नेहमीप्रमाणे त्याला रात्री झोप येत नव्हती. गोव्याची वारी झाली होती. सन्मान सर्वोच्च होता. तिथे मिळालेल्या पदकाकडे तो एकटक बघत होता. मग त्याला पदकाचा कंटाळा आला. आता काय करायचे? विग थोडा तिरका करून त्याने डोके खाजवून पाहिले. काही सुचले नाही. सतार वाजवावी तर बायको भडकणार. त्याने तोही विचार सोडून दिला. तेवढय़ात त्याला आठवण झाली. अरेच्चा, चाहत्यांना आज ट्विटरवरून खुराक द्यायचा राहिलाच.. त्याने पुन्हा पदकाकडे नजर टाकली. त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. हीच ती वेळ मागे वळून पाहण्याची, त्याच्या मनात विचार येऊन गेला. मग, त्याने ठरवले की, ट्विटरवरून हाच उपदेश द्यायचा. ‘कधी कधी आपण स्वत:ला आरशात बघितलं पाहिजे..’ त्याने लिहून टाकले. हे ट्वीट बघून तो बेहद खूश झाला. त्या खुशीतच त्याने बायकोला हाक मारली. केलेले ट्वीट तिला दाखवले. बायकोने त्याच्याकडे निर्विकार चेहऱ्याने पाहिले आणि ती म्हणाली, बशकोर, हे ट्वीट करण्याआधी टीव्ही पाहिला होतास का?.. कधी कधी टीव्हीवरच्या बातम्या बघत जा रे! बायकोचे हे वाक्य कानी पडताच कसे कोण जाणे त्याला अचानक नेताजींचा चेहरा आठवला. दाढी कुरवाळत डोळ्यात डोळे घालून बघणारे नेताजी दिसू लागताच त्याची पावले आपोआप आरशाकडे वळाली. तो स्वत:ला पाहू लागला. त्याला घाम फुटला होता. तडक त्याने भारतपुत्राला फोन लावला. तर तो रात्री नऊला झोपला होता. भारतपुत्राने डोळे चोळत फोन उचलला. सगळीकडे आंदोलन.. दिल्लीत गुंडगिरी वगैरे सगळे बायकोचे बोल त्याने भारतपुत्राला ऐकवले. पुत्र म्हणाला, चिंता करू नका. करतो मी काही तरी. अख्ख्या ‘खान’दानाचाही फोन आला होता. त्यांनाही सांगितले, नेताजी आपलेच आहेत! फक्त दबावाला बळी पडू नका. परदेशात निघून जा. होईल सगळे इकडे नॉर्मल. तुम्ही असे करा एक ट्वीट करा नमस्काराचे. नेताजींना कळेल.. बशकोरने धीर एकवटला. ट्वीटवर नमस्काराचा इमोजी टाकला आणि निश्चिंत झाला.. झोपीही गेला. पण जागा झाल्यावर टीव्हीऐवजी त्याने पदकाकडे बघितले आणि पुन्हा ट्वीट केले.. ‘हेही दिवस जातील’. नेताजींनी लाइक केले होते! भारतपुत्रला मनोमन त्याने धन्यवाद दिले. बायकोने चहा आणून दिला. अजून हवा असेल तर सांग बशकोर. तुझं पोट साफ झालेलं बरं असतं नाही तर भिरभिरल्यागत करतोस. काल साफ झाले होते ना? ट्विटरवर काय लिहिलेस ते पाहूनच विचारतेय.. बशकोर काहीच न बोलता नुसती सतार हातात घेऊन बसला. बायकोने सवयीने टीव्ही लावला तर समोर ती.. ‘पिकू..’  पिकूने आता डोके फुटलेल्या पोरीच्या पाठीवरून हात फिरवला. शेकडोच्या संख्येने जमलेल्या तरुणांच्या गर्दीत ती शांतपणे उभी होती. त्याच्या पोटात एकदम कळ आली. सतार हातातून गळून पडली. तो कळवळू लागला. तसाच तो उठला पोट घट्ट धरून तो आत पळाला. जाता जाता त्याच्या तोंडातून शब्द उमटले, हे काय केलेस पिकू..