अनेकांना ठाऊक नसेल, पण भारताला संन्याशाच्या अहंकाराची दीर्घ परंपरा लाभली आहे. प्राचीन काळापासून चालत आलेल्या या परंपरेला आजही पुढे नेणारे अनेक आहेत. आता कु णी याला टीका म्हणेल तर आमचा नाइलाज आहे, पण इतिहास व वास्तवाची सांगड घालायलाच हवी ना! चाणक्यांचा अपमान झाला आणि त्यांच्यातील अहंकार जागा झाला. त्यांनी शेंडीची गाठ सोडली व जोवर नंदवंशाचा नायनाट होत नाही तोवर ही बांधणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली. आमच्या प्रदेशाला बिमारू म्हणता काय, असे म्हणत आजच्या युगातील संन्यस्त म्हणजेच योगी तेच करताना दिसले आणि सारे परंपरावादी अगदी भरून पावले. टाळेबंदीमुळे वेगवेगळ्या शहरांत अडकलेल्या उत्तर प्रदेशी मजुरांना खाऊपिऊ घालताना मेटाकुटीला आलेल्या अनेक राज्यांना या नव्या योगींच्या घोषणेने बराच दिलासा मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही. अवघ्या देशाचा विचार केला तर उत्तर प्रदेश व बिहार ही बिमारू राज्ये म्हणून ओळखली जातात. साहजिकच तिथले मजूर परराज्यांत कामाला जातात. आता अडकलेल्या या मजुरांच्या मुद्दय़ावरून योगींचा स्वाभिमान जागा होऊन, आमच्या राज्यात १५ लाख रोजगार वाट पाहताहेत, अशी घोषणा करते झाले. या करोनाकाळामुळे अनेकांच्या रोजगारावर गंडांतर येण्याची शक्यता असताना नव्या रोजगाराची घोषणा हे अनेकांना दिवास्वप्नच वाटू शकते, पण अशी शंका घेण्याआधी ते योगी आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे. स्वत:कडे लहानपण घेतील ते योगी कसले याचाही विचार यानिमित्ताने साऱ्यांनी करावाच. रोजगाराच्या संधी सांगताना योगींनी मनरेगा, लघुउद्योग अशी अनेक क्षेत्रे सांगितली. ते सत्तेत आल्यापासूनच्या तीन वर्षांत या क्षेत्रात किती जणांना रोजगार मिळाला असे प्रश्न उपस्थित करण्याची ही वेळ नाही. संकटसमयी नेतृत्वाने दिलासादायकच बोलावे अशी परंपरा आहेच, त्याचे पालन एक योगी करत असतील तर त्यावर विश्वास ठेवावा ही साऱ्या पुरोगाम्यांना कळकळीची विनंती! शेवटी सामान्य माणूस व योगी यात फरक असतोच ना! या घोषणेमुळे एक बरे झाले. करोनानंतर जग बदलणार असे जे सूतोवाच सतत केले जात आहे त्याला बळ मिळाले. योगींमुळे उत्तर प्रदेश हे रोजगारक्षम राज्य होणार असेल व स्थलांतरितांचा इतर राज्यांवरील ताण कमी होणार असेल तर हा देशातील मोठाच बदल ठरेल. त्यास कारणीभूत ठरलेल्या योगींचे इतर मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे अभिनंदन करायला हवे. अर्थात ते करताना ते योगी आहेत, आपण नाही याची नम्र जाणीव सर्वानी ठेवावी. आता विरोधक यावरून योगींची खिल्ली उडवतील. उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणतील, पण त्यात तथ्य नाही. संन्यस्त कधीही स्वत:ला लहान समजत नसतो. या पुरातन परंपरेला पुढे नेणाऱ्या योगीचे अभिनंदन करतानाच आता ठिकठिकाणी अडकलेल्या उत्तर प्रदेशी मजुरांना तातडीने तिकडे पाठवण्याची कारवाई राज्यांनी करावी. कारण एकच.. रोजगाराच्या संधी तिकडे वाट बघत आहेत! मोठय़ा खुर्चीत कुणी साधा माणूस बसला तर त्याला फक्त साक्षात्कार होतो आणि योगी बसले तर दिव्यत्वाचा साक्षात्कार होतो असा निष्कर्ष काढायला आता हरकत नाही. शेवटी प्रश्न सर्वदूर हरवत चाललेल्या पण उत्तर प्रदेशात दिसू लागलेल्या रोजगाराचा आहे.