तो :  डोकंच आऊट झालं यार! काय एकेक निवाडे देतात हे लोक. आधी काय तर म्हणे पत्नीला पतीचा पगार जाणून घेण्याचा अधिकार आणि आता, ‘पतीला पत्नीची संपत्ती जाणून घेण्याचा अधिकारच नाही’. हो, हे मान्यच की पुरुषांनी स्त्रियांवर दीर्घकाळ अन्याय केला. पण, त्याचं परिमार्जन करताना असले निवाडे? समानतेच्या तत्त्वालाच हरताळ फासणारे? म्हणजे आता बायको ‘खास’, नवरा ‘आम’. अरे वा रे वा!  एकावरचा अन्याय दूर करताना दुसऱ्यावर होतो त्याचे काय? विषमता नष्ट करण्याची ही काय पद्धत झाली? आधीच सारे कायदे ‘त्यांच्या’ बाजूने. त्यामुळे घरी-दारी जीव मुठीत धरूनच वावरावे लागते. त्यात आता हे निर्णय. पुढचा काळ कठीण दिसतोय. अरे, अर्थाजन हा पुरुषार्थ.. त्यामुळे आर्थिक सूत्रे इतरांच्या हाती द्यायला ते सहजासहजी तयार होत नाहीत. अधिकाराचा संकोच पुरुषांनी का म्हणून सहन करायाचा? या निवाडाकारांना हे कधी कळणार कुणाला ठाऊक? आणि एखाद्याची बायको उधळपट्टीखोर असली तर मग काय? बिचारा तो कफल्लक होणार, शिवाय काही बोलायचीही सोय आता उरली नाही. समानतेच्या नावावर इतकी असमानता निर्माण केल्यावर पुन्हा ‘नाते विश्वासाचे’ असे कसे म्हणायचे?  तिच्या बाजूने असणाऱ्या वेगवेगळय़ा कायद्यांमुळे तसाही आमचा घरातला आवाज पार मवाळ झालाय. आता तर ‘दाखव ते पासबुक’असेही म्हणता येणार नाही. उद्या एखादे संकट आलेच कुटुंबावर व तिने हात वर केले तर पुरुषाने करायचे काय ? ती तशी वागणार नाही याची हमी हे निवाडाकार कधी देतील का ?

ती : या दोन्ही बातम्यांची कात्रणे जपून ठेवायला हवीत. कायद्याच्या धाकाने हात उगारणे थांबले पण अधिकार गाजवणे सुरूच. घरात काहीही घ्यायचे म्हटले की ‘आहेत ना, तुझ्या खात्यात पैसे’ हे ब्रम्हवाक्य ठरलेले. पर्स हुडकण्याची सवय तर प्रत्येक घरातल्या नवरोजीला. हळूच पासबुक बघण्यातून कसला असुरी आनंद  मिळतो कुणाला ठाऊक? स्वत: मस्त ऑफिस सुटल्यावर पाटर्य़ा झोडणार, उधळपट्टी करणार आणि घरी आले की ‘खर्च फार’ असा कांगावा सुरू. मग आहेच बायकोचे बचत खाते. या वृत्तीला आता चांगलाच चाप बसेल. सहनशील आहे म्हणून काय बाईनेच सारे सहन करायचे ? किती काळ ? पैशाचा विषय काढला की नेहमी खोटे बोलायचे,  चिडायचे, प्रतिप्रश्न केले की माहेरचा उध्दार ठरलेला. आता बघा कसे सुतासारखे सरळ येतील. कारवाईच्या भीतीने वरकमाई सुद्धा बायकोच्या हातात देतील. आम्ही पण कमावतोच ना! पण नात्यातला विश्वास नेहमी खरे बोलण्यातून दृढ होत असतो हे या पुरुषांना कधी कळणार? तसे होत नाही म्हणून तर असे निवाडे लागतात! नोकरी करायची, घरही सांभाळायचे, पडेल तो खर्चही करायचा व वरून यांचे हुडकणेही सहन करायचे. घराची शिदोरी म्हणून जमवून ठेवलेले सारे यांच्या हवाली करायचे. हे किती काळ चालणार? आता या निवाडय़ाने ही जमात वठणीवर येणार असे दिसते. भविष्यात ठरवलेच आहे. अगदी ठसक्यात विचारायचे. ‘दाखवा हो तुमचे पासबुक व पगार पावती’ यामुळे नाराज झाले तरी समजावण्याची कला उपजतच आहे की आमच्यात !