19 April 2019

News Flash

कसे होणार या आपल्या देशाचे.?

‘मीडिया यह आपको नाही बतायेगा..’ असे व्हाट्स्यापवर अनेकांना अनेकवार म्हणावे लागते.

‘मीडिया यह आपको नाही बतायेगा..’ असे व्हाट्स्यापवर अनेकांना अनेकवार म्हणावे लागते. ही प्रसारमाध्यमे जे सांगत नाहीत ते एक वेळ ठीक, पण सांगतात ते काय सांगतात आणि देशाला कशी मागे नेतात, हा आजचा विषय आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक बातम्या वृत्तपत्रांनी दिल्या, त्यांची चर्चा झाली.. हा नित्यक्रमच, तो सुरू राहिला. अशातच एक बातमी आली. ब्रिटनमध्ये २५ जुलै १९७८ या दिवशी जन्मलेली आणि आणखी काही दिवसांत चाळिशीत जाणार असलेली ल्यूइस जॉय ब्राऊन ही महिला जगातील पहिली ‘टेस्ट टय़ूब बेबी’ म्हणून ओळखली जाते. हे खरे नाही, अशा अर्थाचा निष्कर्ष उत्तर प्रदेशातील एका नेत्याने जाहीर केल्याची ती बातमी होती. म्हणजे, ब्रिटनचे नाकच कापणारा एक मास्टरस्ट्रोक या नेत्याने लगावला होता. परंतु माध्यमांनी ब्रिटनचे नाक कापले गेलेले आहे, हे सांगितलेच नाही. त्याऐवजी भलतीच आणि अगदी वरवरची बातमी दिली.

‘उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा म्हणतात: सीता ही पहिली टेस्ट टय़ूब बेबी’ अशी बातमी या अनेक वृत्तपत्रांनी दिली. त्याही आधी, बडय़ा माध्यम समूहांच्या संकेतस्थळांवर हीच बातमी, अशाच प्रकारे झळकू लागली होती.

बातमीत सत्यांश नव्हताच, असे कुणालाही म्हणता येणार नाही. कसे ते पाहू.

भाजपला उत्तर प्रदेशात पूर्ण बहुमत असले तरीही त्या राज्यात उपमुख्यमंत्री हे पद आहे, हा सत्यांश नव्हे? या उपमुख्यमंत्रिपदावर दिनेश शर्मा आहेत हे खरेच की नाही? आणि या दिनेश शर्मा यांना बोलताही येतेच! मग ‘उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा म्हणाले’- यात काय खोटे दिसते माध्यमांना- पण नाही, वरवरची बातमी देणाऱ्या या माध्यमांनी शर्मा जणू खोटेच बोलतात, अशा थाटात बातमी दिली. परीक्षानळीऐवजी त्या काळात मडके होते आणि मडक्यात सीता जन्मली, असे स्पष्ट म्हणले होते दिनेशजी. जरा विचार करा : काचेचा शोध तसेच प्लास्टिकचा शोध लावण्याचा मूर्खपणा पाश्चात्त्यांचा आहे. आता प्लास्टिक किती घातक असते हे सारेच सांगतात आणि प्लास्टिकबंदी सध्या जरी लांबणीवर पडली असली तरी ती होणारच, तशी पुढेमागे काचेवरही बंदी येऊ शकते.

परीक्षानळी म्हणजे टेस्ट टय़ूब ही पहिल्यांदा म्हणे मायकल फॅरेडे या ब्रिटिश शास्त्रज्ञाने वापरली. तो फॅरेडे सन १८४८ मध्येच गचकला तरी १९७८ मध्येदेखील ब्रिटिश डॉक्टर तसलीच जुनाट नळी वापरत होते, हे कुणी का नाही सांगत? आता बस्स झाले हे पाश्चात्त्यांचे लाड! आपल्या देशातल्या श्री श्री, बाबा आदींच्या कंपन्या आता मातीचे मडकेसुद्धा काचेच्या परीक्षानळीचेच काम करू शकते हे सिद्ध करायला समर्थ आहेत. पुढले शतक आपलेच आहे.

पण हे काहीच न लिहिता सीता ही पहिली टेस्ट टय़ूब बेबी असल्याच्या विधानाची खिल्ली मात्र अनेकांनी उडवली. यांना गणपती म्हणजे प्लास्टिक सर्जरी आणि कौरव म्हणजे क्लोनिंग हे पंतप्रधानांनी सांगितले तरी मान्य नाही. महाभारतकाळात इंटरनेट होते हे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव सांगतात तरीही ते अमान्यच.. कसे होणार आपल्या देशाचे? आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली – तो नसल्याचे वारंवार सिद्ध करणाऱ्या या घटना पाहिल्या की वाटते, कसा यशस्वी होणार आपला देश!

First Published on June 4, 2018 12:28 am

Web Title: louise brown test tube baby