केळीच्या सुकलेल्या बागेतून चालतांना नाथाभाऊ संतापाने अगदी थरथरत जात होते. ‘गेम’ झाल्यावर थोडीफार नाराजी व्यक्त केली तर पक्षाच्या कार्यपद्धतीची आठवण काय करुन देतात. एकाच घरात किती पदे द्यायची असा सवाल करतात. स्वत:च्या कुटुंबासाठी हरीभाऊ जावळे व जगवानीचा गेम केला तेव्हा क्लेश वाटला नाही का, असे उपरोधाने विचारतात. अरे, पण मी पक्षासाठी खस्ता खाल्या, वाईट काळातसुद्धा पक्ष चालवला. त्यासाठी कधी तोडपाण्याच्या वाटेला शिवलो नाही आणि आता मलाच वाळीत टाकलेला मार्गदर्शक ठरवायला निघाले. आता दाखवतोच यांना म्हणत भाऊंनी जोरात एक झुरका मारत हातातली कांडी फेकून दिली.

तिकडे बीडमध्ये ताईंचा संताप शिगेला पोहोचलेला. त्यामुळे अख्ख्या घरालाच कोपभवनाचे रूप आलेले. मुख्यमंत्रीपदाची इच्छा जाहीर करण्यात चूक काय? आता मला सांगतात राजकारणात तेजीमंदी सुरूच राहते. काही काळ तग धरा!  पण मीही कच्च्या दिलाची नाही. वडिलांनी केलेले संस्कार माझ्या नसानसात भिनलेले आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची कला त्यांनीच मला शिकवलेली. मी शांत बसेन अशी अपेक्षा करू नका. आणि हो, घरातली भांडणं बाहेर नेऊ नका, असा सल्ला किमान मला तरी देऊ नका. ताई जोरजोरात पुटपुटत होत्या व घरातील सारे दाराला कान लावून ऐकत होते.

करोनामुळे घरातच अडकलेले विनोदजी तसे शांत होते. चेहऱ्यावर कोणतेही भाव न येऊ देता डोके शांत ठेवत खलबते आखायची त्यांची सवय तशी जुनीच. आधी समोरच्या दाराने जाऊ दिले नाही, आता मागच्या दारातून सुद्धा प्रवेश दिला नाही. एवढा अन्याय करून पुन्हा उघड बोलायला बंदी! पण मीही संघाच्या मुशीत वळलेला मराठा आहे हे यांना ठाऊक नाही. काटय़ाने काटा कसा काढायचा व आगही होऊ द्यायची नाही, ही शिकवण मला प्रभात शाखेतच मिळाली. सध्या तुमची चलती आहे. चालवून घ्या. एक दिवस माझाही येईलच की! मग दाखवतोच एकेकाला मर्दमराठा कसा असतो ते! असे काहीबाही पुटपुटत असताना वहिनी काळजीने डोकावून गेल्याचे दिसल्याने त्यांना थोडे हायसे वाटले.

घराच्या गच्चीवर चिंतामग्न उभे असलेले चंदूभाऊ कोराडी केंद्राच्या चिमणीतून निघणाऱ्या धुराकडे एकटक बघत होते. एकदा नाही तर दोनदा पत्ता कापूनही कारण कोणीच का सांगत नाही या प्रश्नाने त्यांचे डोके तापलेले. त्याचे उत्तर नागपूरचे दोन्ही भाऊ देत नाहीत. श्रेष्ठींची इच्छा हीच आज्ञा असेच सारे सांगतात. लोकशाहीत इच्छेचे रूपांतर आज्ञेला होते हे बघून चंदूभाऊ आणखी अस्वस्थ झालेले. छातीवर दडपण यायला लागले. धुरामुळे तर जीव कोंडत नसेल ना, अशी शंका क्षणकाळ त्यांच्या मनाला चाटून गेली.

त्याच वेळी,  नांदेडातील डॉक्टर महत्प्रयासने केलेली मुंबईवारी फुकट गेली म्हणून चरफडताहेत. राजकारणात जावे हे प्रत्येक कमावत्या डॉक्टरचे स्वप्न असते. ते पूर्ण होतेय हे बघून छायाचित्र काढताना स्टेथॅस्कोप घातला पण नशीबच फुटलेले. करोनाकाळातही डॉक्टरांची किंमत नसावी हे अतीच झाले.

या साऱ्यांनी अखेर दूर-दूर असूनही ठरवले :  दादा म्हणतात त्याप्रमाणे एकदा त्या नागपूरच्या इंद्राची छाती फोडून बघायचीच.. आपल्याविषयी किती सहानुभूती आहे ते!