दिवस कसाबसा निघून जातो हो, पण रात्र काही के ल्या पुढे सरकत नाही, असा अनुभव सलग महिनाभर घेणाऱ्या तमाम तळीरामांसाठी सोमवारची सायंकाळ उकाडय़ात थंड वाऱ्याची सुखद झुळूक यावी तशी ठरली. करोनाकाळामुळे सर्वात व्यस्त असलेले आमचे राजेश भाऊ अचानक मदिरेवर बोलते झाले आणि त्याविना शुष्क झालेल्या लाखो कं ठात उत्स्फू र्तपणे ओल निर्माण झाली. दुकाने सुरू करायला हरकत नाही, फक्त सामाजिक अंतर पाळायला हवे. या भाऊंच्या सूचनेने राज्यभरात जंगी स्वागत झाले. मदिरेविना झोप गमावलेल्या लाखोंनी रात्रभर भाऊंच्या ट्विटरवरील सूचनेला चिवचिवाट करत जोरदार प्रतिसाद दिला. कुणी पाच तर कुणी दहा फूट अंतर ठेवून रांगेत उभे राहण्याची तयारी दर्शवली; तर कुणी रांग एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत गेली तरी हरकत नाही, पण अंतर पाळूच अशी हमी दिली. या चिवचिवाटात मध्येमध्ये चोच मारणारे काही शहाणे सुज्ञ होते. नका करू हो दुकाने सुरू, घरात भांडणे वाढतील असा राग ते आळवत होते. त्यांना गप्प बसवण्यासाठीसुद्धा मद्यप्रेमींची ताकद बऱ्याच प्रमाणात खर्ची पडली तरीही त्यांचा उत्साह कायम होता. वाळवंटात विहीर दिसल्यावर माणूस आनंदी होतो हे आतापर्यंत ठाऊक होते, पण मद्य मिळणार ही बातमी मद्यप्रेमींच्या कल्पना विस्ताराला भरारीसुद्धा देऊ शकते हे रात्री उमजले. या बंदीमुळे राज्याचे आर्थिक नुकसान कसे होत आहे इथपासून ते ही बंदी हटल्यास रस्त्यावरची गर्दी कशी कमी होईल असे अनेक ‘खयाली सुझाव’ भाऊंना दिले गेले. अवैध विक्रीमुळे आरोग्यावर कसा परिणाम होत आहे. गुन्हेगारीत कशी वाढ झाली आहे याची साद्यंत आकडेवारीच काहींनी सादर के ली. रोज माफक मद्यप्राशनामुळे करोनाचा विषाणू कसा दूर पळतो याचे वैद्यकीय दाखले देणारे महाभागसुद्धा यात होते! शिवाय कधी सुरू करणार, किती काळ सुरू ठेवणार असे भांडावून सोडणारे प्रश्न विचारणारे  उत्सुकसुद्धा बरेच होते. अर्थात रात्रभर चाललेल्या या ट्रेंडकडे भाऊंनी फार लक्ष दिले नसावे. सकाळी मात्र त्यांनी मी त्या खात्याचा मंत्री थोडाच आहे असा खुलासा हळूच करून टाकला. अर्थातच त्यांच्या या पवित्र्यामुळे रात्रभर आस लावून बसलेल्या प्रेमींच्या पदरी अपेक्षाभंगाचे दु:ख आले. भाऊंनी आपल्यासोबत ‘गेम’ खेळला की करोनावर वारंवार बोलून थकल्यामुळे थोडा विरंगुळा म्हणून हा आशेचा बॉम्बगोळा टाकला या पेचात आता सारे प्रेमी अडकले आहेत. साथीच्या आजाराची ही लढाई लढताना व त्यासाठी साऱ्या यंत्रणेत चैतन्य निर्माण करताना भाऊंची जीभ कधी घसरल्याचे दिसले नाही. मात्र कालच त्यांना काय बरे झाले असावे हा प्रश्न आता अनेकांना छळतो आहे.

चाणाक्ष राज्यकर्ते बंदी घालताना किंवा ती उठवताना जनतेच्या मनाचा अदमास घेत असतात असे ऐकले होते. त्यासाठीच ही खेळी असावी असा तर्क आता प्रेमींच्या वर्तुळात काढला जात आहे. भाऊंच्या स्पष्टीकरणामुळे टाळेबंदी उठेपर्यंत तरी हा मुद्दा बासनात गेला असला तरी निदान कालची रात्र या खेळामुळे चांगली गेली. आशेचा किरण किती सुखावह असतो याचा साक्षात्कार नव्याने झाला! अर्थात, येत्या ३ मे नंतर काही तरी चांगले घडेल ही आशा यामागे आहेच. आशेचा तो लंबक कुठे झुकणार हे पाहायचे!