ट्रम्पतात्या चीनच्या नावाने खडे फोडण्याची एकही संधी हल्ली सोडत नाहीत. कधी कुणी महिला पत्रकार चिनी दिसते म्हणून तिच्या प्रश्नावर अजिबात उत्तर न देता उलट ‘हा प्रश्न चीनलाच विचारा’ असे गुरकावतात, चीनकडून सज्जड भरपाई मागण्याची भाषा करतात.. पण हे दोन देश,  करोनाच्याही आधी ट्रम्प येण्यापूर्वी किती गोडीगुलाबीने वागायचे! ट्रम्प हे नोव्हेंबर २०१६ मध्ये निवडून आले, त्याच्या सहाच महिने आधी- म्हणजे १६ जून २०१६ रोजी चीनच्या शांघाय शहरात डिस्नेलँडचे उद्घाटन झाले होते. गावात एखादे मॅक्डोनाल्ड आहारकेंद्र निघाले तरी आपला देश ‘अमेरिकेच्या आहारी चालल्या’ची चिंता करतो आपण.. चीनमध्ये तर अख्खे डिस्नेलँडच अवतरले. डिस्नेलँड, त्यातली ती मिकी माऊस, मिनी माऊस, बॅम्बी हरीण वगैरेंची ‘डिस्ने परेड’, हौशी लोकांसाठी पोटात ढवळून काढणाऱ्या तरीही हव्याहव्याशा वाटणाऱ्या कितीतरी ‘राइड्स’, एकेका डिस्ने-चित्रपटाची याद जागवणारे थीम-शो.. हे सारे अमेरिकेचे वैभवच. ते अमेरिकेबाहेर पॅरिस, हाँगकाँग, टोक्योनंतर फक्त शांघायमध्येच अवतरले. इतकी छान मैत्री होती चीनशी अमेरिकेची. पण आधी ट्रम्प आले, मग तर करोनाच आला आणि ती मैत्री तुटल्याची खात्रीच होऊ लागली जगाची.

तशात, बाकीची‘डिस्नेलँड’ करोनामुळे बंद असताना शांघायचे डिस्नेलँड मात्र धूमधडाक्यात सुरू झाले! जगातल्या अनेक देशांमध्ये अजून साध्या ‘मॉर्निग वॉक’ला जाण्याची परवानगी नाही आणि चीनमध्ये मात्र डिस्नेलँडमध्ये दिवसभरात २४०० जण जाऊ शकतात, दिवसभर खिदळू शकतात, मित्रमैत्रिणी- आप्तेष्टांसह धम्माल करू शकतात. चिनी लोकांनी याला मोठाच प्रतिसाद दिला. आपल्याकडे परवा रेल्वेगाडय़ांची आरक्षित तिकिटे जशी दहा मिनिटांत संपली, तशीच शांघायच्या डिस्नेलँडची तिकिटे (मुलांसाठी २९९ युआन, मोठय़ांसाठी ३९९ युआन : म्हणजे ३१७२ आणि ४२३४ रुपये) पटापट संपून गेली. १२मेच्या मंगळवारी, रविवापर्यंतची तिकिटे उपलब्धच नव्हती, हवे असल्यास पुढल्या सोमवारची घ्या.. इतकी मागणी चिनी लोकांची!

आणि जगातील बाकी सर्व ठिकाणची, अगदी  अमेरिकेमधील ‘मुख्य’ डिस्नेलँडसुद्धा बंद. त्यामुळे नुकसान होत आहे, तरीही बंद तर ठेवावे लागणारच, असा तोंड दाबून बुक्क्यांचा मार अमेरिकी डिस्नेलँड सोसत असताना चीनची मात्र टामटूम. यावर कुणी म्हणेल : ‘‘पण डिस्नेलँड जरी चीनमध्ये असलं तरी मूळ कंपनी अमेरिकन आहे, म्हणजे फायदा अमेरिकेचाच होतोय!’’

त्यावर उत्तर असे की, चीनमधील डिस्नेलँडची कंपनी अमेरिकी नाही. शांघाय येथील या डिस्नेलँडची ५७ टक्के मालकी एका चिनी कंपनीकडेच आहे. त्यामुळे जो काही नफा होईल, त्यातही जवळपास ६० टक्के वाटा चिनी कंपनीचाच. शिवाय कंपनीची नोंदणी चीनमधली असल्यामुळे कर वगैरे सारे चीनच आकारणार.

अमेरिकेतल्या बंद डिस्नेलँडमधला मिकी माऊस बिचारा, शांघायच्या नाचत्यागात्या मिकीकडे कसा पाहात असेल? ‘चांगलीच शेंडी लावलीस की रे’ असा भाव असेल का अमेरिकी मिकीच्या मोठाल्या डोळय़ांत? असो किंवा नसो. शांघाय डिस्नेलँडची निम्म्याहून अधिक मालकी चिन्यांकडेच ठेवणारी ती कंपनी खूष असेल..  ‘शांघाय शेंडी ग्रुप’ हे त्या कंपनीचे नाव!