आजोबा गेल्यावर दुसऱ्या पिढीच्या चौघांसह आजी एकटीच उरली, म्हणून आता पंचकोनी परिवार! आई, बाबा, ताई, भाऊ आणि आजी असे या परिवारातले सारेच  व्यक्तिस्वातंत्र्यवाले. मध्यवर्ती ठिकाणच्या बंगल्याचं आता अपार्टमेंट झाल्यावरही मोठय़ाच घरात राहणारे. आजींना घरची चारही माणसं घरात दिसण्याचा योग अखेर करोनानं आणला. पाचही जणांना डायनिंग टेबल पुरत नाही असाही शोध याच आठवडय़ात लागला. पण दोनतीन दिवसांतच, जेवायला पुन्हा आई बाबा आणि आजी एवढेच बसू लागले. नातू- म्हणजे पंचकोनी परिवारातला ‘भाऊ’ आतूनच ओरडायचा ‘थांब गं.. मी घेईन हातानं..’ आणि त्याचं ते नेटफ्लिक्स का काय सुरू असायचं. काय पाहातो नेटफ्लिक्सवर? आजींनी विचारलं तर म्हणतो, ‘अख्खा सीझन एका दिवसात उडवतोय’! कसले सीझन? तर ते सिनेमेच म्हणे, पण अनेक भागांचे. आपल्या मालिका असतात तसे. ते पाहायला एवढे मोठ्ठाले हेडफोन लावावे लागतात? भाऊनं हेडफोन आजीच्या कानाला लावला.. आजी दचकल्याच. ही गोष्ट कालची. ताई सारखी मोबाइलवर चॅट करते, फेसबुकवर मतं मांडते, ट्विटर पाहाते, इन्स्टाग्रामवर फोटो टाकते.. ‘इतक्या दिवसांनी सगळे भेटतायत’ असं मध्येच व्हीडिओकॉलवर म्हणते.. भेटतायत म्हणजे, घराबाहेरचे हो!

त्या मानानं बाबा शांत. किंडलवर अ‍ॅगाथा ख्रिस्ती वाचत बसायचे. किंडल मूळचा भाऊचाच, पण त्यानं कसलेतरी पॉइंट्स जमवून आणलेला. म्हणजे फुकटच म्हणे.

टीव्हीत सास्वासुनांची भांडणं रंगायची. ती पाहायला आई – म्हणजे आजींची सून- सरसावून बसायची. आजी मागे आरामखुर्चीत. टीव्हीसमोर कधी भांडणं नाही झाली, पण रुसवेफुगवे एकमेकींचे एकमेकींना कळत. आजी मध्येच म्हणायच्या, अगं ते बाळूमामा लाव.. हनुमानाची हिंदी मालिका लाव.. आई काहीतरी निमित्त काढून विषय बदलायची; चॅनेल नाही. पण हे रोजचंच. करोनाच्या आधीपासूनचं.

हल्ली आणखीच तिसरं. बाबा मध्येच दुपारी म्हणतात, अगं ती यांची प्रेस कॉन्फरन्स आहे.. बघायचीय. निवृत्त बँक अधिकाऱ्याला प्रेस कॉन्फरन्समध्ये एवढा रस? ‘अगं आर्थिक आहे ते’ असं आजीला दटावलं जायचं.

गुरुवारी दुपारची गोष्ट.. काय ती प्रेस कॉन्फरन्स वगैरे आजही पार पडली होती. ‘आपली नातवंडंही इंग्लिश शाळेत शिकली.. पण या मंत्रीणबाईंचं इंग्लिश वेगळं आहे’ असा विचार करत आजी आरामखुर्चीत पहुडल्या. तेवढय़ात आतून ताई हाकच मारत आली.. ‘ए आज्जी, हे बघ हे बघ.. तुझ्यासाठी छान बातमी..’ दूरदर्शनच्या प्रमुखांचा ट्वीट दाखवत ताई आजीला म्हणाली, ‘रामायण – महाभारत पुन्हा सुरू होणारै’..

‘क्काय म्हणतेस काय? बापरे!’ – या बाबांच्या ओरडण्यानं दुसऱ्या खोलीतून भाऊही बाहेर आला. ‘काय हो, काय झालं?’ विचारू लागला..

‘काही नाही..’ म्हणत बाबा पुन्हा किंडलकडे वळले. किंडलच्या पडद्यावर अक्षरांऐवजी १९९० पूर्वीचा तो काळ तरळू लागला.. रामायण टीव्हीवर जोरात होतं.. देशाची अर्थव्यवस्था रसातळाला जाऊ लागली होती.. तीन वर्षांत, सोनं गहाण ठेवायची वेळ आली होती..

किंडलचा पडदा धूसर होत असताना, पंचकोनी परिवारातल्या बाकीच्या चौघांच्या डोळय़ांपुढले तीन पडदे नेहमीसारखेच हलत  होते!