सक्काळी सक्काळी हाती कुदळ घेत, खांद्यावर फावडं टाकत, रामूने कारभारणीला हाक मारून न्याहारी बांधूनच देण्याचा हुकूम केला. गेले पंधराईस दिवस घरातल्या सगळ्या माश्या मारून टाकणाऱ्या या नवऱ्याला काय झालंय तरी काय, असा प्रश्न तिला पडला खरा ; पण ती काहीच बोलली नाही. तिच्या  कपाळावरच्या नुस्त्या आठय़ाच बोलल्या..  सपनातही आलं नव्हतं, मानसावर पन रोग पडंल आसं. कोणता तरी प्राणी अंगात शिरंल, म्हून घरातच बसाया सांगतायत, सारखं टीव्हीवर. तरी याला बाहेर पडायची एवढी कसली हौस पडलीया, असा रोख डोळ्यात आणत कारभारणी फणकारली–

काय येड लागलया काय तुम्हास्नी?

या प्रश्नाला रामूनं काहीच उत्तर दिलं नाही. तो सारखा बाहेर जाऊन आकाशाकडे बघायचा आणि घरात यायचा. घालमेल चालली होती नुस्ती. पेपरात आलंय आणि टीव्हीवर बी सांगितलंय यंदा पाऊस येणार. नेहमीसारखाच येणार. थोडा उशिरा येणार पण शेतं फुलणार. या बातमीनं रामू मोहरून गेला होता. गेल्या वरसाला असाच पहिला अंदाज आला व्हता. लय आनंद झाला व्हता रामूला. शेत नांगरून ठेवलंवतं. बियाणाची तयारी केलीवती. खताच्या गोण्याबी आल्या व्हत्या घराच्या परसात. शहराकडे शिकून तिथंच राहिलेल्या पोराला शेतीच्या कामासाठी बोलावलं पण होतं. पण तो फिरकलाच नाय.

त्याचा पाऊस वेगळा असणार, असा रामूचा अंदाज होता. तो खरा ठरला, जेव्हा पाऊस येईचना तेव्हा.

मागल्या वरसाला जो तरास झाला, तो या वेळी तरी व्हायला नको, म्हणून रामूनं देव पाण्यात ठिवले होते. पावसाच्या बातमीनं देव पाण्यातून बाहेर आले. रामू जय्यत तयारीला लागला. बैलांच्या जोडीला जुपायची तयारी सुरू झाली. कारभारणीला समजून सांगण्यात काय उपेग नाही.

रामूला खात्री होती की यंदाही पाऊस येणार. पेपरात आकाशाकडे डोळे लावून एकटक बघणाऱ्या शेतकऱ्याचे तेच फोटो दरवर्षी त्यानं पाहिले होते. यंदा तसं काही होणार नव्हतं. शेतातलं पीक तरारून आल्याचं स्वप्न एवढय़ातच पडल्याचंही लक्षात आलं रामूच्या. बातमी वाचताना तेच आठवत होतं. कारभारणीनं लगबगीनं न्याहारीची तयारी सुरू केली.

लहानगा शाळेत जायचा, तेव्हा ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा’ असं काहीतरी म्हणायचा. तिला एवढय़ा वर्षांनंतरही ते आठवत होतं. तयारी करता करताच ती मोठय़ानं म्हणाली, कसली एवडी घाई तुम्हास्नी. गेल्या वरसाला कुटं आला व्हता, पाऊस वेळेवर. तुमी मारे तयारी करून बसला व्हता. जरा उशीरा म्हणत म्हणत रग्गड वेळ लावला. मग आला अन् गेला पळून. येईचना. आला तरी निस्ती जमीन भिजाया पुरंल एवढाच. मग कधीतरी धबाधबा यायचा. सगळं शेत उसवायचं त्या पाण्यानं.. आठवतंय नव्हं?

रामूनं लक्ष न दिल्यासारखं केलं. पण त्याच्या डोळ्यासमोर पेपरातला तो टक लावणारा फोटोच तरळत राहिला. काय वाटत आसंल त्याला? त्यालाबी शहरात राहणारा पोरगा आसंल? विचार करत रामूनं फावडं टाकलं कोपऱ्यात. कुदळीलाही जागा केली. यंदा तरी फसतोय की जगतोय, ते बघूया पाऊस आल्यावर, असं म्हणत रामूनं कांबळ्यावर पुन्हा बैठक जमवली.