09 March 2021

News Flash

निवांत मुक्कामापूर्वीचे काहूर..

परिस्थितीचा अंदाज घेत मुखपट्टी काढत बोलावे लागते.

संग्रहित छायाचित्र

तसा मी मूळचा समाजवादी. हा वाद समाजातून हद्दपार झाल्यावर काँग्रेसमध्ये गेलो. तोही पक्ष बुडत्याला आधार देऊ शकत नाही हे लक्षात येताच हळूच सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या कळपात शिरलो. हे करताना दिल्लीतील खान मार्केट गँगचा आधार घेतला नाही. त्यामुळे नेतृत्वाचा माझ्यावर चटकन विश्वास बसला व लगेच राजभवनापर्यंत पोहोचता आले. खरे तर एकदा महामहीम बनल्यावर तोंडावर कायम मुखपट्टी लावूनच वावरावे लागते. परिस्थितीचा अंदाज घेत मुखपट्टी काढत बोलावे लागते. पण माझा मूळ स्वभाव काही केल्या जात नाही. त्याला काय करणार? समाजवादी असल्याने प्रत्येक गोष्टीवर अनावश्यक भाष्य करण्याची सवयच जडलेली. मनाला एखादी गोष्ट पटली नाही की तोंड आपसूकच उघडते. मग गोंधळ उडतो. काश्मीरमध्ये तेच झाले. तिथल्या लुटीविरुद्ध उघडपणे नाराजी व्यक्त केली तर केवढा गहजब उडाला. लुटणाऱ्यांना गोळ्या घाला हे जरा अतिच होते म्हणा; पण भ्रष्टाचार म्हटले की माझे अंगच थरथरायला लागते. जिवाचा तिळपापड होतो. मग दिल्लीच्या सूचनेवरून विधान मागे घ्यावे लागले. या पदावर आल्यापासून सारेच जण सल्ला देतात. भवनात राहून मस्त खा, प्या, आराम करा, पुस्तकवाचन करा, राज्यातील प्रेक्षणीय स्थळे बघा, मोफत उपचार असल्याने तब्येतीच्या साऱ्या कुरबुरी संपवा, वेगवेगळ्या मान्यवरांशी गप्पा करा, ज्ञानात भर घाला, बागकामाचा छंद जोपासा, जेवढे नातेवाईक व आप्तेष्ट असतील त्यांना पाहुणे म्हणून क्रमाक्रमाने बोलावून खूश करून टाका. माझ्याकडून हे कधी जमले नाही. देश असो वा राज्य, त्यात उद्भवणारे प्रश्न महत्त्वाचे. त्यावर चिंतन, मनन करण्याची सवय तशी जुनीच. समाजवाद्यांत ती हमखास आढळते. असा खूप विचार केला की मग आपसूकच तोंड उघडते व विधाने बाहेर पडतात. गोव्यात तेच झाले. माझ्याजागी दुसरे कुणीही असते तर तिथले ते पुराणवास्तूसारखे आणि गळके ‘काबो’ पाडून नवे भवन उभारणीच्या घोषणेने आनंदितच झाले असते. मला ते सारे अनावश्यक वाटले. साऱ्या देशाला हादरवणाऱ्या करोनाच्या मुद्दय़ावर महामहिमांनी बोलू नये असे कुठे लिहिले आहे? पण नाही आवडले दिल्लीला. केली बदली. खरे तर माझ्यासारख्या बोलघेवडय़ाला जिथे विरोधक सत्तेवर आहेत अशा ठिकाणी पाठवायला हवे. शोभेच्या खुर्चीवर असलो तरी शब्दाने दोन हात करण्याची सवय अशा ठिकाणी कामास आली असती. दिल्लीच्या हे लक्षात कसे येत नाही, काही कळायला मार्ग नाही. जाऊ दे. तसेही आपण या वर्तुळात उपरेच. राजीनामा द्या असे सांगण्याऐवजी बदली करतात. राजकारणात ही कान उपटण्याची पद्धत मात्र लाजबाब. अपमानाला सन्मान समजण्याची. या बदलीनंतर अनेक मित्रांचे फोन आले. मोकळा हो म्हणून. मी मात्र चिकटून राहायचे ठरवले आहे. समाजवाद्यांच्या नशिबात अशी मानाची पदे नशिबानेच येतात. पदाविना राहणाऱ्या सहकाऱ्यांची परवड मी बघितली आहे. तेव्हा पद न सोडता या चौथ्या खेपेस तरी  निवांत राहायचे. सात बहिणींचा हा प्रदेशही तसा सुंदर. आता फक्त न बोलण्याची सवय लावून घेण्यासाठी एखादी शिकवणी लावावी लागेल. सवय जडायला उशीर झालाच तर मुखपट्टी आहेच की सोबतीला. पुढचा कार्यकाळ हवा असेल तर मनाला प्रश्नच न पडू देणे उत्तम.

तेवढय़ात समोर बसलेला मदतनीस म्हणाला : ‘सर शिलांग आले!’ गुवाहाटी ते येथवरच्या प्रवासातील चिंतनाने ताजेतवाने झालेले महामहीम सलामी घेण्यासाठी सज्ज झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 2:56 am

Web Title: loksatta ulta chasma article zws 70
Next Stories
1 चुकले ते बैलांचेच..
2 ‘मस्कऱ्या’..
3 प्रतिक्रिया आहेत.. क्रिया कधी?
Just Now!
X