20 February 2019

News Flash

‘भूमिका’ आणि ‘गुलदस्ता’!..

भूमिका हा स्वत:च एक मोठा गमतीदार शब्द आहे. त्याची असंख्य रूपे असतात.

संग्रहित छायाचित्र

काळ मोठा कठीण आला आहे. चहूबाजूंना प्रश्न आणि प्रश्नांचाच महापूर आहे, आणि सारे जण संभ्रमात सापडले आहेत. बोलावे की न बोलावे असे काहूर सर्वाच्या मनात सुरू आहे. बोलावे तर काय बोलावे, न बोलावे तर कोणत्या प्रश्नावर न बोलावे हे समजणेही कठीण झाल्यामुळे, कोणत्या प्रश्नावर बोलावे, काय बोलावे अथवा कोणत्या प्रश्नावर काहीच न बोलता गप्प राहावे हे समजून घेण्यासाठीदेखील जाणकारांकडेच अपेक्षेने पाहावे लागते. असे जाणकार मोजकेच असतात. कोणत्या प्रश्नावर कोणी भूमिका  घ्यावी, याविषयी ते वारंवार मार्गदर्शन करीत असतात. अर्थात, त्यांच्या मार्गदर्शनास मोठे महत्त्वही असते. तुमच्याआमच्या बाबतीत, कोणत्याही प्रश्नावर घेतलेली कोणतीही भूमिका आपण फार तर कुटुंबासमोर व्यक्त करतो, आणि जेव्हा नाके मुरडली जातात, तेव्हा त्या भूमिकेस मुरडही घालून गप्पदेखील बसतो. या दोन्ही कृती या भूमिकाच असतात. आपली एखादी भूमिका कुटुंबातील सर्वास पसंत पडली, तर मिळणाऱ्या नैतिक पाठिंब्याच्या जोरावर ती आपण लोकल ट्रेनमधील सहप्रवाशांसमोर मांडतो, आणि प्रवास संपेपर्यंत त्यावर घमासान चर्चादेखील घडवितो. त्यामुळे वाढणाऱ्या उत्साहाचा परिपाक म्हणजे, पुढे तीच भूमिका फेसबुकसारख्या समाजमाध्यमावरही मांडतो. त्यावरील प्रतिक्रिया अजमावत राहतो. कधी कुणीच काहीच प्रतिक्रिया देत नाही. पण प्रतिक्रिया न देता गप्प राहणे हीदेखील ज्याची त्याची भूमिकाच असते.

म्हणूनच, भूमिका हा स्वत:च एक मोठा गमतीदार शब्द आहे. त्याची असंख्य रूपे असतात. काही वेळा गप्प बसणे हीदेखील एक भूमिकाच असते, हे बऱ्याचदा लक्षात येत नाही. भूमिकेचे दुसरे रूप म्हणजे, जाणकाराच्या भूमिकेत जाऊन, इतरांना भूमिका घेण्याचा सल्ला देणे हे होय! असे केल्याने, एखाद्या विषयावरील स्वत:ची भूमिका मांडली नाही, तरीही जाणकार म्हणून अल्पावधीत मान्यता मिळू शकते. असे जाणकार असा सल्ला कोणत्याही क्षेत्रातील कोणाही व्यक्तीस, समूहास अथवा थेट सरकारासही देऊ  शकतात. ‘एखाद्या प्रश्नावर गप्प राहू नका, भूमिका घ्या’, असा सल्ला सरकारला देण्यामागेही ‘सल्लागाराची भूमिका’च असते. एखाद्या प्रश्नावर सल्लागाराने बजावलेली भूमिका मोलाची ठरत असते. साहित्यिक हा समाजमनाचा आरसा असतो. तसे साहित्यिक, चित्रकार, पत्रकार, व्यंगचित्रकार असे अनेक जण समाजमनाचेच आरसे असतात. त्यामुळे या साऱ्यांनी सध्याच्या काळात कोणती ना कोणती भूमिका घेणे गरजेचेच आहे. त्यातूनच, समाजातील अन्य घटकांची भूमिका तयार होत असते. हे लक्षात घेता, या सर्वानी भूमिका घेतली पाहिजे हे योग्यच असते. पण बऱ्याचदा, यातील अनेक जण गप्प बसण्याचीच भूमिका घेतात, तेव्हा या लोकांना भूमिका घ्या असे बजावण्याची भूमिका अशा जाणकारांनाच वठवावी लागते. किंवा जर तसे बजावत राहिले, तरच ‘जाणकार’ ही ओळख टिकून राहाते. कोणती भूमिका घ्यावी हा मात्र आपला आपला विषय असतो. कोणताही समंजस माणूस अमुकच भूमिका घ्या असा सल्ला कधीच कुणाच्या माथी मारत नसतो.

त्यात, अशा जाणकारांकडे नेहमी सोबत एक ‘गुलदस्ता’ असतो. प्रसंगी, ‘भूमिका घ्या’ असा सल्ला देताना, आपली भूमिका गुलदस्त्यात (ताजी) राहील याची काळजी घेणे हीदेखील एक ‘प्रासंगिक भूमिका’च असते..

First Published on January 23, 2018 2:12 am

Web Title: maharashtra government role raj thackeray opinion