24 January 2019

News Flash

हक्कभंग?.. नव्हे, अभिनंदन!..

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू होताच, विरोधी बाकांवरील मुंगीने मांडलेला हक्कभंग प्रस्ताव मागे घेतला.

हरिभाऊ बागडे

वारुळातले मुंग्यांच्या विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्याआधीच सभागृहात तणाव होता. काही गट कुजबुजत्या आवाजात चर्चा करत होते. काहींनी वर्तमानपत्राच्या कागदांचे तुकडे तोंडातून अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत आणून ठेवले, काही मुंग्या ते जोडून एकत्र करू लागल्या. कामकाजाची वेळ झाली, तोवर कागदावरील एका बातमीच्या सर्व अक्षरांचे तुकडे जुळवून झाले होते. राणी मुंगी अध्यक्षांच्या आसनावर बसली. सारे सभागृह जणू गोंधळासाठी सज्ज होते. राणी मुंगीने कामकाजाचा क्रम पुकारताच प्रचंड गदारोळ सुरू झाला. दोन्ही बाजूंच्या मुंग्या घोषणाबाजी करत होत्या. काही मुंग्या तोंडात वर्तमानपत्राच्या कागदांचे तुकडे फडकावत होत्या, तर काहींनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत फेर धरून भजने सुरू केली. राणी मुंगी बेल वाजवून वाजवून थकली. तिने शांतता राखण्याचे आवाहनही केले, पण गदारोळ थांबत नव्हता. अखेर संसदीय कार्यमंत्र्याने सर्वाना शांत केले आणि विरोधी पक्षनेता असलेली मुंगी बोलू लागली. तिने चक्क हक्कभंग प्रस्तावच मांडला. ‘महाराष्ट्रातील विकास मुंगीच्या वेगाहूनही कमी वेगात सुरू आहे, असे सांगून माणसांच्या सभागृहातील एका अध्यक्षाने मुंग्यांचा अपमान केला’, असा थेट आरोप या सदस्य मुंगीने केला, तेवढय़ात सत्ताधारी बाकावरील मुंगीने त्याच बातमीबद्दल त्या अध्यक्षांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. मुंग्यांच्या कामाच्या वेगाचे कौतुक करून माणसांच्या विकासाच्या वेगाची खिल्ली उडविल्याबद्दल हे सभागृह हरिभाऊ बागडे यांचे अभिनंदन करत आहे, असा ठराव त्या सदस्य मुंगीने मांडला आणि पुन्हा गदारोळ सुरू झाला. ‘अभिनंदन की हक्कभंग’ यावरून दोन्ही बाजूंना घोषणाबाजी सुरू झाली. अखेर राणी मुंगीने सभागृहाचे कामकाजच स्थगित करून अध्यक्षांच्या दालनात उभय बाजूंच्या गटनेत्यांची बैठक बोलाविली. सभागृहातील मोकळ्या जागेत जुळविलेल्या कागदाचे तुकडे तोंडात घेऊन साऱ्या सदस्य मुंग्या अध्यक्षांच्या दालनात जमा झाल्या. पुन्हा ते कागद भराभरा जुळवून बातमी तयार केली गेली आणि एका सदस्याने ती वाचण्यास सुरुवात केली. ‘राज्यातील विकासाची कामे मुंगीच्या वेगाने सुरू आहेत असे म्हटले तर तो मुंगीचा अपमान होईल’ असा टोला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्यासमक्ष मारला, अशी ती बातमी होती. ‘मतदारसंघातील एका रस्त्याचे काम सात वर्षे रखडले, याला वेगवान विकास म्हणायचे का, असा सवालही त्यांनी स्वपक्षाच्या सरकारला केला..’ बातमी वाचून झाली आणि पुन्हा सारे बुचकळ्यात पडले. हा खरेच मुंग्यांचा अपमान आहे की कौतुक आहे, यावर चर्चा सुरू झाली आणि हरिभाऊ बागडेंनी महाराष्ट्रातील विकासाचे वाभाडे काढताना मुंगीचे कौतुकच केले असा निष्कर्ष काढण्यात आला. बैठक संपली. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू होताच, विरोधी बाकांवरील मुंगीने मांडलेला हक्कभंग प्रस्ताव मागे घेतला आणि सत्तारूढ बाकावरील सदस्य मुंगीने मांडलेला अभिनंदनाचा प्रस्ताव एकमताने संमत झाला. आता त्या प्रस्तावाची प्रत हरिभाऊंना पाठविण्यात येणार असून, प्रत्येक मुंगी ठरावाच्या कागदाचे तुकडे तोंडात घेऊन मुंबईकडे निघाली आहे, असे समजते..

First Published on February 7, 2018 4:43 am

Web Title: maharashtra assembly haribhau bagde