News Flash

‘ओईडी’त आत्मनिर्भरता!

यापुढे बघा, ऑक्सफर्डला नवीन शब्दकोशच काढावा लागेल असे हजारो शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडतील.

(संग्रहित छायाचित्र)

आधीच्यांसारखे लेचापेचा समजलेत की काय आमच्या नेत्याला. अरे परनिर्भरता त्याजलेल्या कणखर देशाचे नेते आहेत ते. त्यांच्या मुखातून निघणारे शब्द म्हणजे जणू मोतीच. ते ओंजळीत झेलण्यासाठी आतुर असलेले लाखो भक्त. त्यांच्यामुळेच तर करोना विषाणूपेक्षा जास्त वेगाने आत्मनिर्भरता हा शब्द पसरवता आला. शेवटी जगाला दखल घ्यावीच लागली ना! एक काळ होता, तेव्हा इंग्रजांनी उधार दिलेले शब्द घेऊन आपण जगत होतो. आता काटे उलटे फिरू लागलेत. आपले शब्द इंग्रज घेऊ लागलेत. सूर्य पश्चिमेकडून उगवून दाखवणे यालाच म्हणतात. होती का ही किमया आधी कुणात? ती धमक आमच्या नेत्यात आहे. कळले ना! म्हणून सांगतो. ते म्हणतील तसे वागा. कधीच विरोध करण्याच्या भानगडीत पडू नका. काय तर म्हणे सरकारी कंपन्या विकून कसली आलीय आत्मनिर्भरता. अरे, दात कोरून पोट भरण्यापेक्षा हे विकणे केव्हाही चांगलेच ना! स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी खूप काही करावे लागते. विकणे हा त्यातला छोटासा भाग झाला. त्याचाच अकारण गवगवा करता? आता आपण शब्द निर्माण करणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसलो आहोत. हा अभिमानाचा विषय नाही का? ऑक्सफर्ड डिक्शनरीने ऊर्फ ‘ओईडी’ने याआधी घेतलेल्या हिंदी शब्दांवर जरा नजर टाका. हरताल, शादी, डब्बा, अण्णा, अब्बा, गुलाबजामून.. किती मिळमिळीत शब्द आहेत हे. अब्बा तर उच्चारण्याची हिंमत होत नाही अलीकडे. त्यापेक्षा आत्मनिर्भर कितीतरी सरस, वजनदार, वलयांकित. ते नुसते नेतेच नाही तर शब्दप्रभूसुद्धा आहेत. हे लक्षात घ्या नतद्रष्टांनो! चीनच्या भीतीपोटी का होईना भलेही केला असेल त्यांनी सौदा राफेलचा, आणले असेल परकीय तंत्रज्ञान; पण सोबतच स्वदेशीलाही चालना दिलीच ना! केवळ या एका शब्दाने ही जादू घडवून आणली. नेहरूकाळात तर सुईसुद्धा तयार होत नव्हती हो या देशात. आता अग्निबाण, मिसाईल आणि काय काय.. (बघितला ना सुईधागा सिनेमा?) ही सारी प्रगती गेल्या सहा वर्षांतली आहे. आधीचा इतिहास विसरा आता. आत्मनिर्भर म्हणजे स्वत:च्या पायावर उभे राहणे. या एका शब्दामुळे टाळेबंदीच्या काळात शेकडो मजूर न कुरकुरता पायी चालले. असंतोषाचा साधा सूरही कुठे उमटला नाही. याला म्हणतात वाणीची ताकद. १३० कोटी लोकांना एका शब्दात बांधून ठेवणे सोपे वाटते का तुम्हाला? म्हणून तर ऑक्सफर्डला दखल घ्यावी लागली. म्हणे आपण अमुक आयात करतो, तमुक करतो तरी आत्मनिर्भर कसे? अरे, एका झटक्यात देश बदलणार आहे का? जरा सवड तर द्या आमच्या नेत्याला. बघा कशी कमाल करून दाखवतात ते! सहा वर्षे ही केवळ सुरुवात आहे..

यापुढे बघा, ऑक्सफर्डला नवीन शब्दकोशच काढावा लागेल असे हजारो शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडतील. वाणी असो, वेशभूषा असो वा सादरीकरण- आमच्या नेत्याला तोड नाही जगात! हा शब्द नेत्याने उच्चारला नसता तर देशवासीयांना जगण्याचे बळ मिळाले नसते व करोनाने हाहाकार उडवला असता. केवळ या शब्दामुळे देश सुरक्षित व स्वस्थ राहिला. तरीही काहीजण म्हणतात हे तर गुंगीचे औषध! अरे, आमच्या नेत्याची वाणी गुंगीतून खडबडून जागी करणारी आहे. म्हणून तर लंडनला दखल घ्यावी लागली. आता लवकरच ते मनातली गोष्ट सांगताना ‘धन्यवाद ओईडी’ म्हणतील. तेव्हा देशभर थाळीवादनाचा गजर उठलेला दिसेल. तुम्ही बसा गाल चोळत!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 12:00 am

Web Title: loksatta ulta chsahma article abn 97
Next Stories
1 उपोषणाआधीच!
2 तुरुंगपर्यटन!
3 करवाटिवीर मूळचे भारतीयच..
Just Now!
X