मंत्रालयाच्या तळमजल्यावर संघटनेच्या तातडीच्या बैठकीत गंभीर वातावरणात एका गहन मुद्दय़ावर प्रदीर्घ चर्चा झाली. काही ठोस निर्णय घेऊन त्याच्या अंमलबजावणीचे सर्वाधिकार अध्यक्षांना बहाल करून बैठक संपली. सारे पदाधिकारी पत्रकार कक्षात पोहोचले. गावोगावीच्या वर्तमानपत्रांचे राजकीय प्रतिनिधी मोक्याच्या जागा पकडून ताटकळलेच होते. प्रथेनुसार चुळबुळ, आरडाओरडा, कॅमेरावाल्यांची लगबग सुरू झाल्यावर अध्यक्षांनीही प्रथेनुसारच हात उंचावून सर्वाना शांत राहण्याच्या सूचना केल्या. राजकीय पत्रकार म्हटल्यावर गडबड, गोंधळ हे जसे ओघानेच येते, तसा समजूतदारपणादेखील ओघानेच येत असल्याने, पुढच्याच क्षणाला पत्रकार कक्षात शांतता पसरली. अध्यक्षांनी माइक हाती घेतला. थोडय़ाच वेळात आपले लाडके मुख्यमंत्री कक्षात येणार असून त्यांच्या स्वागतासाठी आपण एकत्र जमलो असल्याने, स्वागताचाच औपचारिक कार्यक्रम होईल. मुख्यमंत्री नवीन असल्याने त्यांना प्रश्न वगैरे विचारू नयेत, अशा काही मौलिक सूचना अध्यक्षांनी केल्या. बराच वेळ गेला. अखेर मुख्यमंत्री दाखल झाले. अपेक्षेप्रमाणे त्यांचे नवनिर्वाचित आमदार सुपुत्रही सोबत होतेच. असा काही शिष्टाचार असतो का याबाबत यापूर्वीचा कोणताच अनुभव नसल्याने आणि ‘प्रश्न विचारू नका’ असे अगोदरच बजावण्यात आलेले असल्याने, मुख्यमंत्र्यांसोबत आमदार कशाला, हा प्रश्न कक्षास शिवलादेखील नाही.. शिवाय, कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडायचा असेही ठरलेलेच होते. स्वागताचा सोहळा पार पडला. ‘आम्ही तुम्हाला काही विचारणार नाही, आणि तुमच्याकडे काही मागणारही नाही’, अशी ग्वाही अध्यक्षांनी देताच मुख्यमंत्र्यांच्या अगोदरच प्रसन्न चेहऱ्यावर प्रसन्नतेची आणखी एक छटा उमटली. आता साऱ्या पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांकडे कान लावले. ‘पत्रकारांनी प्रश्नपत्रिका तयार करणारे नव्हे, तर उत्तरे शोधणारे सरकारचे प्रतिनिधी व्हावे’, अशी अपेक्षा सुरुवातीसच मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. नव्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या नव्या जबाबदारीचा अभिमान वाटून काही चेहरे खुलले. सरकार आणि पत्रकार यांच्यात असे नवे नाते मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच भेटीत निर्माण केल्याने उलटसुलट प्रश्न विचारण्याचा मुद्दाच संपला असला, तरीही पत्रकार परिषदेच्या प्रथेसाठी काही प्रश्नोत्तरे होणारच होती. अखेर त्यास सुरुवात झाली आणि मुख्यमंत्र्यांनी ते पठडीबाज उत्तर देताच सर्वाचे समाधान झाले. नुकताच कार्यभार हाती घेतल्याने आताच प्रश्न विचारणे योग्य नाही, यावर एकमत झाल्याचे वातावरण पसरले. मग मुख्यमंत्र्यांनीच पत्रकारितेचा एक लहानसा पाठ घेतला. पत्रकारितेशी असलेल्या ऋणानुबंधांची पूर्वपीठिकाही सांगितली आणि ‘आपलाच माणूस’ आता मुख्यमंत्री झाला आहे, या समाधानाची छाया कक्षावर पसरली.  मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारू नयेत, हे जणू ठरून गेले.. तरीही एक प्रश्न आलाच.. ‘आज दिवसभरात वैनींचा फोन किती वेळा आला आणि वैनींनी आज तुमच्या डब्यात काय दिले होते?’.. क्षणात  मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटले.  अपेक्षेहूनही सोप्या अशा त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी त्यांनी तोंड उघडण्याआधीच, समोरूनच कुणी तरी सडेतोड जबाब दिला. ‘मुख्यमंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतलेली असल्याने या प्रश्नाचे उत्तर राखून ठेवण्यात येत आहे!’.. मग अपेक्षेप्रमाणे हास्याची कारंजी फुलली आणि अपेक्षेप्रमाणे समाधानाच्या वातावरणात मुख्यमंत्र्यांची पहिली पत्रकार परिषद पार पडली!