प्रिय बंधूंनो, मातांनो आणि भगिनींनो, आज महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या सरकारने प्लास्टिकबंदीच्या निमित्ताने एक नवी क्रांती केली आहे. (टाळ्या) ही क्रांती आहे पर्यावरणाची. आपल्या पृथ्वीला आज प्लास्टिकचा विळखा पडलेला आहे. (टाळ्या) शिवाय थर्माकोलचा पण विळखा पडलेला आहे. यामुळे पर्यावरणाचा किती तरी मोठा विनाश होत आहे. इतका मोठा की त्यामुळे मे महिन्यातली नालेसफाई जून उजाडला तरी होऊ शकत नाही. या प्लास्टिकच्या राक्षसामुळे आज मुंबईतल्या उड्डाणपुलांवरसुद्धा पाणी साठू लागले आहे. गाईगुरांच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या सापडलेल्या आहेत. हे संकट दूर करण्याच्या संबंधाने आमचे थोर पर्यावरणवादी युवा नेते आदित्यजी ठाकरे यांच्या प्रेरणेने आम्ही प्लास्टिकचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. (टाळ्यांचा कडकडाट. जयजयकाराच्या घोषणा.. आणि तुतारी!) या निर्णयाबद्दल आज अनेकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण असल्याची आमची माहिती आहे. पण आम्ही हे सांगू इच्छितो, की प्लास्टिकबंदी होणार म्हणजे होणारच. हा कायदा कोणत्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नाही. (टाळ्याच टाळ्या) कारण लोकहित पाहूनच आम्ही हा कायदा केलेला आहे. लोकहितापुढे आम्ही जेथे सत्तेची पर्वा करीत नाही तेथे प्लास्टिक म्हणजे किस झाड की पत्ती? (हशा आणि टाळ्या.) पण आज या कायद्यामध्ये काही लोक खोट काढीत आहेत. लोकांना या निर्णयाचा त्रास होतो अशी ओरड करीत आहेत. बंधूंनो आणि भगिनींनोऽऽ, हा सगळा आमच्या विरोधकांचा खोटा प्रचार आहे. प्लास्टिकबंदी लोकांच्या विरोधात आहे असे ते म्हणतात. आम्ही त्यांना विचारू इच्छितो की, कोणत्या आधारावर ते असे म्हणतात?

या कायद्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये अशी काळजी आम्ही घेतलेली आहे. मोठा आर्थिक विचार आहे त्यामागे.  त्यामुळेच आम्ही या कायद्यातून सगळ्यात पहिल्यांदा पॅकबंद वस्तूंना वगळले. तुमची ती बटाटय़ाच्या कापाची पाकिटे घ्या, ते एकदा वापरून फेकून देण्याचे श्रीखंडाचे डबे घ्या.. पर्यावरणप्रेमातून.. आपले ते लोकहिताच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या कॉर्पोरेट प्लास्टिकला बंदीतून वगळले आहे. लोकांची अडचण होऊ नये हाच त्यामागचा विचार आहे. अडचणीचे सोडा, लोकांच्या श्रद्धेचासुद्धा विचार आम्ही केलेला आहे. आम्ही हे छाती ठोकून सांगतो, की जेथे श्रद्धेचा आणि धर्माचा प्रश्न येतो, तेथे प्लास्टिकच काय, पण आख्खे पर्यावरण जरी नाल्यात गेले तरी आम्ही त्याची पर्वा करणार नाही. (टाळ्यांचा कडकडाट आणि तुतारी!) आणि म्हणूनच गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी थर्माकोल वापरण्यास आम्ही तूर्तास परवानगी दिलेली आहे. या थर्माकोलला पर्यावरणस्नेही थर्माकोल म्हणून मान्यता देण्याचा प्रस्तावही आमच्या विचाराधीन आहे. आता काही लोक म्हणतात की यामुळे किराणा मालाच्या दुकानदारांवर परिणाम होणार. परंतु त्याची काळजी करण्याचे काहीही कारण नाही. पॅकबंद पिशव्यांना परवानगी देण्याच्या संबंधाने आमचा विचार सुरू आहे. भविष्यात प्लास्टिकचा गैरवापर टाळण्यासाठी आपण निळ्या रॉकेलप्रमाणे निळ्या प्लास्टिक पिशव्या बाजारात आणणार आहोत. (टाळ्या) शिवाय दुधाच्या, तेलाच्या, डालडय़ाच्या, वेफरच्या, चिवडय़ाच्या पिशव्या घराघरांत जाणार आहेतच.

तेव्हा लोकांनी आता आपले कसे होणार याचा विचार करणे बंद केले पाहिजेल. आता विचार करायचा असेल, तर तो फक्त पर्यावरणरक्षणाचा. केवळ तेवढय़ासाठीच आपण प्लास्टिकची सर्जरी केलेली आहे. (हशा) प्लास्टिकचा पाठिंबा काढलेला आहे. (हशा आणि टाळ्या) आमची आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे, की पर्यावरणरक्षणासाठी लोक हो, कदम कदम बढाये जा..