दिल्लीच्या राजपथावर प्रजासत्ताक दिनी संचलनात सादर होणाऱ्या चित्ररथ किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांतून त्या त्या राज्याच्या संस्कृतीचे वास्तव दर्शन घडते, असे म्हणतात. राज्याची नेमकी ओळख, परंपरा, संस्कृती याचे सम्यक दर्शन घडविण्याची प्रथा राजपथावरील त्या शानदार सोहळ्यात जिवंत होते, असेही म्हणतात. ते पाहता महाराष्ट्राने यंदाच्या प्रजासत्ताक सोहळ्यात जे काही सादरीकरण केले, त्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य खाते आणि दिल्लीचे महाराष्ट्र परिचय केंद्र हे अभिनंदनास पात्र आहेत. या कार्यक्रमात नागपूरच्या जवळपास दीडशे शाळांमधील विद्यार्थ्यांनी सोंगी मुखवटे नृत्य सादर केले. आजकाल सर्वत्र मुखवटय़ांचाच बुजबुजाट झालेला असताना आणि खरे चेहरे त्यामागे दडून गेलेले असताना मुखवटे हेच वास्तव असल्याची जाणीव या नृत्यातून आपण करून देत आहोत, हे त्या बालकांना माहीतही नसावे. त्यांनी सादर केलेल्या आविष्काराकडे केवळ कलेच्या अंगानेच पाहिले, तर महाराष्ट्राच्या शिरपेचात पहिल्या पुरस्काराचा तुरा खोवण्याचा त्यांचा प्रयत्न अभिमानास्पदच आहे. पण त्याहूनही, हा नृत्यप्रकार सादरीकरणासाठी निवडणाऱ्या सांस्कृतिक कार्य विभागाची कल्पकता अधिक कौतुकास्पद आहे. सोंगी मुखवटे नृत्य ही एक पारंपरिक कला असली, तरी त्यामध्ये कोणत्याही काळातील वास्तवाशी जुळवून घेण्याचा जिवंतपणा आहे. गेला महिनाभर या नृत्याचा सराव शाळाशाळांमध्ये सुरू होता. या शाळा विदर्भातील आणि नागपूरच्या आसपासच्या होत्या, हा वास्तवाशी जुळणारा निव्वळ योगायोग असावा, अशी आमची खात्री आहे. तसेही आपण मुखवटे घालूनच वावरत असतो. पुरोगामित्वाचा मुखवटा चढविलेल्या आपल्या राज्याचा खरा चेहरा अलीकडच्या अनेक घडामोडींमधून उघडा झाल्यावर आता खरोखरीचे सोंगी मुखवटे चढवूनच वावरण्याची वेळ महाराष्ट्रावर आली आहे. दुष्काळ असला तरी शेतकऱ्याचे बरे चालले आहे, विषम वागणूक मिळूनही महिला आनंदी आहेत, असुरक्षित असूनही समाजात सारे काही आलबेल आहे आणि संघर्ष सुरू असूनही अच्छे दिन असल्याच्या समजुतीत जगणे सुरूच आहे. अशा परिस्थितीचे दर्शन घडविण्यासाठी सोंगी मुखवटय़ांच्या नृत्याविष्काराएवढा योग्य कलाप्रकार शोधूनही सापडला नसता. म्हणूनच, सोंगी मुखवटे नृत्य सादर करण्याची कल्पना ज्या मेंदूतून जन्मली त्या अनामिकाचे अभिनंदनच केले पाहिजे. महाराष्ट्राच्या वर्तमान वास्तव जीवनाचा अस्सल आविष्कार दिल्लीच्या राजपथावर सादर करून मुखवटे संस्कृतीची ओळख मूकपणे करून देण्याचा हा प्रयत्न खरोखरीच स्तुत्य आहे. हा कलाप्रकार सादर करून बक्षीस घेऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यांचे काल नागपुरात जंगी स्वागत झाले. राज्याच्या सांस्कृतिक खात्यानेही आता सोंगी मुखवटे नृत्यप्रकारास सातत्याने प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी आमची शिफारस आहे. त्यामुळे खरे चेहरे झाकण्याची कला शालेय जीवनातच सर्वाना आत्मसात होईल आणि भविष्यात त्याचाच सर्वाधिक उपयोगही होईल, यावर आमच्या मनात शंका नाही. या आविष्काराला पहिल्या क्रमांकाचा मान देऊन दिल्लीनेही महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेला दाद दिली, यातच सारे सामावले आहे.