05 April 2020

News Flash

राम राहिला नाही कशात!

बाहेर संचारबंदी असल्याने तसे सकाळी पक्ष्यांचे आवाज जरासे मोठे झालेले, रामरक्षेचा पाठ कानावर पडू लागला

संग्रहित छायाचित्र

बाहेर संचारबंदी असल्याने तसे सकाळी पक्ष्यांचे आवाज जरासे मोठे झालेले, रामरक्षेचा पाठ कानावर पडू लागला. सतत आज्ञा देणारा सूर अधिक गंभीर होत जावा अशी ती सुरावट.  ‘इति ध्यानमं चिरतं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्.. , अर्थपूर्ण रामस्तुतीने कोणाचेही मन भारावून जाणारच.  राम वनवासातून आले म्हणून त्यांच्या स्वागतासाठीच गुढी उभी करायची ना? घरातच सर्व सदस्य उपस्थित असल्याने गुढी पाडव्याचे महत्त्व सांगताना रामरक्षेला आता नवी लय सापडत होती. ‘रामो दाशरथि: शूरो लक्ष्मणानुचरो बली,’  त्या गतीला रोखत ‘करोना’ भीतीने गावी परतलेला एक जण पुरोगामीपणाचा आव आणत पचकला, ‘आता राम येईल का अशा वातावरणात?’  या प्रश्नाने त्या सदाचारी व्यक्तीचा चेहरा लालबुंद झाला. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे.  जुना खितपत पडलेला मंदिराचा प्रश्न सोडविला देशाने. काश्मीरसुद्धा आता पूर्णपणे आपले झाले आहे. आता करोनाच्या पार्श्वभूमीवर रामलल्लाची पूजा नाही करायची तर काय करणार? संचारबंदीमध्ये  रामपूजन करून अनुष्ठान केले योगी आदित्यनाथांनी तर बिघडले कोठे? असतील अधिक माणसे त्यांच्याबरोबर, त्यात चूक ती काय? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, असे उगीच नाही म्हटले?  ते भोंगेवाले एकत्र जमतात तेव्हा विचारता का, गर्दी का झाली असे प्रश्न? जी माणसे कमलनयन पीतांबरधारी भगवान रामाचे स्तवन करतात, त्यांनी व्यर्थ चिंता करण्याचे काय कारण? राम हा सर्वव्यापी आहे. हे भरताग्रज रामा, रणधीर रामा, आपणच माझे आश्रयदाते असं म्हणायला हरकत घेणारे आपल्या देशात अनेक जण आहेत वर्षांनुवर्षे. खरे तर असल्या आसुरी वृत्तीच्या विरोधातच  गुढी उभी करायला हवी.

कसे सणसणीत सुनावले म्हणून गुढीसाठी कालच गर्दीतून मिळविलेला साखरेचा हार  त्यांनी गुढीला घातला. पाडव्याचे महत्त्व सांगणे सुरू झाले.. चैत्र शुद्ध प्रतिपदा, शालिवाहन शके १९४२ ही मूळ तारीख, पण आपण भारतीयत्व सोडले. नीती संपली जगातील. त्यामुळेच ही असली संकटे दाराशी येऊ न उभी आहेत. हा ‘करोना’सूरही पळून जाईल, पण श्रद्धा असायला हवी. आपण ऐकतच नाही. केवढी महान परंपरा आपली. आपण दोन्ही हात परस्परांना जोडून ‘रामराम’ म्हणतो. तुझ्यातील रामाला माझ्यातील रामाचा नमस्कार, अशी ती परंपरा. पण पार बदललो आपण. पण तरीही राम येईल. विश्वास असायला हवा.

कुठून एक प्रश्न विचारला आणि हे तत्त्वज्ञान ऐकावे लागले असा चेहरा करून घरात बसलेले सदस्य आता घाबरले होते. कोणी तरी म्हणाला- गर्दी करून बसू नका, विस्कटून बसा, ‘करोना’ असुर येईल..

त्यावर, कशात राम रहिला नाही, अशी टिप्पणी करत पुन्हा रामरक्षेचा सूर अधिक गंभीर होत गेला. भारून टाकले त्या सुरावटीने शार्वरीनाम संवत्सराच्या पहिल्या दिवसाला..!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 12:06 am

Web Title: loksatta ulta chasma article on curfew abn 97
Next Stories
1 गुढीच्या वाटेवर काटे?
2 थाळी वाजवा नाही तर टाळी..!
3 जुनी नाही; आजची कथा..
Just Now!
X