‘राखीची गोष्ट आठवते?’.. असा प्रश्न तुम्हाला कुणी केला, तर ‘काय बावळट आहे’, अशा नजरेने तुम्ही त्याच्याकडे पाहाल, आणि विश्वासाने ‘हो’ सांगाल. पण राखीची गोष्ट तुम्हाला आठवणारच नाही. ही गोष्ट गेल्या दोन-तीन वर्षांतली आहे. तरीही राखीची गोष्ट मात्र आपण विसरून गेलो आहोत. ‘उद्धव ठाकरे हे माझे भाऊ आहेत’, असे राखी सावंतने जाहीर केले, आणि ‘राखीला भाऊ मिळाला!’. त्यामुळे त्याची ‘बातमी’ही झाली. नंतर राखीच्या धाग्याला राजकीय महत्त्वही आले. राखी सावंतने मराठीपणाच्या धाग्याने ठाकरेंना भाऊ म्हणून जाहीर केले, पण नंतर ती रामदास आठवलेंच्या गोटात दाखल झाली. पण यामुळे राखीच्या धाग्याचे महत्त्व कमी झाले नाही. पुढे कडव्या शिवसैनिकांच्या मनगटांवर ‘शिवबंधन धागा’ दिसू लागला. हा रबरी जाडसर धागा मनगटावर असेपर्यंत पक्षनिष्ठेची शपथही सैनिकांनी घेतली. पुढे ज्यांनी पक्षनिष्ठेला तिलांजली दिली, त्यांनी मनगटावरचा शिवबंधनाचा धागा काढून खुंटीवर टांगला. तरीही असा धागा हे निष्ठेचे चिन्ह ठरले. अनेकजण आपल्या मोटारींवर पक्षाचे झेंडे लावतात, काहीजण निशाणीचे स्टिकर चिकटवतात, तर काहीजण आपल्या नेत्यांच्या नावाशी निष्ठा दाखविणाऱ्या ‘नंबर प्लेट’ बनवून कायद्याला वाकुल्या दाखवितात. तरीही चपटय़ा रबरबंदासारख्या धाग्याच्या रूपाने निष्ठादर्शनाचा मार्ग अधिक सोयीस्कर ठरल्याने आता भाजपलाही त्याचे महत्त्व समजून चुकले आहे. भाजप हा संघाच्या मुशीतला पक्ष. रक्षाबंधनाच्या दिवशी संघशाखेवर भगव्या रेशीमदोरीतील राखी मनगटावर चढणार असली, तरी त्या प्रत्येक राखीधाऱ्याची निष्ठा भाजपवर अटळ राहील, याबद्दल अलीकडे छातीठोक पुरावे उपलब्ध नसल्याने, भाजपचा स्वतचा निष्ठादर्शनाचा धागा असावा, असे प्रसादभाऊ लाड यांना सुचले, आणि महापालिका निवडणुका समोर आल्याने त्याचे महत्त्व आशीषभाऊ शेलारांनाही पटले. संघाचा स्वयंसेवक हा भाजपचा कार्यकर्ता असू शकतो, पण भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा संघाचा स्वयंसेवक असू शकत नाही, हे गुपित प्रसादभाऊ लाड यांच्याएवढे अन्य फारसे कुणीच जाणत नसावेत. सत्तेचा खवा भाजपच्या तंबूतच मिळणार हे लक्षात घेऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या प्रत्येकाच्या मनगटावर संघाची भगवी राखी नसली, तरी ‘अटल धागा’ मात्र असेल, हे पटविण्यात प्रसादभाऊ लाड यांना यश आले, असे म्हणावयास हरकत नाही. अटलबंधनचा धागा पक्षाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी भावनिक नाते जोडणारा असला, तरी तो संदर्भ पक्षातील प्रत्येक आयारामाला माहीत असेल असेही नाही. दीनदयाळ उपाध्याय आणि पक्षाचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे काहीतरी नाते असावे अशी काही आयारामांची समजूत असल्याचे अलीकडेच सिद्ध झाले होते. ते काहीही असो राखी, शिवबंधन आणि अटलबंधन हे परंपरेकडून सांस्कृतिकतेच्या मार्गाने राजकारणात शिरण्याचे एक अभूतपूर्व वर्तुळ आता पूर्ण झाले आहे. अटलबंधनाची कल्पना कोणाचीही असली, तरी त्याचे श्रेय मात्र शिवबंधनालाच द्यावे लागेल.