‘आज माझे मन परत खट्टू झाले. जगभरातले अनेक लोक मला सांगत असतात की भारतात तुमचेच अनुयायी तुमच्या विचाराचा पराभव करत आहेत म्हणून! आजवर मी त्याकडे दुर्लक्ष केले, पण आता खात्री पटायची वेळ आली आहे. जो आश्रम मी मोठय़ा कष्टाने उभा के ला त्याच्या प्रमुख पदावरून तुम्ही एकाला दूर सारले. कारण काय तर ते गोडसेवादाकडे झुकलेले आहेत म्हणून! या वादाचा इतका धसका घेणारे तुम्ही माझे अनुयायी कसे? मुळात असा काही वाद असतो यावरच माझा विश्वास नाही. खरा वाद हा मानवतावादच. तोच मी आयुष्यभर सांगितला. म्हणूनच मला गोडसेची कधीच भीती वाटली नाही. दोनदा त्याने माझ्या हत्येचा प्रयत्न करूनही मी त्याला प्रार्थनेला येण्यापासून रोखले नाही. कारण माझा विश्वास हृदय परिवर्तनावर होता. एखाद्याचे विचार भिन्न आहेत, माझ्या मताच्या विरोधात जाणारे आहेत. म्हणून त्याला पदावरून काढावे अशी कृती मी कधी केली नसती. मतभेदातूनही माणूस जोडता येतो या तत्त्वावर माझा विश्वास होता. तुम्ही तर त्यालाच तडा द्यायला निघाले आहात. मी तेव्हाही सांगत होतो व आताही सांगतो. माझा विचार अंतिम नाही. कालानुरूप त्यात सुधारणा करत माणुसकी जागवत समाज सुदृढ करणे हेच तुमचे काम असायला हवे, पण  इतर अनुयायांप्रमाणे तुम्ही माझा विचार अंतिम असे समजू लागलात. तिथेच तुमचा पहिला पराभव झाला. तुम्ही समाजापासून दूर जात गेले. मनापासून सांगा, मी निर्माण के लेले आश्रम सांभाळणे, दिखाव्यासाठी सूतकताई करणे व येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करणे एवढेच तुमचे काम आहे का? आज देशावर एवढी अरिष्टे कोसळत असताना तुम्ही केवळ माझ्या नावाचा जप करत शांत बसला आहात. याला अनुयायी कसे म्हणायचे? दुर्दैवाने श्रमाची शिकवण तुम्ही विसरले आहात. कुणीतरी माझा पुतळा करतो. त्यावर गोळ्या झाडतो व त्याचा निषेध आश्रमाने करावा अशी तुमची अपेक्षा असते. तो केला नाही म्हणून तुम्ही कारवाईची भाषा करता. अरे झाडू द्या गोळ्या. त्याने माझा विचार मरणार आहे का? अशांना माफ करायचे असते किंवा दुर्लक्ष करायचे असते. मी आयुष्यभर अंगी जोपासलेला हा गुण तुम्ही विसरलात. मनशुद्धीतून विकारांवर मात करायला हवी हे मी सतत सांगायचो. तुमची मने तर विकारांनी ठासून भरलेली असावीत, अन्यथा तुम्ही हे पाऊल उचललेच नसते. लोकसहभाग हा माझ्या विचाराचा गाभा होता. तुमच्या कृ तीतून त्यालाच धक्का देण्याचे काम सातत्याने होताना दिसते. लोकांपासून दूर जात, स्वत:ला आश्रमात कोंडून घेत राष्ट्रहित साधले जाऊ शकत नाही. मी उभ्या के लेल्या लढय़ातसुद्धा वेगवेगळ्या विचारांचे लोक होते. त्यातून अनेकदा वैचारिक मतभेदही उभे राहिले, पण समाजोन्नतीच्या मुद्दय़ावर सारे एक व्हायचे. असा विशाल दृष्टिकोन तुमच्यात दिसत नाही. विरोधकांना माझी जेवढी टर उडवायची तेवढी उडवू द्या, पण किमान तुम्ही माझ्या विचारांना छेद देऊ नका..’

– आवाज ऐकू येत असताच गांधींची आकृती अंतर्धान पावली. मग हळूच ‘वैष्णव जन’ सुरू झाले तसे आश्रमातील सारे भानावर येऊन इकडेतिकडे बघू लागले.

गांधी कुठेच दिसत नव्हते!