ह्य़ो सीएमसाहेब भलताच हुशार बाप्पा! त्यायनं साऱ्या जिल्ह्य़ालेच डिजिटल का काय ते करून टाकलं म्हने! आता कामासाठी तालुक्याले आन् जिल्ह्य़ाले जाचं काम न्हाई म्हने राजेहो. सारे सरकारी कागदं ग्रामपंचाईतीतून मिळन म्हने! परतेक पंचाईतीत नवा कोरा काम्पुटर बसवला सरकारनं, त्येची एक बटन दाबली का शेकडय़ानं कामं होतीन म्हने. त्येचेसाठी वाय का फाय नावाची सोय केली म्हने सरकारनं, पन ते बटन दाबनं कोन हो? येथी कुनाले समजते त्या डबडय़ातलं. त्याच्यासाठी बी एक माणूस देनार हाय, असं काल इतवारी जाहीर झालं म्हने! ह्य़े सेवा जरी आनलाइन आसली तरी थे चालवाले मानूस येनं म्हन्जे पुन्हा कामासाठी त्याहीच्या हातापाया पडनं आलंच ना. देवेनभौची घोषना आयकून गावातले पोट्टे लई उडय़ा मारून ऱ्हायले, पन हे डबडं चालू राहाले गावातली लाइन बी चालू पाहिजे ना, तिचाच तर पत्ता नसते कैयोकदा आन् ते वाय का फाय बीएसएनएलवाले देनार म्हने. त्याहीचे त् मोबाइलच काम करत न्हाई ना भौ! आता त्याईपक्षी जास्त स्पीडची सेवा ते कशी देईन कोनाले ठाव. या आधीई सरकारनं पंचाईतीले टीवी देल्ले हुते. मंग ते बंदई पडले. आता त् त्येचा खोका बी कुठं दिसत न्हाई. तसं याचं बी होईन का काय, काई समजतच न्हाई ईचिन. इतवारी देवेनभौ थेट आनलाइनच बोल्ले. थे बोलत हुते गावातल्या पोट्टय़ायशी, तवा मधीच यक बुडगं उठलं आन् शेतमालाले भाव कधी देतं आन् कर्ज कवा माफ करतं, असं भौले इचारायले लागलं. गावातले बीजेपीवाले मंधी पडले आन् थ्या बुडग्याले चूप बसवला. न्हाई त् आणली होती राजेहो त्यानं आफत! लोकायले सारं फुकटंच पायजे. त्या पवारानं आदत लावली ना! आन् यायनं बी वादे केल्तेच ना इलेक्शनच्या मोसमात. तवा संधी भेटली बुडग्याले आन् उघडलं त्यानं हुत्काड. त्येचं बी काय चुकलं म्हनावं. उद्घाटनाच्या टायमाले सरकारी पाहुने खूप बोलत हुते. गुगल का काय ते सांगत हुते. जसा मोबाइल वापरता, तसंच हेबी वापराचं, असं सांगत हुते. आता परतेकाकडं मोबाइल हाय, पन बोलनं सोडलं त् त्येतलं काय बी समजत न्हाय साईच्यायले. तवा हा पंचाईतीतला काम्पुटर कसा समजून घ्याचा बा?, काई समजत न्हाई. आता ह्य़े सेवा आली का तालुक्याले जाचा खर्च वाचनं म्हने. आरं पन, बाकी कामाले त् जाच लागनं ना भौ! आधीच्या सरकारनंई अशीच महासेवा सुरू केल्ती. परतेक पंचाईतीत यक आपरेटर बसवला खरा पन त्येच्या पगाराचे वांधे झाले. मंग थो येवाचाच झाला. त्येच्यातले काही भयान थुतरे गाववाल्यायले तालुक्याले बलावू लागले. आखरी थ्ये सेवाच बोंबल्ली. तसंच याबी सेवेचं हुईन का? येक शंका मनात आली म्हून इचारलं बावा! देवेनभौचं नागपूरवर लई पिर्रेम हाय, त्येतून तो सगळं करते, पन जे काही करते थे ठीकठाक सुरू ऱ्हाले पायजे, तवाच त्याले काई मतलब, नाय त् मंग पुन्हा शेंडा ना बुडूक आन् नाचे तुडूक तुडूक.