कर्नाटक  राज्यच नव्हते, म्हैसूर राज्य होते, तेव्हापासूनची एक परंपरा अशी की, इथे मुख्यमंत्रिपद बहुतेकदा विभागून असते. ६८ वर्षांत २८ वेळा मुख्यमंत्रिपदाचा खांदेपालट झाला. या पदावरले चेहरे भले आलटून पालटून तेच ते असतील, पण प्रत्येकाच्या वाटय़ाला सरासरी अडीच वर्षेच आली. अपवाद म्हणून, ६८ वर्षांत फक्त चौघांनीच सलग पाच वर्षे मुख्यमंत्रिपद टिकवले. या चौघा कर्नाटकी भाग्यवंतांमध्ये ना विद्यमान मुख्यमंत्री येडियुराप्पा आहेत, ना अलीकडेपर्यंत मुख्यमंत्री असलेले एच. डी. कुमारस्वामी. उलट  एकविसाव्या शतकात कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी आलटून पालटून असणारी जोडी म्हणजे येडियुराप्पा आणि कुमारस्वामीच. कर्नाटकी राजकारणच इतके अड्डातिड्डी की इथे कुणाचीही ‘मी पुन्हा येईन’ म्हणून खिल्ली उडवण्याचा प्रश्नच येत नाही आणि तशी खिल्ली उडवण्यासाठी मुळात कुणालाही, आपण पुन्हा येणार असल्याचे सांगावेसुद्धा लागत नाही. जो एकदा मुख्यमंत्री झाला तो पुन्हादेखील होऊच शकतो, हा तर्काचा धागा सत्तेच्या कर्नाटकी कशिद्यात इतका वापरला जातो की, ‘कापडाच्या दर्शनी बाजूला जितके भरतकाम दिसते तितकेच मागच्या बाजूला असले, तरच तो ‘कर्नाटकी कशिदा’’ ही व्याख्या तंतोतंत खरी ठरते! आज हे;  तर उद्या ते. यांना झाकावे, त्यांना काढावे. मग पुन्हा त्यांना झाकावे.. याला कुणी हौसेने ‘ऑपरेशन लोटस’ वगैरे म्हणतात, पण हे असे बोलणारे लोक उत्तरेकडले. बोलत नाहीत ते कर्नाटकी.  करतात ते कर्नाटकी.  काय केले नंतर पाहू, करायचे म्हणजे करायचे. हेच सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षांना माहीत असल्यामुळे इथे विनाकारण लग्नाबिग्नांवरून वाद होत नाहीत. म्हणजे लग्नात होणारच की हो रुसवेफुगवे; पण ‘करोनाकाळात लग्नसोहळा कशाला?’, वगैरे वादंग होत नाही. झालाच तरी त्याला राजकीय स्वरूप अजिबात येत नाही. कुणी तरी जिल्हा पदाधिकारी उठतात, माध्यमांशी काही तरी बोलतात, पदाधिकाऱ्यांना प्रसिद्धी आणि स्थानिक माध्यमांना बातमी मिळते, मग वाटल्यास इंग्रजी माध्यमे आवडीनुसार ही बातमी भाषांतरित स्वरूपात वापरतात..  एवढे सारे झाले तरीही राज्यस्तरीय नेत्यांनी लग्नावरून झालेल्या वादात उडी घेतली, असे कर्नाटकात होत नाही. १२ मार्च रोजी कर्नाटकात करोनामृत्यू घडल्यावर राज्यात आपत्ती कायदा लागू करणारे मुख्यमंत्री येडियुराप्पा लगेच १५ मार्च रोजी बेळगावात स्वपक्षीय विधान परिषद सदस्य महंतेश कवटगीमठ यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यास उपस्थित राहून दोन हजार अन्य पाहुण्यांसह वधुवरांस आशीर्वाद देतात, यावरून मोठा वाद जसा होत नाही, तसाच बेंगळूरुनजीक भव्य फार्महाऊसमध्ये माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे चिरंजीव आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू निखिल १७ एप्रिल रोजी विवाहबद्ध होतात, तेव्हाही वाद होत नाही. उलट, कर्नाटक पोलीसच ‘हा सोहळा नियमानुसार झाला’ असे सांगून वाद मिटवतात!  कर्नाटकचे कर्तेपण दिसते, ते इथे..  सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांचे सामंजस्य दिसते, तेही इथे. भले सत्तेसाठी  महिनाभर एकमेकांना भंडावून सोडू, पण सत्तेचा टाका जमला की पुन्हा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या एकाच नाण्याच्या- किंवा अंतरपाटाच्या-  दोन बाजू!