विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर घेतले की वेताळ गोष्ट सांगणार आणि पुन्हा तीच, ‘डोक्याची शकले होतील’ अशी धमकी देणार हे माहीत असूनही फांदीवरचे प्रेत खांद्यावर घेऊन तो चालू लागला. काही वेळातच वेताळाने गोष्ट सुरू केली.. ‘एका गावात एका माणसाला दारू दुकानाचा परवाना मिळाला. आमदाराच्या कृपेने सुरू केलेल्या या दुकानास त्याने प्रेमाने आमदाराचेच, ‘दत्त बार’ असे नाव दिले. लगेचच दुकानात दारुडय़ांची रीघ लागली. त्याच गावात महादेव, शिवा आणि संभा असे तिघे मित्र होते. त्यांनाही दारूची चटक लागली. सकाळ झाली, की तिघेही ‘दत्त बार’मधून ‘देशी’ झोकूनच गावभर हिंडत. त्यामुळे तिघांना गाव ‘बेवडय़ा महादेव’, ‘बेवडय़ा शिवा’ आणि ‘बेवडय़ा संभा’ म्हणूनच ओळखू लागले. दिवसागणिक त्यांचे व्यसन वाढू लागले. बेवडय़ा महादेव तर, दिवसभरात दिसला नाही, तर कुठल्या तरी गटारात नक्की सापडायचा. बेवडय़ा शिवा ‘दत्त बार’च्या कोपऱ्यावरच हात पसरून दारूसाठी भीक मागू लागला. काही दिवसांनंतर अचानक गावात तलाठय़ाने सरकारी फतव्याचा कागद ‘दत्त बार’वर लावला. ‘देवाचे, ऐतिहासिक ठिकाणांचे किंवा इतिहासपुरुषांचे नाव द्यायचे नाही’, असे फर्मान सोडले. ‘दत्त बार’च्या मालकाने परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला. ‘हे देवाचे नव्हे, आमच्या दैवताचे नाव आहे’ म्हणाला. त्यांनीच उद्घाटन केलंय, असंही त्याने सांगून बघितलं. पण ‘सरकारी कामात अडथळा आणलास तर गजाआड धाडीन’ असा दम पोलीसपाटलानेही दिल्याने ‘दत्त बार’च्या मालकाचा नाइलाज झाला. कुणीतरी त्याला समजावलं. ‘बाबा, नावात काय आहे. नव्या बाटलीत जुनी दारू भरली म्हणून तिची झिंग काय कमी व्हनार हाय का?’ दत्त बारवाल्याला ते पटले आणि त्याने दुकानाचे नाव बदलले. आता दत्त बारचे ‘रॉयल बार’ झाले होते. दुसरा दिवस उजाडला. महादेव, शिवा आणि संभा ही बेवडय़ांची टोळी सकाळीच बारसमोर हजर झाली. बारचे नाव बदलल्याची कुणकुण त्यांना केव्हाच लागली होती. तरीही त्यांनी नेहमीची ‘देशी’ची बाटली घेतली. बेवडय़ा महादेवाने ती उघडली, एक घोट घेतला, बेवडय़ा शिवाकडे सरकवली. बेवडय़ा शिवाने घोट घेऊन बेवडय़ा संभाच्या हातात दिली. बाटली संपली, तेव्हा तिघेही बेवडे ‘टाईट’ झाले होते. मग दुकानाच्या नव्या पाटीकडे पाहात बेवडय़ा महादेव नाचू लागला. हे पाहून पोलीसपाटील संतापला. ‘माणसांनाही देवाची किंवा इतिहासपुरुषांची नावे ठेवण्यास बंदी करावी’, असा ठराव आजच ग्रामसभेत करायचा, असे त्याने ठरविले. आता बेवडय़ा शिवा, संभा आणि महादेवाची नावेही बदलली आहेत. तरीही सकाळी उठून ते ‘रॉयल बार’वर जातात आणि झोकांडय़ा खात गावभर हिंडतात!’.. गोष्ट संपली आणि विक्रमादित्याने हसण्यापुरते तोंड उघडले, तोच वेताळ प्रेतासह पुन्हा झाडावर जाऊन लटकू लागला..