ही गोष्ट खूप जुनी.. अनेक पक्षांच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झालेल्या देवेगौडा यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर संसदेच्या सभागृहात विरोधी पक्षांच्या बाकावरून एक सदस्य भाषण करत होता, तेव्हाची. चीनसारख्या साम्यवादी देशाला लोकशाही नावाच्या व्यवस्थेविषयी उत्सुकता असणे आणि तिचे निराकरण भारतातच होऊ शकते हा विश्वास असणे साहजिकच! विरोधी बाकावरून भाषण करणारा हा सदस्य एका संसदीय शिष्टमंडळासमवेत चीनच्या दौऱ्यावर गेला असताना एका चिनी नेत्याने न राहवून ही उत्सुकता बोलून दाखविली, आणि भारतीय लोकशाही कशी चालते, हे स्पष्ट करून सांगण्याची सूचना या शिष्टमंडळाच्या प्रमुखाने या सदस्यास केली.. पुढे काय झाले, त्याचा हा किस्सा- भारतीय लोकशाही कशी चालते त्याचे गूढ उकलताना या सदस्याने लोकसभेत सांगितलेला.. ‘आमच्या पक्षाची लोकसभेत सर्वाधिक सदस्यसंख्या आहे आणि आम्ही संसदेतील विरोधी पक्ष आहोत, ..दुसऱ्या क्रमांकाची सदस्यसंख्या असलेला पक्ष सरकारमध्ये नाही, पण त्याचा सरकारला बाहेरून पाठिंबा आहे.. तिसऱ्या क्रमांकाची सदस्यसंख्या असलेला पक्ष सत्तारूढ आघाडीत आहे, पण सरकारात नाही.. आणि ज्या पक्षाचा संसदेत एकमेव सदस्य आहे, तो मात्र सरकार चालवीत आहे.. भारतीय लोकशाहीचे हे वैशिष्टय़ आहे’.. पुढे सभागृहात काही मिनिटे प्रचंड हशा पिकला. बहुधा नंतर सारे जण गंभीरही झाले असावेत.. तरीही, आपण कोणत्या पक्षात आहोत, आपले नेमके विरोधक कोण, निवडणुकीच्या काळात आणि सत्तासंघर्षांत आपले नेमके मित्र किंवा शत्रू कोण, हे शेवटपर्यंत एखाद्या पक्षास किंवा उमेदवारास आणि मतदारासही समजू नये, आणि निवडणुकीच्या निकालानंतर जे काही घडते, ते पाहून राजकीय पक्ष, नेते आणि मतदारांनीही अचंबित होऊन तोंडात बोटे घालावीत, अशी स्थिती म्हणजे लोकशाही, हे त्या भाषणानंतर बऱ्याच मतदारांना समजून चुकले असावे.. लोकांनी मतदानाच्या वेळी बोटास शाई लावून घेतली की लोकशाहीतील मतदाराचे काम झाले, असा समजही रूढ झाला. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या ताज्या निवडणूक निकालापर्यंत लोकशाहीची ही परंपरा राजकीय पक्ष आणि गटतटांनी जपली आहे. ‘तुम्ही जनादेश देऊन मोकळे झालात, आता आम्ही लोकशाही स्थापन करतो’ असा संदेश मतदारास देण्यासाठी सारे जण सज्ज झाले. असे झाले की आपण तळागाळात पोहोचलो आणि रुजलो याचे समाधान लोकशाहीस वाटेल, यात शंका नाही. ती वेळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालानंतर सहा जिल्ह्य़ांतील चार पक्ष लोकशाहीस समाधानी करण्यासाठी सरसावले आहेत. कारण राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, यावर सर्वाची लोकशाहीएवढीच दृढ श्रद्धा आहे. मित्रत्वाचे एक अनोखे नाते या लोकशाही पद्धतीने रूढ केले, हे बरे झाले. एकमेकांस राजकारणापासून मुक्त करण्याच्या स्पर्धेत मैत्रवृद्धीच्या अशा सुदृढ संकल्पना रुजत असतील, तर ते नव्या लोकशाहीस एखाद्याच पक्षाला जनादेश देण्यापेक्षा अधिक उपकारक ठरणार नाही का?