‘‘तुम्ही समजता काय स्वत:ला? जग कुठे चालले आहे? त्यात राहणारा समाज किती बदललाय याची जाणीव तरी आहे का तुम्हाला? व्यक्त होणे ही जर सवय असेल आणि ती तुम्हाआम्हा साऱ्यांसाठी अभिमानाची बाब असेल तर पिणे ही सवय लज्जास्पद कशी काय ठरवता तुम्ही? सध्याच्या सरकारच्या धोरणावर, कृतीवर मी रोज व्यक्त होत असतो. आपले म्हणणे सामान्यजनांपर्यंत पोहोचावे असे मला अनेकदा वाटत असते. त्यासाठी तुमच्या चॅनेलवाल्यांना कितीदा फोनही केला, पण ‘तुम्ही कोण’ म्हणत त्याने फोन कट केला. आणि आता मी साठीचा ज्येष्ठ दारू मिळवण्यासाठी रांगेत काय लागलो तर लगेच माझे फु टेज दाखवता, आणि पाठ फिरवणारा तुमचा तो माइकधारी दंडुकेवाला प्रतिक्रि या विचारतो, मी आधीचा राग मनात ठेवून बोलायला नकार दिल्यावर तसेच फुटेज दाखवेन म्हणून धमकी देतो, ती खरी करून दाखवतो. हे चालले काय? टाळेबंदीत सामान्यांची होणारी परवड म्हणण्याऐवजी पाहा माणसे कशी रांगेत लागली असे तुम्ही कसे दाखवू शकता? होय आम्ही रांगेत होतो. माझ्यासोबत नव्या पिढीची सवय जोपासणारे अनेक तरुण होते. आम्ही मुखपट्टय़ा बांधल्या, पण कुणीही तोंड लपवले नव्हते. आम्ही आनंदासाठी दारू पितो. माफक प्रमाणातील या सेवनाने आम्हाला मानसिक आधार मिळतो. त्यामुळे यात लपवण्यासारखे काहीच नाही. त्याचे तुम्हाला एवढे अप्रूप वाटायचे कारण काय?

एकीकडे जग बदलले आहे, अशा गप्पा करायच्या. डोळे उघडून नीट बघा म्हणायचे आणि जगात नेमके  काय बदलले याचाच पत्ता तुम्हाला नसतो! खरे तर जग, घर, समाज एवढा बदलला आहे की दारू ही जीवनावश्यक वस्तू झाली आहे. अशावेळी तिच्यावरची सारी बंधने उठवायला हवी. जगात अनेक देशांनी हीच रीत स्वीकारली, आपण मात्र मागे पडलो. ही व्यथा सरकारसमोर वारंवार मांडणे तुमचे काम! ते तुम्ही करायला तयार नाही आणि आम्ही रांगेत काय लागलो तर तुम्हाला त्यात बातमी दिसते. समाजातील बदलत्या स्थितीची जाणीवही जर तुम्हाला होत नसेल तर कसले हो तुम्ही संपादक? तुमच्यापेक्षा ते राज ठाकरे परवडले. अगदी बेधडकपणे मागणी करत जनतेसमोर आले. त्याला तुम्ही फार प्रसिद्धी दिली नाही. तुमच्या च्यॅनलीय चर्चेत हा विषय फार रेंगाळलासुद्धा नाही. यावर सामान्यांना बोलते करावे असेही तुम्हाला वाटले नाही. कारण काय तर लोक काय म्हणतील ही भीती! म्हणजे तुम्ही तुमची प्रतिष्ठा सांभाळायची व इकडे आम्ही उजळ माथ्याने रांगेत लागलो म्हणून आमची टर उडवायची हा कुठला न्याय!  अहो, आता तरी दारूला नैतिक अनैतिकतेच्या बुरख्यातून बाहेर काढा. अनेक घरात, त्यातल्या त्यात एकटेपणाने जगणाऱ्या माझ्यासारख्या कितीतरी जणांना या दारूने आधार दिलाय हे वास्तव जाणून घ्या. हे वातानुकू लित कक्षात बसून कॅ मेऱ्यासमोर सल्ले देण्याइतके  सोपे काम नाही.. मी काय बोलतो ते समजले ना! मग आता ते वारंवार चालवले जाणारे फूटेज काढता की करू राज ठाकरेंना फोन..!’’

–  पलीकडून होणारी ही सरबत्ती ऐकू न, गलितगात्र झालेल्या संपादकाने फोन ठेवून दिला. ‘अरे ती बातमी काढा’, असे सहकाऱ्यांना सांगण्याचे भानही त्याला राहिले नाही.