News Flash

या पेशाची इज्जत न्यारी..

आपण शिक्षक आहोत, मास्तर आहोत

प्रतिनिधिक छायाचित्र

आपण शिक्षक आहोत, मास्तर आहोत, शिक्षण सेवक आहोत, की समाजसेवक आहोत याचा फैसला करण्याची वेळ शिक्षण खात्याच्या अखत्यारीतील तमाम शिक्षकांपासून अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपलेली आहे. शिक्षकी हा केवळ पोटापाण्याचा व्यवसाय नव्हे, तर ते भावी नागरिक घडविण्याच्या प्रक्रियेतील एक महान असे व्रत असते. असा भावी नागरिक घडविणाऱ्या व्रतस्थाला पूर्वी गुरू असे म्हणत असत. अलीकडे मात्र, आपण गुरू आहोत, की गुरासमान वागविले जाणारी माणसे आहोत, या संभ्रमात सापडलेल्या या सरकारी शिक्षकास त्यातून बाहेर काढावे अशीच तर राज्याच्या शिक्षण खात्याची खटपट सुरू आहे! त्यासाठी शिक्षकांनी शिकविण्याचे काम केले पाहिजे; पण शिकविण्यासाठी शाळांमध्ये मुलांचा हजेरीपट दिसला पाहिजे, आणि हजेरीपट वाढविण्यासाठी सरकारी नसलेल्या शाळांमधील मुलांना शाळाबाह्य़ समजून  शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे. सरकारी शाळांचे भवितव्य ठरविण्याची वेळ आता आली आहे, हे उमगल्यामुळेच शिक्षणप्रसाराचा असा एक दूरगामी विचार सरकारला आता सुचला असावा. शाळाबाह्य़ मुलांना सरकारी प्रवाहात सामील करून घ्यायचे असेल, तर शिक्षकांनी कंबर कसण्याशिवाय पर्यायच नाही. केवळ वर्गात मुलांना शिकविणे म्हणजे विद्यादान नव्हे, तर शिक्षणापासून वंचित असलेल्या प्रत्येकास आपल्याकडील ज्ञानगंगेच्या प्रवाहात चिंब करणे हा या व्रताचा मथितार्थ. म्हणूनच, सरकारी शिक्षकी ही केवळ नोकरी नव्हे, तर ते खडतर व्रत आहे याची जाणीव शिक्षकांना करून देण्याचा चंग खात्याने बांधला आहे. गावोगावी फिरा, परिसरात भटकंती करा, घराघरात घुसून शाळाबाह्य़ मुलांचा शोध घ्या, पालकांच्या मोबाइल क्रमांकाची माहिती संकलित करा आणि कसेही करून मुलांना सरकारी शाळेत दाखल करून घ्या, ही सारी जबाबदारी शिक्षकांवरच देण्याची अभिनव क्रांतिकारी योजना शिक्षण खात्याने आखली आहे. ‘कोणत्याही चांगल्या योजनेला नाके मुरडण्याची सवय असलेल्या समाजात अशी एखादी दूरदृष्टीची योजना पचनी पडणे काहीसे अवघडच’ असल्याने, तावडेंच्या या योजनेवरही टीका होईलच. पण त्यामुळे शिक्षण खात्याने आपला हेका सोडून देऊ नये. शिक्षणदानाच्या पवित्र व्रताचे पुण्य केवळ सरकारी शिक्षकीतूनच मिळते व कोणत्याही पुण्याप्राप्तीसाठी खडतर साधना करावी लागते, हे उमगले तर सरकारी शिक्षकीसाठी असंख्य बेरोजगार तरुण पुढे सरसावतील. शिवाय, मुलांना सरकारी शाळेची गोडी लागावी म्हणून त्यांच्यासाठी काही आकर्षक योजनाही तावडेंकडे तयार आहेत. मुले ही देवाघरची फुले असल्याने त्यांना शाळेहूनही सुट्टी अधिक प्रिय असते. आकाशात ढग दिसताच तावडेकाका शाळांना सुट्टी जाहीर करतात आणि एकदा नाव घातले की पुढची यत्ता गाठता येते हे माहीत झाले की सारी मुले आपोआपच सरकारी शाळेत दाखल होतील. मान्यता नसलेल्या शाळांना मान्यता दिली, की तेथील मुले आपोआप सरकारी पटावर येतील आणि अशा रीतीने, शिक्षकवर्गाच्या खडतर व्रताची सुफळ सांगता होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 2:47 am

Web Title: maharashtra teachers in a bad condition
Next Stories
1 लोकशाहीचा मनमोर..
2 चिंतूचे चहापान..
3 वजनवाढ : एक समस्या!
Just Now!
X