गेल्या जवळपास पाच वर्षांतील राजकीय घडामोडींमुळे काँग्रेससारख्या मातब्बर पक्षात माजलेल्या संभ्रमावर जर काही उतारा असेलच, तर अलीकडच्या काळात पुसट होत चाललेली ‘गांधीछाया’ पुन्हा गडद करणे हाच होय! केंद्रात आणि अनेक राज्यांत भाजपची सरकारे सत्ता काबीज करत असताना, काँग्रेसला पुन्हा संजीवनी द्यायची असेल, तर एखादा ‘भक्कम गांधी’ पुन्हा राजकारणाच्या पटलावर आणला पाहिजे हे ओळखण्याची मुत्सद्दी खेळी करणाऱ्या नेत्यांचे कौतुक केले पाहिजे. महात्मा गांधींचा वारसा आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाची पुण्याई यांच्या जोरावर देशाच्या राजकारणावर जबरदस्त पकड ठेवणाऱ्या काँग्रेसला गांधीनामाची संजीवनी सोबत नसेल, तर श्वास घेणेही मुश्कील व्हावे अशी परिस्थिती सांप्रतकाळी उद्भवल्यामुळे भले भले पक्षनेते चिंताग्रस्त असताना, उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराच्या रूपाने नवा गांधी मिळाला, हा विलक्षण योगायोग म्हणावा लागेल. काँग्रेसच्या पुढाकारामुळे, तब्बल १८ विरोधी पक्षांची अभूतपूर्व मतैक्य घडवून आणण्याची ताकद आजही गांधी या आडनावात आहे, हेही या निमित्ताने सिद्ध झाले. आपल्या राजकारणात दोन नाणी खणखणीत चालतात. त्यातील पहिले म्हणजे जात, आणि दुसरे नाणे म्हणजे गांधी. काही जणांच्या मते तर, ‘जात’ आणि ‘गांधी’ या आजवरच्या राजकारणात एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. पण राहुल गांधी राजकारणात आले आणि एका नाण्याची दुसरी बाजू फारशी चलनी राहणार नाही, याची काँग्रेसजनांना जाणीव झाली. ‘गांधीनाम’ हाच पक्षाचा श्वास असल्याने तसे कुणी स्पष्टपणे बोलून दाखवत नसले, तरी राहुल गांधी नावाचा ‘तिसरा गांधी’ पक्षाला संजीवनी देईल की नाही याबाबतच्या शंका कुजबुजत्या स्वरात पक्षात उमटू लागल्या असतानाच, उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठी खुद्द महात्मा गांधीजींचे नातू असलेले पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. गोपालकृष्ण गांधी यांचा शोध काँग्रेसला लागला आणि चाचपडणारे विरोधकही नव्या गांधींच्या पाठीशी उभे राहिले. गांधी या नावाला सध्या पराभवाची परंपरा लागली आहे. आणि सत्ताधीश भाजप आघाडीचे पक्षबळ पाहता उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक झाल्यास गोपालकृष्ण गांधींनाही पराभव पत्करावा लागणार हे स्पष्ट आहे. पण, पराभवाच्या मालिकेतील तिसरा गांधी आता काँग्रेसी पुढाकाराने मैदानात उतरला आणि मोदीसत्तेला त्याने आव्हान दिले, हेही नसे थोडके! राहुलपर्वाच्या प्रारंभापासून ओसरत चाललेला गांधीनामाचा महिमा अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यापलीकडे गोपालकृष्ण गांधींच्या उमेदवारीने अधिक काही साधले, आणि गांधीछाया गडद झाली, तरी खचलेल्या विरोधकांचा तो विजयच ठरेल! महात्मा गांधीच्या सावलीतून बाहेर पडणे तसेही सोपे नाही. महात्माजींच्या परंपरेतील या नव्या गांधीछायेत काँग्रेसला नव्या श्वासाची शाश्वती मिळाली, तर कुजबुजत्या शंका तरी संपून जातील. भाजपने तर अगोदरच जातीचे चलनी नाणे बाहेर काढले आहे. राजकारणातील दुसऱ्या, गांधीनामाच्या नाण्याची पत आता पणाला लागली आहे.