सारे काही सगळ्यांच्या मनाप्रमाणे झाले, हे नक्की. पण हे असे होणारच होते, तर त्याआधी एवढी रस्सीखेच का सुरू होती? हा प्रश्न शिल्लक राहील आणि खापर मोदींवरच फोडले जाईल.. त्यापेक्षा मोदींना श्रेय देणे अधिक चांगले, अशी घडामोड राज्यात घडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषद निवडीची आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत नऊ जागांकरिता नऊच अर्ज दाखल झाल्याने साऱ्यांनी सुटके चा नि:श्वास टाकला आहे. पण आधी ही निवडणूकच होणार नव्हती आणि होणार हे ठरल्यानंतर अगदी रविवापर्यंत, ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असेही चित्र होते. मोदी या नावामुळे शेवटच्या दोन दिवसांत तणाव निर्माण झाला. काँग्रेसने दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा के ली. त्यातील एक उमेदवार होते राजकिशोर ऊर्फ  पापा मोदी. काँग्रेसचे दुसरे उमेदवार मोदी यांच्यामुळे सारे गणित बिघडते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मोदी हे प्रत्यक्ष रिंगणात उतरले असते तर मतदान अटळ होते.  रविवारी दिवसभर काँग्रेस नेत्यांची मनधरणी करण्यात आली. करोनासंकट असताना, टाळेबंदी असताना मतदानाच्या खाईत ढकलण्याचा दोष काँग्रेसचाच ठरेल, हेही सांगून झाले. शेवटी दुसरे उमेदवार मोदी हे अर्ज दाखल करणार नाहीत हे स्पष्ट झाले आणि मतदान टळले म्हणून शिवसेनेने सुटके चा नि:श्वास टाकला. एका मोदी यांच्यामुळे निवडणुकीचा मार्ग प्रशस्त झाला आणि दुसऱ्या मोदींमुळे निवडणूक बिनविरोध पार पडणे शक्य झाले. ठाकरे यांना २७ मेपर्यंत विधिमंडळाचे सदस्य होणे बंधनकारक होते. विधान परिषदेची निवडणूक करोनामुळे लांबणीवर पडलेली, अशा वेळी राज्यपाल नियुक्त सदस्यपदाचा पर्याय होता. पण राज्य मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस करूनही राज्यपाल महोदयांनी मनावर घेतले नाही. शेवटी पंतप्रधान मोदी यांना हस्तक्षेप करण्याची विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांना करावी लागली. मोदी मदतीला धावून आले. मोदी यांच्यामुळेच विधान परिषदेच्या नऊ जागांची लांबणीवर पडलेली निवडणूक योग्य वेळेत घेण्यास निवडणूक आयोग राजी झाला. वास्तविक करोनाचे मुंबई किं वा राज्यातील संकट अद्यापही कमी झालेले नाही. निवडणूक पुढे ढकलली त्यापेक्षा नव्याने कार्यक्र म जाहीर झाला तेव्हा करोनाचे संकट जास्त होते. तरीही निवडणूक आयोगाने नव्याने तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्रातील निवडणूक पार पडली, पण विविध राज्यांमधील राज्यसभेच्या १८ जागांसाठी मतदान कधी घ्यायचे याचा अद्यापही निर्णय झालेला नाही. उद्धव ठाकरे-नरेंद्र मोदी संभाषणानंतर निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर केलेला दिसतो. अर्थात, स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाने पंतप्रधानांचा हस्तक्षेप मान्य के ल्याबद्दल टीकाही होऊ लागली. काही असो, यातून राज्यातील भाजप नेत्यांचा मुखभंग झाला. कारण राज्यपाल नियुक्ती करणार नाहीत व विधान परिषदेची निवडणूकही वेळेत होणार नाही, असे मांडे भाजपचे नेते खात होते. एका मोदींमुळे निवडणूक वेळेत होण्याचा मार्ग सुकर झाला तर दुसऱ्या मोदींच्या माघारीने निवडणूक बिनविरोध पार पडली. होणार होते ते झालेच, पण मदतीला मोदीच धावून आले!