलता तसे! तक्रोर करायचीच असेल तर दिल्लीच्या तख्ताकडे करा. जे कौतुक झाले ते चुकीच्या गृहीतकावर आधारित होते हे त्यांना समजावून सांगा. तसे काहीच न करता  सोनियाजींचा पर्याय निवडला ना तुम्ही! अहो, त्यांचा पक्ष म्हणजे सत्तेच्या तीन चाकी रिक्षातील मागचे, तेही डावीकडचे चाक. अनेकदा हे चाक पंक्चर झाले तरी रिक्षा काही काळ धावतेच. त्यामुळे त्या चाकावर सत्तेची फारशी मदार नाहीच. सत्तेची सारी सूत्रे राज्यातल्या दोन साहेबांच्या हाती एकवटलेली. त्यातल्या मोठय़ा साहेबांना पत्र लिहायचे सोडून तिकडे दिल्लीत निशाना साधण्यात काय मतलब? तसेही काँग्रेसचे लोक पत्रव्यवहारात बरेच आळशी. सोनियाजींचे म्हणाल तर गेल्या दीड वर्षांत मोजून एक पत्र त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना पाठवले. पक्षातल्याच नेत्यांनी जास्त पत्रोपत्री सुरू के ली तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यात हा पक्ष माहीर. अशा स्थितीत त्या तुमच्या पत्राची दखल घेण्याची शक्यता कमीच. मग कशाला उगीच या पत्रोपत्रीच्या भानगडीत पडायचे? विरोधकांना खिल्ली उडवण्याची संधी उपलब्ध करून द्यायची. आपल्या भागात एक म्हण आहे बघा, ‘शेंडा ना बुडूक, नाचे तुडूक तुडूक’. अगदी तशी अवस्था करून टाकलीय भाऊ या तुमच्या पत्राने. अहो, मोठय़ा हिकमतीने यांनी सत्ता मिळवलीय, तुमच्या तक्रोरीच्या आधारावर सोडणार आहे का ते? नाही ना?  मग उगीच वेळ दवडण्यापेक्षा दिल्लीने आपल्याला उपलब्ध करून दिलेली हत्यारे वापरा की! शिवाय दिल्लीश्वरांनी किमान यापुढे तरी या रिक्षाची तारीफ करू नये याची दक्षता घेण्यासाठी त्यांना रोज एक गुप्त पत्र लिहा. त्या नितीनभौंचा सल्ला अव्हेरून पायाला भिंगरी लागल्यागत तुम्ही राज्यभर फिरता. जनतेत जाता. या कामाची लोक नक्की आठवण ठेवतील. किमान पुढच्यावेळी तरी !

अन् ती एकदा के लेली तारीफ अजिबात मनाला लावून घेऊ नका. गैरव्यवहाराच्या भाराने रिक्षा कशी उलटेल यासाठी प्रयत्न करा.त्यासाठी ‘गाडीभर पुरावे’ आणा. पत्र लिहिण्यापेक्षा ते केव्हाही चांगले. झाले. एवढेच सांगायचे होते.

मला ओळखले का? मी तुमचा बालमित्र, मूलवाला. लहानपणी तुमच्या आजोळच्या वाडय़ात कं चे खेळायचो. बोटांना व्यायामासाठी पत्रापत्रीपेक्षा तो खेळ कितीतरी चांगला होता!