फार फार वर्षांपूर्वी एक राजा होता. सुखाने राज्य करत होता. त्याच्या राज्यात कोणीही दु:खी नाही, खाण्यापिण्याची ददात कोणालाही नाही, अशी त्याची कीर्ती त्याचे भाट गात असत. सगळीच प्रजा खाऊनपिऊन सुखी असल्यामुळे गुन्हे नाहीत, गुन्हेगारही नाहीत, वाद-भांडणे होतात ती सामोपचाराने सुटतात, असाही त्याचा लौकिक बखरकार नोंदवत होते. काठीला सोने बांधून लोक सहज या गावातून त्या गावात जातात, अशा दंतकथा होत्या. अशा राजाच्या राज्यात अचानक एक मोठे दगडी बांधकाम सुरू झाले. बैलगाडय़ा आणि उंटाच्या गाडय़ा भरभरून चिरे आणवले गेले. पाथरवट दिवसरात्र काम करू लागले. हळूहळू बांधकामाला आकार येऊ लागला आणि लोकांनी ओळखले.. अरे, हे तर तुरुंगाचे बांधकाम!  तुरुंग कशाला हवा?

राजाला सारखे वाटे, आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आपल्याला सिंहासनावरून खाली खेचण्याचा प्रयत्न आपलीच भावंडे करतील. या भावंडांना एकेक प्रांत राजाने दिलेला होता, पण समजा ते काही तरी कट रचत असले तर? एवढय़ा एका शंकेपायी राजाने प्रधानजींशी मसलत केली. प्रधानाने दिलेल्या सल्ल्यानंतर ‘ते’ बांधकाम सुरू झाले. योजना काय? तर भावंडांना वाटून दिलेल्या प्रांतांमधून कोणीही राजधानीत आले, तर आधी त्याची रवानगी तुरुंगात करायची! तिथे त्याला चार दिवस चार वेगवेगळ्या प्रकारच्या अंधारकोठडीत ठेवायचे. सज्जन आणि पापभीरू माणसे अशा अनपेक्षित हल्ल्याने गांगरून जातात, पाचव्या दिवशी बाहेर आले तरी उदास राहातात. त्याची वर्तणूक तपासूनच मग नाना प्रकारच्या चौकशा करून त्याला सोडायचे. असे बेत प्रधानजींनी सांगितले आणि राजाने ऐकले. त्यासाठी हे तुरुंगाचे बांधकाम सुरू होते. पण खाऊनपिऊन सुखी लोक गप्प बसणार थोडेच? राजा तुरुंग उभारतो आहे, ही चर्चा कर्णोपकर्णी झाली. कुणाला तुरुंगात ठेवणार? कशासाठी? हे नागरिक मग बांधकामाच्या जागी गेले. मुख्य स्थपतीला विचारू लागले- ‘कशाचे बांधकाम हे?’ स्थपतीला प्रधानाची आज्ञा होती, कुणालाही सांगायचे नाही! स्थपती लोकांना म्हणाला, ‘मलाही माहीत नाही, पण असावा एखादा महाल’.

त्यावर लोक एका सुरात म्हणाले : ‘महाल? पण मग कुंपणभिंत एवढी उंच कशी? खोल्यांना खिडक्याच कशा काय दिसत नाहीत? आणि खोल्या इतक्या लहानलहान कशा?’

स्थपती गोंधळला. रात्री त्याने गुपचूप प्रधानाची भेट घेतली. प्रधानजींनी रातोरात राजाशी चर्चा केली. अखेर खोल्या थोडय़ा मोठय़ा करण्याचे ठरले. तरीही लोक कसले ऐकतात.. पुढल्या आठवडय़ात पुन्हा लोक बांधकामस्थळी आले आणि म्हणाले, ‘खोल्या आता वाटताहेत मोठय़ा. पण कुंपणभिंत अशी कशी? ती तुरुंगासारखीच दिसते!’ पुन्हा स्थपती प्रधानाला, प्रधान राजाला भेटला. अखेर कुंपणभिंतीची उंची कमी झाली.. त्या इमारतीत आता तुरुंग नव्हे, परगावच्या व्यापाऱ्यांसाठी यात्री निवास सुरू झाले!

ही कथा ‘इंटरनेट फ्रीडम फाउंडेशन’च्या कार्यकर्त्यांनी वाचली होती की नाही माहीत नाही. पण त्या कथेतल्या सुखी प्रजेने तुरुंग बांधणाऱ्या स्थपतीला जसे प्रश्न विचारले, तसे अनेक प्रश्न गेल्या दोन महिन्यांत या फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी ‘आरोग्य सेतु अ‍ॅप’बद्दल उपस्थित केले : अ‍ॅप वापरणाऱ्यांवर सरकार पाळत ठेवणार का? लोकांची विदा (डेटा) कोण वापरणार? आणि अखेरचा प्रश्न – ‘हे अ‍ॅप ‘ओपन सोर्स’ का नाही?’ या सर्व प्रश्नांवर सरकारी खाते, त्या स्थपतीसारखेच नरमले.

या ‘आरोग्य सेतु’ची चिरेबंदी ढासळल्याने त्या जुन्या गोष्टीचे नवे तात्पर्य उमगले : लोक प्रश्न विचारणारे असतील, तरच राज्य सुखी असते!