सर्वात अगोदर, महाराष्ट्राच्या विधिमंडळातील ‘त्या’ २२ आमदारांचे अभिनंदन करावयास हवे! राज्याच्या मंत्रिमंडळातील काही जागा ‘विस्तार-संधी’साठी रिक्त असतानाही आणि यापैकी अनेकांना भविष्यात ‘त्या’ जागेची लॉटरी (पक्षी- वर्णी) लागण्याची संधी धूसरच असतानाही, मंत्रिपदाचा थाट अनुभवण्याचा आनंद मात्र त्यांना प्राप्त होणार आहे. विरोधी बाकांवरून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणे हे ज्यांचे कर्तव्यच असते, अशा प्रतोद आमदारांच्या गळ्यातही मंत्रिपदाच्या दर्जाची माळ पडणार असल्याने, आता आपापल्या गावी, मतदारसंघांत दिमाखात स्वत:चे सत्कार घडवून आणण्याची तयारी सुरू करावयास हरकत नाही. सभागृहातील कामकाजातील आपल्या पक्षाच्या आमदारांच्या सहभागास शिस्त लावण्यासाठी ‘चाबूक’ हाती ठेवणाऱ्या या वैधानिक पदास आता मंत्रिपदाचा थाट लाभणार असल्याने, ‘फ्लोअर मॅनेजमेंट’ची त्यांची जबाबदारी आता अधिक ‘गंभीर’ होणार आहे. या प्रतोदांनी आमदारांच्या वर्तनावर नजर ठेवावयाची असल्याने, अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी उत्सुकतेने गावागावातून येणाऱ्या अभ्यागतांना ‘स्वयंशिस्त’ नावाचा एक आगळा प्रकार विधिमंडळाच्या आवारात अनुभवता येईल. गोंधळ, गदारोळ, घोषणाबाजी, वादविवाद, कागदांची फेकाफेक, आरडाओरडा, नाटय़पूर्ण अभिनय म्हणजे ‘परफॉर्मन्स’ असा बहुतेकांचा समज असतो. असे काही सभागृहात घडलेच नाही, तर कामकाज पाहण्यासाठी आलेल्या अभ्यागतांचा अलीकडे विरस होतो, आणि कामकाजाचा आजचा दिवस अगदीच ‘सपक’ गेला असेही त्यांना वाटू लागते. कधी कधी असेही होते की, सभागृहात सारे आमदार हजर आहेत, सारेजण शिस्तीने कामकाजात सहभागी झाले आहेत आणि सत्ताधारी-विरोधक गांभीर्याने लोकशाहीच्या या सर्वोच्च सभागृहाची शान वाढवत आहेत, असे दृश्य पाहण्याच्या अपेक्षेने समंजस जनता घरातील टीव्हीसमोर बसते.. प्रतोदांना मंत्रिपदाचा दर्जा मिळणार असल्याने, या जनतेचा आता अपेक्षाभंग होणार नाही. कर्तव्य आणि जबाबदारीचे ओझे मोठय़ा कौशल्याने पेलून सदनाचे कामकाज सुरळीत चालावे, सदनात सुसंवाद राहावा यासाठी पक्षप्रतोदाची जबाबदारी मोठी असते असे म्हणतात. सभागृहात वैधानिक पेचप्रसंग उद्भवल्यास, सरकार व सदस्य यांच्यातील समन्वयाची भूमिका प्रतोदाने पार पाडावी अशी अपेक्षा असते. तो पक्षश्रेष्ठींचे कान आणि डोळे असतो. एवढय़ा साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असताना, प्रतोद पदावरील २२ आमदार मंत्रिपदाच्या दर्जाचे लाभार्थी ठरले तर त्यांची जबाबदारी वाढेल आणि विधिमंडळाच्या कामकाजातील गदारोळादी बेशिस्त कायमची संपुष्टात येईल याबद्दल शंका घेण्याचे आता कारण नाही. तसेही, कामकाजाचे कायदे, नियम, अधिकार भरपूर असतात. पण गदारोळ आणि गोंधळात ते हरवून जातात. आता सभागृहात ‘अच्छे दिन’ दिसू लागतील, कामकाजात शिस्त येईल, सारे काही सुरळीत चालेल आणि विधिमंडळ हे लोकशाहीचे सर्वोच्च पवित्र स्थान असते, हे जनतेला पटेल. कारण, प्रतोदांना मंत्रिपदाचा थाटच नव्हे, तर प्रतिष्ठाही मिळणार आहे. ही जबाबदारी पेलण्यासाठी प्रतोदांना शुभेच्छा द्यायलाच हव्यात. सभागृहांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे!