जाऊ द्या हो.. न्यायनिवाडाकार असल्या म्हणून काय झाले? शेवटी हाडामांसाची माणसेच ना ती. त्यांनाही मोह होणारच. आणि पद कुणाला नको असते. स्वत:ला नि:स्पृह म्हणवणारे न्यायदातेही जर अखेरच्या टप्प्यात सत्तेच्या बाजूने झुकत असतील व निवृत्तीनंतर पद पदरात पाडून घेत असतील तर इतरांचीही लालसा जागृत होणारच ना! नसेल सिद्ध करता आले त्यांना स्वत:चे उपद्रव्यमूल्य नोकरीच्या काळात, त्यामुळे सत्तेच्या लक्षात नसेल आला त्यांचा चेहरा. पण म्हणून अपेक्षाच बाळगायची नाही? त्यासाठी घेतली असेल मदत भविष्यवाल्याची, तर त्यात चूक ती काय? व्यक्तिगत पातळीवर एखाद्याने सश्रद्ध नसावे काय? तसेही अनेक न्यायनिवाडाकार पदावर असताना सुद्धा जातातच की तिरुपती वा साईचरणी. म्हणून काय त्यांची निष्ठा कमी ठरते! मग उगीच त्या विदूषी आहेत म्हणून त्याची चर्चा करायची. न्याय देण्याचे काम करताना त्यांनी धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व पाळलेच असणार! एकदा खुर्ची सोडल्यावर कोण काय करतो याच्याशी कुणाला घेणेदेणे असण्याचे कारणच काय? भले गेली असेल त्यांची अख्खी कारकीर्द युक्तिवादातील खरेखोटेपणा ओळखण्यात. म्हणून त्यांची फसगतच होऊ शकत नाही असे थोडीच आहे. फसवणूक करणारा कदाचित जास्तच चतुर असेल. असे म्हणतात की, न्यायक्षेत्रात असलेली ही मंडळी दीर्घकाळ एकांत सहन करून एकलकोंडी होत जातात. अनेकदा त्यांना कायद्याच्या कसोटीवर माणसे ओळखता येतात पण प्रत्यक्षात नाही. त्या विदूषींचेही असे झाले असेल. वयाच्या सत्तरीला आल्यावर पदाची गरज काय? त्या स्वत:ही कुठे शब्द टाकू शकल्या असत्या असले प्रश्न फिजूल आहेत हो! वयाच्या उत्तरार्धातच अनेकांना पदाचा मोह सुटतो आपल्या देशात. त्याला त्या कशा अपवाद असणार? आणि ते शब्द टाकायचे म्हणाल तर नसेल झाली त्यांची हिंमत. तशीही या निवृत्तांच्या वतरुळात आता पदे मिळवण्यासाठी खूप स्पर्धा वाढली आहे ना! प्रत्येक न्यायनिवाडाकाराला काहीतरी हवेच असते. माणसे धावपळ करू शकतात पण बाईच्या जातीने कुठे जायचे? मग घेतला त्यांनी आधार भविष्यवाल्याचा. पदावर असताना ज्यांनी अनेकांच्या भवितव्याचा फैसला केला त्यांनाच भविष्याला शरण जावे लागणे हे वाईटच हो पण जगाची रीतच आहे ती!

आता तुम्ही म्हणाल की या विदूषीकडे आठ कोटी आले कुठून? अहो, न्यायनिवाडाकारांनी काय गरीबच राहायचे काय? तेही एकजात सारे पदाचा फायदा लाटत असताना! असतात काही बडय़ांची प्रकरणे, मिळतो त्यात बऱ्यापैकी पैसा. पण यापैकी कुणी गरिबांना लुटताना बघितले का कधी? आता पाचदहा वर्षे न्यायाचे काम केल्यावर थोडा न्याय स्वत:च्या पदरात पाडून घेतला तर त्यात गैर काय? सर्रास चालते हे. फक्त पडद्याआड. व्यवस्थेत टिकायचे असेल तर हे करावेच लागते. वयाच्या सत्तरीत असलेल्या विदूषीला चार कोटी व्याजाने देणारा तो कोण, असल्या प्रश्नाची चर्चा निर्थकच हो! रीतसर तक्रार द्यायची म्हटल्यावर वकिली डावपेच लढवावेच लागतात ना! इतकी वर्षे या क्षेत्रात राहिल्यावर तेवढेही कळणार नाही का त्यांना. आयुष्यभर फिर्यादी म्हणून समोर आलेल्या पोलिसावर विश्वास ठेवणेच नडले त्यांना! झाली फसवणूक, केली तक्रार. हे प्रकरण इतरांना अशक्य कोटीतील वाटेल पण शेवटी प्रश्न न्यायाच्या विश्वासार्हतेचा आहे. आणि विदूषींचे म्हणाल तर त्या गेल्या आहेत कर्नाटकातील कुठल्याशा मठात, आचार्याचे मार्गदर्शन घ्यायला!