तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचे आहे ना, मग अजिबात काळजी करू नका. आधीही या राज्यात जाती, धर्माचे स्तर होतेच. सुधारकांनी त्याविरोधात लढे दिल्यावर त्याची दाहकता थोडी कमी झाली असली तरी ते पूर्णपणे मिटले नाहीत. याचा अर्थ असा की येथील जनतेला स्तरीकरण ज्ञात आहेच. प्रश्न आहे तो या स्तरीकरणाच्या आत लावलेल्या नियमरूपी अस्तरांचा. त्यावर एकदा नजर टाकली तरी ते तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच दिवसांपासून येथे वास्तव्यास असलेल्या विषाणूचा स्वभाव सरकारने पुरेपूर ओळखला. त्याच्या चालीरीतीचा अभ्यास केला. त्यातूनच ही स्तरीकरणाची कल्पना समोर आली. आता बघा, तुम्हाला नगरहून बीडला जायचे असेल अथवा यवतमाळातून चंद्रपूरला तर तुम्ही बिनधास्त जाऊ शकता. बीडहून अकोला, अमरावतीला जायचे असेल तर मात्र कठीण! नियमच पाळायचा असेल तर स्तर एकमधून तीनमध्ये प्रवेश करताना शहरात पोहोचल्याबरोबर चाचणी करून घ्या. तीही दुपारी दोन किंवा चारच्या आत. नंतर पोहोचून ती करायला गेलात व पोलिसांशी सामना झाला तर विपरीत घडू शकते. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक शहराचा स्तर कोणता याचा फलक वेशीवर का नाही? अहो तो दर आठ दिवसांनी बदलणार आहे. वारंवार फलक लावणे व बदलणे ही चैन राज्याला परवडणारी नाही. तुम्ही जर व्यायामप्रेमी असाल तर मुक्कामाचे ठिकाण म्हणून स्तर एकचे शहर निवडणे केव्हाही उत्तम. दोन व तीन क्रमांकाची शहरे केव्हा चार, पाचमध्ये जातील याचा काही भरवसा नाही. फिरताना शुक्रवारी प्रवास होणार नाही याची काळजी घ्या. स्तर ठरवण्यासाठी हाच दिवस साऱ्या राज्यात निश्चित केला आहे. प्रवास सायंकाळी पाचला संपेल याची दक्षता बाळगा. स्तर तक्त्यात सर्व सुरू असे लिहिले असले तरी पाचनंतर व्यवस्थेला आवडणारी संचारबंदी सर्वत्र लागू आहे. ती असूनही हॉटेले रात्रीपर्यंत सुरूच कशी, असले प्रश्न विचारायचे नाहीत. हॉटेलात विषाणूला प्रवेशासाठी कमी वाव असतो, रस्त्यावर जास्त असे अभ्यासाअंती सरकारचे मत झालेले आहे. सकाळी फिरण्याच्या वेळा ठिकठिकाणी वेगळ्या आहेत, त्यामुळे जिथे जाल तिथे योग्य माहिती घेऊन झोपेचे नियोजन केले तर ते अधिक सोयीचे ठरेल. कोकणात जाण्याचा बेत असेल तर तो तातडीने रद्द करा. तिकडील बहुतांश भाग तिसऱ्या व चौथ्या स्तरावरच अडकला आहे. त्या विषाणूला कोकण का जास्त आवडते याचा शोध सध्या सरकारी यंत्रणा घेत आहेच. तो लागला की त्याचे निष्कर्ष यथावकाश जाहीर केले जातील. काही ठिकाणी जिल्हा एकच असला तरी शहर व ग्रामीणचा स्तर वेगवेगळा. त्यामुळे इकडून तिकडे जाताना दोन, चार व पाच या वेळा लक्षात ठेवा. अर्धा तास इकडेतिकडे झाला तरी ते खपवून घेतले जाणार नाही. ही स्तरीय कसरत सांभाळताना हातावरचे घडय़ाळ हा महत्त्वाचा घटक आहे हे कायम लक्षात असू द्यावे. हा विषाणू गमिनी काव्यात माहीर आहे असे लक्षात आल्याने त्याला कोंडीत पकडण्यासाठी सरकारने हा स्तरीकरणाचा डाव खेळला. त्यातले ठिकठिकाणचे वेगवेगळे नियम पाठ करताना तुम्हाला मानसिक थकवा येऊन भोवळ येणार नाही याची काळजी घ्या. तरीही ती आलीच व रुग्णालयात दाखल व्हावे लागले तर शुद्धीवर येताच ‘मला बाधा झाली नाही’ हे तातडीने सांगा, नाही तर विषाणूग्रस्त म्हणून तुमच्यावर उपचार सुरू होतील व ते महागात पडेल. तेव्हा, आपले राज्य ‘अनलॉक’ आहेच, पण फिरताना एवढी काळजी घ्या!