नमस्कार, चणे पे चर्चा या कार्यक्रमात आपले सर्वाचे स्वागत. इथे आपल्याबरोबर चणे खात खात चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत, रा. रा. विश्लेषक जे की थोर विचारवंत आहेत. त्यांच्या अनेक फेसबुक पोस्ट प्रसिद्ध असून, अलीकडेच त्यांच्या आजवरच्या त्यांच्या ट्वीट्सचा संग्रह पुस्तकरूपानं प्रसिद्ध झालेला आहे. तर विश्लेषकजी आपल्या या ज्या चणे पे चर्चा या कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे. या कार्यक्रमात आपण डिजिटल इंडियाबद्दल बोलणार आहोत. तर हे जे डिजिटल इंडियन आहे ते नेमके काय आहे?

– मला वाटते ही अत्यंत क्रांतिकारी चळवळ आहे. आज तरुणांच्या हाताला काम नाही, असे जे म्हणतात त्यांनी हे जे काही जमिनीवरचे वास्तव आहे ते नीट पाहावे. आज तरुणांच्या हातांना जे काही काम डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देण्यात आले आहे ते अभूतपूर्व आहे. आज व्हॉट्स्याप विद्यापीठातून, ट्विटर कॅम्पसमधून डिजिटल विचारवंतांची पिढी घडवण्याचे काम होत आहे. गेल्या कित्येक वर्षांत एवढी ज्ञानलालसा असलेली पिढी या देशात जन्माला आली नव्हती.

– नक्कीच. परंतु विश्लेषकजी, हे कुठे तरी असुरक्षित आहे, असे नाही का वाटत? म्हणजे कालच भाजपचे ट्विटर खाते हॅक झाले. त्यावरून मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य करण्यात आले.

– खूपच चांगला आहे तुमचा प्रश्न. खरे तर तो विचारायला नको होता. पण येथे आपण हे जे हॅकिंग आहे ते नीट समजून घेतले पाहिजे. ट्विटर हॅकिंगचे दोन प्रकार असतात. भौतिक आणि जैविक. म्हणजे आपण काही तरी बोलून जातो मनातले आणि लगेच कचकन् जीभ चावतो, की हे जे काही बोललो ते बोलायला नको होते. भाजपच्या ट्विटर खात्याचे हे जे हॅकिंग झाले ते जैविक की भौतिक हे पहिल्यांदा पाहायला पाहिजे. पण एक मात्र खरे की, हल्ली वारंवार हॅकिंग होते. – विश्लेषकजी, हे नक्कीच भयंकर आहे.

– खूपच भयंकर. आपण येथे पाहू शकता की हे जे चालले आहे ते डिजिटल इंडियाला फारच मारक आहे. यामागे एक मोठे कारस्थान आहे आणि ते पसरतच चालले आहे.

– नक्कीच. विश्लेषकजी, हे जरा आमच्या दर्शकांना खुलासा करून सांगाल का?

– जरूर. त्याचे काय आहे, हल्ली जैविक हॅकिंगची टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे, की ती नुसती जीभ चावण्यावरच थांबलेली नाही. त्यात माणसाची जीभसुद्धा हॅक केली जाते.

– काय सांगता?

– मग? हवे तर रावसाहेब दानवेंना विचारा. त्यांची जीभ किती तरी वेळा हॅक झाली आहे..  हॅकिंग साधे वाटले की काय तुम्हांला?