खिडकीतून उन्हं अगदीच अंगावर आल्यामुळे गण्या नाइलाजाने उठला, आणि उशाशी ठेवलेला मोबाइल उचलून त्याने वेळ पाहिली. सकाळचे नऊ वाजले होते. रात्री नऊपर्यंतच्या बारा तासांचा वेळ कसा घालवायचा, हे आधीच ठरलेले असल्याने गण्याने खळखळून तोंड धुतले, आणि आईने समोर आदळलेला चहाचा कप भराभरा तोंडात मोकळा करून गण्याने डब्यातल्या ‘खारी’चा लचका तोडला. मग भराभरा आन्हिके आटोपली. तोवर दहा वाजले होते. आता हाताशी फक्त अकरा तास उरले होते. रेल्वे स्टेशनवर जायला पंधरा मिनिटे लागणार, मोक्याची जागा सापडेपर्यंत आणखी दहा-पंधरा मिनिटे.. लहानपणी शाळेत गुरुजींनी घातलेले गणित गण्याला आठवले, आणि त्याने उगीचच आकडेमोड केली. आपण कशाचे उत्तर शोधतोय तेच त्याला कळत नसल्याने अखेर त्याचा नाद सोडून देऊन गण्याने पायात स्लिपर चढवल्या आणि तो तरातरा चालत दहा-पंधरा मिनिटांत रेल्वे स्टेशनवर पोहोचला. फलाटाच्या कोपऱ्यावरचे बाकडे रिकामे होते. गण्याचे डोळे चमकले. आता निवांत बाकडय़ावर बसून बाजूच्या प्लगवरून चार्जर मोबाइलला जोडायचा, आणि फुकटातल्या ‘फुलरेंज वायफाय’चा आनंद उकळत मोबाइलवरच्या मसाल्याची मनसोक्त मजा लुटायची असे गण्याने ठरविले. तो त्याचा रोजचाच कार्यक्रम होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर पदवीची भेंडोळी काखेत मारून नोकरीसाठी वणवण करून अखेर नोकरीचा नाद सोडलेल्या गण्याला मोबाइलचा मोठा आधार वाटायचा. मोबाइल हा आपल्या शरीराचा एक अवयव आहे, असे तो अभिमानाने सगळ्यांना सांगायचा. सरकारने रेल्वे स्टेशनवर फुकट वायफायची सोय केल्याबद्दल तो दररोज रेल्वे स्टेशनवर पोहोचताच बाजूच्या पोस्टरवरच्या पंतप्रधानांच्या अगडबंब फोटोला नमस्कार करून मगच मोबाइल वायफायला जोडायचा. पुढे कंटाळा येईपर्यंत मोबाइलच्या मनोरंजनात बुडताना तहानभूक, बेकारी, घरच्या माणसांचे टोमणे, सारे सारे विसरून गण्या रेल्वे स्टेशनवरच्या त्या बाकडय़ावर बसायचा, वेळेचे भानही विसरायचा.. आजही गण्याने बाकडय़ावर बसताना पुन्हा एकदा गुरुजींनी शिकवलेल्या गणिताची उगीचच उजळणी केली. २४ तासांच्या दिवसातील १२ तास, म्हणजे वर्षांच्या ३६५ दिवसांपैकी एकशे ब्याऐंशी दिवस आपण जागे असतो. म्हणजे, दोन हजार १८४ तास आपण जागे असतो. एवढी आकडेमोड गण्याने मोबाइलवर केली, आणि त्याचे डोके चक्रावले. हा हिशेब आपण कशासाठी करतोय हेच त्याच्या लक्षात येत नव्हते. तरीही त्याने हट्ट सोडला नाही. अचानक त्याच्या डोक्यात वीज चमकली.

दररोज आपण रेल्वे स्टेशनवर आठ-नऊ तासांचे वायफाय वापरतो, हेही त्याच्या लक्षात आले.

गण्याने हिशेब करता करता मोबाइल छातीशी घट्ट कवटाळला. पुन्हा एकदा सरकारचे आभार मानले, आणि वायफाय चालू करून गण्याने यूटय़ूबवर आवडत्या चित्रपटांच्या क्लिप शोधायला सुरुवात केली. दुपार टळली तरी गण्याला भुकेचे भान नव्हतेच.. मोबाइलवरचे मनसोक्त मनोरंजन संपवून संध्याकाळी ताजातवाना होऊन गण्या घरी परतला, आणि नेहमीप्रमाणे कुणाशीच काहीच न बोलता टेबलवरचे वर्तमानपत्र चाळू लागला. भारतीय लोक वर्षांतील अठराशे तास मोबाइलवर घालवतात, अशी एक बातमी त्याने वाचून काढली, आणि आपण भारतीय आहोत या अभिमानाने गण्याचा ऊर भरून आला..